कांचनजंघा : हिमालयाचे एक शिखर. उंची ८,५९८ मी. एव्हरेस्ट व के–टू ह्यानंतर जगात तिसऱ्या क्रमांकाचे शिखर म्हणून कांचनजंघा ओळखले जाते. हे नेपाळ-सिक्कीम सरहद्दीवर, एव्हरेस्टच्या पूर्वेस आणि दार्जिलिंगच्या वायव्येस सु.१७० किमी. आहे. ‘बर्फाची पाच भांडारे’ असा कांचनजंघाचा अर्थ. येथे बर्फाचे दाट थर असून जगातील सर्वात मोठे हिमलोट येथेच होतात. सिक्कीमी लोक कांचनजंघा अतिशय पवित्र मानतात. कांचनजंघा सर करण्याचे अनेक अयशस्वी प्रयत्न एकोणिसाव्या शतकात झाले. शेवटी जॉर्ज बॅंड व जो ब्राउन या ब्रिटिश गिर्यारोहकांनी १९५५ मध्ये कांचनजंघा सर केले.

शाह, र. रू.