दंडकारण्य : या प्राचीन संज्ञेने विंध्य पर्वत ते कृष्णा नदीपर्यंत पसरलेले अरण्य दर्शविले जाई. इक्ष्वाकूच्या धाकट्या पण उन्मत्त स्वभावाच्या दंड नावाच्या मुलाचे हे राज्य. दंडाने आपला गुरू शुक्राचार्य याच्या अरजा नावाच्या मुलीवर बलात्कार केल्याने शुक्राचार्याने शाप देऊन त्याच्या राज्याचे अरण्यात रूपांतर केले, अशी कथा आहे. रामाने वनवासातील काही काळ याच अरण्यात घालविला व तेथेच शूर्पणखा, खर, दूषणादी राक्षसांचा संहार केला. बलरामानेही या अरण्याला भेट दिली होती, असे म्हटले जाते. तुळजापूरजवळच्या काटी गावातील एका विठ्ठल मंदिरातील यादवकालीन शिलालेखातही या अरण्यासंबंधी उल्लेख आढळतो.

खरे, ग. ह.