लाइपसिक : जर्मन लोकशाही प्रजासत्ताकातील (पूर्व जर्मनीतील) याच नावाच्या जिल्ह्याचे मुख्यालय, पूर्व बर्लिननंतरचे दुसऱ्या क्रमांकाचे महत्त्वाचे व्यापारी व औद्योगिक शहर. लोकसंख्या ५,५३,७०० (१९८५ अंदाज). हे शहर पूर्व बर्लिनच्या नैर्ऋत्येस १८२ किमी. अंतरावर प्लाइस, पार्ट व व्हाइस एल्स्टर या तीन नद्यांच्या संगमावर सस. पासून १२२ मी. उंचीवर वसले आहे.

लाइपसिक ‘ अर्ब्झव लिब्झी ’ या प्रांतामधील एक तटबंदिस्त गाव असल्याचा १०१५ मधील लिखित उल्लेख सापडतो. ११७० साली याला नगरपालिकेचा दर्जा मिळाला. हे लवकरच मध्य यूरोपच्या महत्त्वाच्या व्यापारी मार्गांवरील आघाडीचे व्यापारी केंद्र म्हणून नावारूपास आले. मध्ययुगापासून दरवर्षी येथे भरणाऱ्या व्यापारी जत्रा व मेळे यांमुळे शहराची भरभराट होत गेली. यूरोप, आशिया, अमेरिका या खंडांतील व्यापारी या जत्रांमध्ये भाग घेत असत. लाइपसिकमधील ईस्टर व मायकेलमास या दोन ठिकाणी भरणाऱ्या वार्षिक व्यापारपेठांना १४९७ मध्ये राजेशाही जत्रांचा दर्जा देण्यात आला. १७०० च्या सुमारास हे शहर पूर्व जर्मनीमधील अग्रेसर व्यापारकेंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. याच्या आसमंतात अनेक महत्त्वाच्या लढाया खेळल्या गेल्या. त्यांमध्ये ब्रिटेनफील्ड (सांप्रत लाइपसिकचे एक उपनगर) या गावी दोन (१६३१ व १६४२) आणि ल्यूटझेन येथे १६३२ मध्ये एक लढाई झाली. एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीची  ‘ लाइपसिकची लढाई ’ ही अत्यंत महत्त्वाची मानली जाते.

पहिला नेपोलियन (फ्रेंच सत्ता) विरुद्ध ऑस्ट्रिया, रशिया, प्रशिया व स्वीडन यांच्यात झालेली लाइपसिकची लढाई ‘बॅटल ऑफ द नेशन्स’ या नावाने ओळखली जाते. या लढाईत नेपोलियनचा पराभव झाला आणि जर्मनी व पोलंड या दोन देशांवरील फ्रेंच सत्ता संपुष्टात आली. ही लढाई १६ ते १९ ऑक्टोबर १८१३ अशी चार दिवस चालली. फ्रान्समधून लाइपसिकमार्गे होणारा रसद पुरवठा बंद होऊ नये म्हणून फ्रेंच सम्राटाने ही लढाई केली. १६ ऑक्टोबर रोजी प्रशियन फील्ड मार्शल गेप्हार्ट ब्ल्यूखर (१७४२-१८१९) व ऑस्ट्रियन फील्ड मार्शल कार्ल फिलिप श्वार्ट्सेनबेर्ख (१७७१-१८२०) या दोन सेनाधिकाऱ्यांनी आपल्या सेनेसह फ्रेंच सैन्यावर हल्ला चढविला. १७ ऑक्टोबर रोजी नेपोलियनने आपले श्वशुर ऑस्ट्रियाचे सम्राट यांच्याकडे वाटाघाटींबाबत संदेश धाडला, तथापि त्याची विनंती धुडकावण्यात आली. १८ ऑक्टोबरला फ्रेंच सैन्यापेक्षा संख्येने जवळजवळ दुप्पट असलेल्या दोस्त सैन्याने पुन्हा फ्रेंच सैन्यावर हल्ला चढविला. त्या दिवशीच्या लढाईत नेपोलियनची सॅक्सनीची व वर्टम्बर्गची सैन्ये पळून गेली. परिणामी १९ ऑक्टोबर रोजी फ्रेंच सेनेला माघार घ्यावी लागली. परतीच्या मार्गावरील महत्त्वाचा पूल फ्रेंच सैन्याने गैरसमजाने उद्ध्वस्त केला होता, त्यामुळे बऱ्याचजणांनी ऱ्हाईन नदीमध्ये उड्या मारून पोहत जाऊन आपला बचाव केला बरेचजण मारले गेले किंवा बंदिवान झाले. लाइपसिकच्या लढाईत दोन्ही बाजूंकडील मिळून १,२०,००० वर सैनिक मारले गेले किंवा जायबंदी झाले. फ्रेंच सैन्यापेक्षा दोस्त राष्ट्रांच्या सैन्याची हानी अधिक झाल्याचा अंदाज केला जातो.

लाइपसिकच्या आर्थिक भरभराटीमुळे तेथील सांस्कृतिक जीवनालाही उजाळा मिळाला-यामागे दोन कारणे होती : पहिले छपाई उद्योगाचा जलद होणारा विकास आणि दुसरे योहान झेवास्टिआन बाख (१६८५-१७५०) या श्रेष्ठ जर्मन संगीतकाराच्या संगीतविश्वाचा लाइपसिक शहरी झालेला फुलोरा. १८३९ मध्ये. लाइपसिक व ड्रेझ्डेन या दोन शहरांदरम्यान पहिली जर्मन रेल्वे सुरू झाली आणि औद्योगिक विकासामुळे, लाइपसिक हे जर्मन कामगार चळवळीचे प्रमुख केंद्र बनले. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या प्रचंड विनाशानंतर, पूर्व जर्मनीच्या कम्युनिस्ट राजवटीच्या धोरणांचा भाग म्हणून, लाइपसिकची पुनर्रचना करण्यात आली.

लाइपसिकचे फर व ग्रंथछपाई हे पारंपारिक उद्योग विशेष ख्याती पावले आहेत. आधुनिक उद्योगांमध्ये अवजड बांधकाम साहित्य तसेच अभियांत्रिकी, विद्युत्‍उपकरणे व सामग्री, वस्त्रे, कापड, रसायने, यांत्रिक अवजारे व उपकरणे, संगीतवाद्ये, खेळणी, लोकर, बीर यांच्या निर्मितिउद्योगांचा समावेश होतो. प्रतिवर्षी वसंतऋतूत येथे भरविण्यात येणारी ‘ लाइपसिक जत्रा ’ म्हणजे आंतरराष्ट्रीय व्यापाराला चालना देणारी मोठी पेठच समजली जाते. हे शहर अनेक लोहमार्गांचे आणि रस्त्यांचे महत्त्वाचे केंद्र असून येथे हवाई वाहतुकीसाठी दोन विमानतळ उपलब्ध आहेत. लाइपसिक रेल्वे स्थानक हे जगातील सर्वांत मोठ्या रेल्वे स्थानकांपैकी एक समजले जाते.

लाइपसिक विद्यापीठ व मोठी प्रकाशनगृहे यांच्यायोगे शहराकडे अनेक विद्वान व लेखक आकृष्ठ झाले. त्यांमध्ये गटे, फिक्टे, शिलर, एफ्. डब्ल्यू. फोन शेलिंग, गोटफ्रीट व्हिल्हेल्म लायप्निट्स, क्रिस्त्यान गेलर्ट इत्यादींचा समावेश होता. १९५३ मध्ये विद्यापीठाचे नाव ‘ कार्ल मार्क्स युनिव्हर्सिटी ऑफ लाइपसिक ’ असे बदलण्यात आले. याशिवाय शहरांत संगीत संरक्षिका, अर्थशास्त्र महाविद्यालय, विज्ञान अकादमी, अध्यापक महाविद्यालय, आरेख्यक कला अकादमी इ. शैक्षणिक संस्था आहेत. गेवान्डहाउसमध्ये भरविण्यात येणाऱ्या संगीत सभा ( जलसे ) अतिशय प्रसिद्ध होत्या. रिचर्ड वॅगनर (१८१३-८३) ह्या प्रसिद्ध जर्मन संगीतकाराचे लाइपसिकमध्ये बराच काळ वास्तव्य होते तर फेलिक्स मेंडेल्सझोन बार्थोल्डी (१८०९-१८४७) आणि योहान झेबास्टिआन बाख (१६८५-१७५०) हा श्रेष्ठ जर्मन संगीतकार व ऑर्गनवादक या दोघांनीही लाइपसिक विद्यापीठात संगीतविषयाचे प्राध्यापकपद भूषविले होते.

शहरामधील ग्रंथालयात ‘जर्मन लायब्ररी, कोमेनिअस लायब्ररी’ (यूरोपमधील सर्वांत मोठे शिक्षणशास्त्रविषयक ग्रंथालय) ही विशेष ग्रंथालये असून कार्ल मार्क्स विद्यापीठ ग्रंथालय, लाइपसिक नगर व जिल्हा ग्रंथालय, नगर अभिलेखागार ही ग्रंथालयेदेखील महत्त्वाची आहेत. टॉमनेर कॉयर, गेवान्डहाउस ऑर्केस्ट्रा, रेडिओ सिंफनी ऑर्केस्ट्रा हे वाद्यवृंद उच्च सांगीतिक परंपरा टिकवून आहेत.

दुसऱ्या महायुद्धात नष्ट झालेल्या परंतु नंतर बांधलेल्या ऐतिहासिक वास्तूंमध्ये जुने नगरभवन, जुने व्यापारगृह, तेराव्या शतकातील सेंट टॉमस चर्च, बाख व जर्मन कवी-प्राध्यापक क्रिस्त्यान गेलर्ट (१७१५-६९) यांची दफनभूमी असलेले सेंट जॉन चर्च, सेंट निकोलस चर्च, राजपुत्रांचा प्रासाद इत्यादींचा समावेश होतो. नवीन वास्तूंमध्ये सर्वोच्च न्यायालय, विद्यापीठ इमारती, ‘द बॅटल ऑफ द नेशन्स मॉन्यूमेंट’ हे स्मारक, जर्मन राष्ट्रीय ग्रंथालय, मुख्य रेल्वे स्थानक इत्यादींचा अंतर्भाव होतो. येथील ‘ लाइपसिक प्राणिसंग्रहालय ’ अनेक मांसभक्षक श्वापदांसाठी प्रसिद्ध आहे. सु. २२ हेक्टर क्षेत्रात पसरलेल्या या प्राणिसंग्रहालयात सु. ७७० जातींचे सु. ५,८५० प्राणी आहेत. वाघ-सिंहांचे संवर्धन करणाऱ्या या प्राणिसंग्रहालयात २५० हून अधिक दुर्मिळ सायबीरियन वाघ पहावयास मिळतात. या संग्रहालयाने १९७८ मध्ये ‘आंतरराष्ट्रीय व्याघ्र प्रदर्शन’ भरविले होते.

गद्रे, वि. रा.