सप्तसागर : भारतीय पुराणांनी भूगोल वर्णन करताना केलेली एक संकल्पना. पुराणांच्या मते इक्षुसागर, घृतसागर ( आज्यसागर ), दधिसमुद्र, लवणाब्धी ( क्षारसमुद्र ), सुरार्णव, स्वादुजल (शुद्धोदक ), क्षीरसागर अस सात सागर आहेत. या सागरांचा संशोधकांनी शोध घेण्याचा प्रयत्न केला व पुराणांत उल्लेखिलेल्या प्रदेशवाचक व लोकवाचक नामसादृश्यांवरून काही अनुमाने काढली. काही तज्ज्ञांच्या मते जंबुद्वीपातील भारतवर्षाचे वर्णन हे पुराणांतील सत्य असावे परंतु मेरू पर्वत, सुरा समुद्र, दधिसमुद्र इ. अद्भुत कल्पना असाव्यात. या अद्भुत कल्पनांपैकी काहींचा वास्तविक अर्थ काढण्याचा प्रयत्न वि. का. राजवाडे यांच्यासारख्या मंडळींनी केला. त्यांच्या मते इक्षुसागर म्हणजे सांप्रतचा काळा समुद्र असावा. कर्नल विल्फर्ड यांचेही हेच मत आहे. याशिवाय घृतसागर म्हणजे अरल समुद्र, लवणाब्धी (क्षारसमुद्र-क्षारोद ) म्हणजे भूमध्य समुद्र तर सुरार्णव म्हणजे कॅस्पियन समुद्र असावा. विल्फर्ड यांच्या मते क्षीरसागर म्हणजे जर्मनी-जवळचा समुद्र असावा, कारण यूरोपातील जुन्या भाषेत त्याला खिरिया हे नाव होते.

काही तज्ज्ञांच्या मते इक्षुसागर म्हणजे ऑक्सस नदी. तिला समुद्राची उपमा असावी. घृत (एरिथियन सी ) इराणचे आखात दधि-अरल समुद्र लवणाब्धी-हिंदी महासागर सुरार्णव-सरन म्हणजे कॅस्पियनचे दुसरे नाव स्वादुजल-मंगोलियातील त्सादुन नदी तर यूले यांच्या मते क्षीर म्हणजे शिरवान (कॅस्पियन समुद्र ) अशीही मते आहेत.

सप्तसागर या पौराणिक संकल्पनेला गाह्य धरून धर्मशास्त्राने इष्टकामना पूर्तीसाठी ‘ सप्तसागर वत ’ सांगितले आहे. हे काम्यवत चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून पुढे सात दिवस असते. या वतात दह्याला महत्त्व असून उदयापन एक वर्षानंतर करतात.

देशपांडे, सु. र.