रीगा : रशियातील लॅटव्हिया प्रजासत्ताकाची राजधानी व सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या ८,९०,००० (१९८६). हे बाल्टिक समुद्रातील रीगा आखाताच्या दक्षिण टोकावर, पश्चिम द्वीना नदीच्या दोन्ही तीरांवर मुखापासून आत १५ किमी. अंतरावर वसलेले आहे. बाल्टिक समुद्रातील महत्त्वाच्या रशियन बंदरांपैकी हे एक समजले जाते.

जर्मन व्यापाऱ्यांनी ११५८ मध्ये येथे वसाहत स्थापिली लिव्हॉनीअन बिशप ॲल्बर्ट याने १२०१ मध्ये रीगा हे आपले मुख्य ठाणे बनविले. १२५३ मध्ये ते आर्चबिशपचे मुख्य ठिकाण झाले. १२८२ मध्ये रीगा हॅन्सिॲटिक लीगला मिळाल्यावर ते बाल्टिकवरील प्रमुख व्यापारी बनले. १५५८ मधील लिव्हॉनीअन युद्धात ते आगीच्या भक्षस्थानी पडले. १५८१ मध्ये त्याच्यावर पोलंडचा अंमल सुरू झाला. १६२१ मध्ये स्वीडनच्या गस्टाव्हस आडॉल्फसने ते घेतले व स्वीडनने शहराला स्वयंशासनाचा अधिकार दिला. रशियाचा पीटर द ग्रेट व स्वीडनचा बारावा चार्ल्स यांच्यात १७१० मध्ये पल्टाव्हा येथे झालेल्या युद्धात रीगा रशियाकडे आले.रशियन अधिकाराखाली असताना येथील व्यापार बराच वाढला. १९१४ मध्ये रीगा रशियातील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर होते. पहिल्या महायुद्धात (१९१५) येथील बंदर बंद करण्यात आले होते. त्याच वर्षी रशियाने त्यावरील आपला अधिकार सोडून दिला. १९१७ मध्ये ते जर्मनांनी काबीज केले. नोव्हेंबर १९१८ मध्ये रीगा येथेच लॅटव्हियाच्या स्वातंत्र्याची घोषण करण्यात येऊन रीगा त्याची राजधानी बनली. तेथेच ११ ऑगस्ट १९२० रोजी झालेल्या एका करारानुसार रशियाने लॅटव्हियाच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली. दुसऱ्या महायुद्धकाळात २९ जून १९४१ रोजी हे जर्मनांनी, तर १३ ऑक्टोबर १९४४ रोजी पुन्हा रशियाने घेतले. सध्या रीगामध्ये लॅटव्हियनांपेक्षा काहीशी रशियनांचीच संख्या अधिक आहे.

रीगा हे लॅटव्हियातील प्रमुख सांस्कृतीक, औद्योगिक, राजकीय व प्रशासकीय केंद्र आहे. शहरात अभियांत्रिकी उद्योग, डीझेल एंजिन, विद्युत् उपकरणे, टरबाइन, वॉयलर, वाहतूक व दळणवळणाची साधने, काच, रसायने, कागद, कापड, सिमेंट, जहाजबांधणी, अन्नप्रक्रिया, मासेप्रक्रिया, लाकूड कापणे, छपाई व प्रकाशन इ. उद्योगधंदे चालतात. जुन्या रीगा शहरात अनेक ऐतिहासिक वास्तू व मध्युगीन अवशेष पहावयास मिळतात. उदा., चर्च (तेरावे शतक), लिव्हॉनीअन ऑर्डर किल्ला (चौदावे शतक) इत्यादी. शहरात विद्यापीठ (स्था. १९१९) व इतर सहा उच्च शिक्षणसंस्था आहेत. ऐतिहासिक, कला, साहित्य इ. संग्रहालये, विज्ञान अकादमी या येथील प्रमुख सांस्कृतिक संस्था होत. किनाऱ्यावरील जुरमाला हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे.

चौधरी, वसंत