मेक्सिको: युनायटेड स्टेट्स ऑफ मेक्सिको. उत्तर अमेरिकेतील सर्वांत दक्षिणेकडील देश. बाजूच्या वसती असलेल्या बेटांसह क्षेत्रफळ १९,५८,२०१ चौ. किमी. लोकसंख्या ७,८५,२४,००० (१९८५). १४º ३२ उ. से. ३२º ४३ उत्तर अक्षांश व ८६º ४२ प. ते ११८º २२ प. रेखांश यांदरम्यान, वायव्य-आग्नेय दिशेने विस्तारलेल्या या देशाच्या उत्तरेस अमेरिकेची संयुक्त संस्थाने, आग्नेयीस बेलीझ व ग्वातेमाला हे देश असून, पूर्वेस मेक्सिकोचे आखात व कॅरिबियन समुद्र (अटलांटिक महासागर), तर पश्चिमेस व दक्षिणेस पॅसिफिक महासागर (कॅलिफोर्नियाचे आखात) आहे. कर्कवृत्त देशाच्या मध्यातून जाते. देशाची एकूण १३,८५७ किमी. लांबीची सरहद्द असून पॅसिफिक महासागरातील जवळच असलेल्या रेव्हीया हीहेदो समूहातील बेटांचाही समावेश या देशातच होतो. मेक्सिको सिटी (महानगराची लोकसंख्या १,२९,३२,११६–१९८०) ही देशाची राजधानी आहे.

भूवर्णन: भूरचनेच्या दृष्टीने देशाचा मध्यवर्ती उंच पठारी प्रदेश महत्त्वाचा असून त्यात अनेक द्रोणीप्रदेश आहेत. याशिवाय पठाराच्या पूर्व, पश्चिम व दक्षिण भागांतील उंच डोंगररांगा पूर्व व पश्चिम किनारपट्ट्यांचा प्रदेश व उत्तरेकडील ओसाड वाळवंटी प्रदेश असे भाग पडतात. मध्यवर्ती पठारी प्रदेशाने देशाचा बराचसा भाग व्यापला असून, हा भाग मेसेटो सेंट्रल या नावाने ओळखला जातो. हा प्रदेश उत्तरेस अ. सं. सं. च्या सरहद्दीपासून दक्षिणेस तवाँतपेक आखातापर्यंत पसरलेला असून त्याची उंची सस. पासून ९०० ते १,२०० मी. पर्यंत आढळते. देशाच्या मध्यभागी याची उंची २,१०० ते २,४०० मी. पर्यंत वाढत जाते. याच पठारी प्रदेशाच्या पूर्व व पश्चिम भागांत उत्तर-दक्षिण दिशेने पसरलेल्या डोंगररांगा आहेत. बहुतेक रांगा तुटक परंतु ज्वालामुखी शिखरे असलेल्या आहेत. पश्चिमेकडील सिएरा माद्रे ऑक्सीडेंटाल ही डोंगररांग सु. १६० किमी. लांबीची व ३,०५० मी. पेक्षा जास्त उंची असलेल्या शिखरांची आहे, तर पूर्वेकडील सिएरा माद्रे ओरेंटाल रांग त्यामानाने कमी उंचीची व वाहतुकीच्या दृष्टीने सुलभ आहे. या डोंगररांगातील काही ज्वालामुखी शिखरे ५,००० मी. पेक्षा जास्त उंचीची आहेत. त्यांत ओरिसाबा (५,६३९ मी.), पोपकॅतपेतल (५,४६५ मी.), ईस्तासीवाताइल (५,२३० मी.) इ. शिखरे प्रमुख आहेत. मध्यवर्ती पठारी भागाची उंची दक्षिणेकडे तवाँतपेक भागात कमी झालेली आढळते परंतु त्याच्या दक्षिणेस चीआपास विभागात ती पुन्हा वाढत जाते. या प्रदेशाच्या उत्तरेस ताबास्को व ईशान्येस कँपीची आणि यूकातान लिए हे कमी उंचीचे सकल प्रदेश आहेत. याशिवाय देशाच्या वायव्य भागातील बाहा द्वीपकल्प, उत्तरेकडील वाळवंटी प्रदेश (सॅनारा वाळवंट) हे भूभाग वैशिष्ट्यपूर्ण आहेत.

रिओ ग्रांदे (स्थानिक नाव रिओ ब्राव्हो देल नॉर्ते) ही देशाच्या उत्तर सरहद्दीवरून वाहणारी प्रमुख नदी असून ती वायव्य-आग्नेय दिशेने वाहत जाऊन मेक्सिकोच्या आखाताला मिळते. याशिवाय देशात पापाल्वापाम, लेर्मा, सांत्यागो, ऊसूमासींता (ग्वातेमालाच्या सरहद्दीवर), ग्रीहावा, बाल्सास, पानूको, सोतो ला मारीना इ. नद्या महत्त्वाच्या आहेत. पापाल्वापाम ही नदी वीजनिर्मितीच्या दृष्टीने फार उपयुक्त ठरली आहे. देशाच्या मध्यवर्ती भागात पूर्वी ५ दलदलयुक्त सरोवरे होती. त्यांपैकी तेस्कोको हे सर्वांत मोठे होते. कालांतराने ही सरोवरे कोरडी पडून तेथे शहरे वसविली गेली आहेत. हालीस्को राज्यातील चापाला हे देशातील सर्वांत मोठे सरोवर असून त्याने सु. १,६८० चो. किमी. क्षेत्र व्यापले आहे. वायव्येकडील बाहा द्वीपकल्पीय भागात व उत्तरेकडील वाळवंटी प्रदेशात जलप्रवाह नाहीत.

हवामान: देशाचा जवळजवळ निम्मा भाग रुक्ष व ओसाड असल्याने तेथील हवामान व दक्षिणेकडील डोंगर प्रदेशातील हवामान यांत बराच फरक दिसून येतो. यूकातान द्वीपकल्प, किनारी भागातील मैदाने, दक्षिणेकडील कमी उंचीचा प्रदेश या भागांत उष्ण प्रदेशीय व काही भागांत उपोष्ण प्रदेशीय हवामान आढळते. या भागातील सरासरी तापमान २५º ते २७º से. असते. हिवाळ्यात ते कमीतकमी १६º से., तर उन्हाळ्यात जास्तीतजास्त ४९º से. पर्यंत जाते. मध्यभागातील डोंगराळ प्रदेशात मात्र त्यामानाने हवामान थंड असते. हिवाळ्यात बऱ्याच वेळा डोंगरमाथे बर्फाच्छादित असतात. मेक्सिकोच्या उत्तर भागात पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. दोन्ही किनारी प्रदेशांत वार्षिक सरासरी ९९ ते ३०० सेंमी. पाऊस पडतो, तर दक्षिणेकडील ताबास्को व चीआपास राज्यांत ५०० सेंमी. पर्यंत पाऊस पडतो. बहुतेक पर्जन्य उन्हाळ्यात पडतो.

हवामान व भूरचनेच्या विविधतेप्रमाणेच येथील वनस्पती व प्राणिजीवनातही विविधता आढळते. किनारी भागातील मैदाने उष्ण प्रदेशीय वनस्पतिप्रकारांनी व्यापलेली आहेत तर पठारी प्रदेशाच्या उतारांवर उपोष्ण प्रदेशीय वनस्पतिप्रकार आढळतात. देशाच्या उत्तर भागात वाळवंटी प्रदेशातील निवडुंगासारखे वनस्पतिप्रकार आहेत, तर डोंगरउतारांच्या मिश्रवनस्पतींच्या प्रदेशात प्रामुख्याने सूचिपर्णी वृक्ष आढळतात. पूर्वेकडील यूकातान द्वीपकल्पीय भागात खुरट्या वनस्पती बऱ्याच आहेत. याच्या उत्तर भागात उष्ण प्रदेशीय अर्धपानझडी वृक्षांची अरण्ये व विविध प्रकारचे गवत आढळते. देशात घायपाताचे वेगवेगळे प्रकार आढळतात. त्यांपैकी ‘अगेव्ह फोर्‌क्रॉयिडीय’ हा प्रकार प्रसिद्ध असून, त्याची लागवड मुख्यत्वे दक्षिण भागात होते. त्यापासून ‘हेनेक्वेन’ नावाचा जगप्रसिद्ध वाख तयार करतात. हे देशातील महत्त्वाचे उत्पादन आहे. बाहा कॅलिफोर्नियाच्या भागात पाइन वृक्षांची जंगले आहेत. उंच डोंगराळ प्रदेशात हिमरेषेच्या खाली अल्पाइन वृक्षप्रकार आढळतात.

येथील जंगलांत आर्मडिलो, टॅपिर, ऑपॉस्सम, प्यूमा, जॅगुआर, विविध प्रकारची अस्वले व माकडे, हरणे, रानडुक्करे इ. वन्यप्राणी दिसून येतात. यांशिवाय विषारी सर्प व कीटकही बरेच आहेत. किनारी प्रदेशातील दलदलयुक्त भागांत मलेरियाप्रसारक डासांचा प्रादुर्भाव बराच आहे. बाहा कॅलिफोर्नियाच्या पश्चिमेस असलेल्या ग्वादलूप बेटावर प्रचंड आकाराचे सील मासे आढळतात.

इतिहास व राज्यव्यवस्था: मेक्सिकोतील आद्य रहिवासी सु. ५० हजार वर्षांपूर्वी आशिया खंडातून तेथे गेले असावेत. १९४० नंतर आढळलेल्या पुरावशेषांत प्रागैतिहासिक काळातील प्रचंड प्राण्यांचे, तसेच मानवी अस्थींचे आणि दगडी हत्यारांचे पुरावे मिळाले आहेत. सु. १०,००० वर्षांपूर्वीच्या टेपेस्पान मानवाचे हे वसतिस्थान असावे. इ. स. पू. पाचव्या सहस्त्रकात या भागात शेतीला आरंभ झाल्याचे दिसते. येथील प्राचीन मृत्पात्री अवशेष इ. स. पू. २००० वर्षांपूर्वीचे आहेत. इ. स. पू. १५०० च्या सुमारास ग्रामीण कृषिसंस्कृती या भागात स्थिर झाल्याचे दिसते. मेक्सिकोच्या खोऱ्यातील सरोवरांच्या प्रदेशात ही संस्कृती वाढली. लाकडी फळ्यांच्या वाफ्यात सरोवरातील सुपीक गाळ टाकून सरोवरातच तरंगत्या बागा उठवल्या जात. तत्कालीन कृषिसंस्कृतीला अनुरूप अशा सूर्य आणि पर्जन्य देवतांच्या कल्पनाही या काळातच उदयास आल्या. अनुषंगाने धर्मगुरूंचा एक प्रभावी वर्गच समाजात निर्माण झाला. देवतांची प्रचंड अशी मंदिरे व पिरॅमिडवजा वास्तू उभारण्यास सुरुवात झाली. त्यांच्या परिसरात नगरेही उदयास आली.


ओल्‌मेक ही या प्रदेशातील आद्य विकसित संस्कृती होय (इ. स. पू. ८०० ते ४००). दक्षिण व्हेराक्रूझ आणि ताबास्को या विद्यमान प्रांतांत ती होती. ला व्हेंता हे त्या संस्कृतीचे केंद्र होते. ओल्‌मेक संस्कृतीत चित्रलिपी व पंचांग यांचीही निर्मिती झाली. ओल्‌मेकांची भव्य मूर्तिकला अवशिष्ट आहे.

त्यानंतर मेक्सिकन संस्कृतीचे सुवर्णयुग किंवा अभिजातयुग सुरू होते (इ. स. पू. सु. २०० ते इ. स. ९००). सुसंस्कृत नागर समाज, धर्मगुरूंचा प्रभाव, भव्य प्रेक्षणीय वास्तुकला, ललितकला व लेखनकलेचा विकास आणि विशेषतः वैज्ञानिक प्रगती, ही या युगाची ठळक वैशिष्ट्ये होत. मोंते अल्बान हे या कालखंडातील आद्य केंद्र विद्यमान वाहाक शहराजवळ होते. झपोटेक इंडियनांनी इ. स. पू. ५०० च्या सुमारास ते वसविले. ओल्‌मेक संस्कृतीचा प्रभाव या केंद्रावर होता. तेओतीवाकान हे मेक्सिकन सुवर्णयुगाचे सर्वांत मोठे केंद्र होय (स्था. इ. स. पू. २००) विद्यमान मेक्सिको शहराच्या ईशान्येस सु. ४० किमी. अंतरावर ते वसले होते. सपंख सर्प ही या नगराची देवता होती. एखाद्या नगराज्याप्रमाणेच या केंद्राचा प्रभाव दीर्घकाळ टिकून होता. येथील दफनभूमी आणि तिच्या लगतचा सूर्यदेवतेचा पिरॅमिड उल्लेखनीय आहे. साधारणपणे इ. स. ६५० नंतर या केंद्राला उतरती कळा लागली. त्यानंतरच्या काळात मध्य मेक्सिकोत विद्यमान प्वेब्लो, व्हेराक्रूझ आणि मेक्सिको सिटी यांच्या परिसरात तीन सांस्कृतिक नगरकेंद्रे उदयास आली.

दक्षिण मेक्सिकोत याच काळात (इ. स. ३०० ते ९००) ⇨ माया संस्कृतीचा विकास घडून आला. पालेंके आणि बोनांपाक ही मेक्सिकोमधील माया संस्कृतीची केंद्रे अनुक्रमे उत्कृष्ट वास्तुकला आणि विस्मयजनक भित्तिचित्रे यांसाठी विशेष प्रसिद्ध आहेत.

सातव्या ते नवव्या शतकांदरम्यान बहुधा संसर्गजन्य रोग, टोळधाडी, दुष्काळ, लढाया, सामाजिक उठाव यांसारख्या काही कारणांमुळे सुवर्णयुगातील सर्वच प्रभावकेंद्रे ओस पडू लागली आणि एका अत्यंत प्रगत अशा सांस्कृतिक परंपरेचा अस्त झाला.

सुवर्णयुगाच्या उत्तरार्धातील शतके (सहावे-सातवे) अस्थिरतेची निदर्शक आहेत. धर्मगुरूंच्याऐवजी लष्करी नेत्यांचा उदय झाला. देवतांना मानवी बळी देण्याची पद्धत उदयास आली. उत्तरेकडून चिचिमेक या लढाऊ आणि क्रूर जमातीच्या लोकांचे आक्रमण होऊ लागले. तॉल्तेक ही तत्कालीन एक प्रमुख जमात आहे. या जमातीचा प्रसिद्ध नेता टोपिल्टझीन क्वेट्झाकोट्ल हा होय. विद्यमान मेक्सिको शहराच्या ईशान्येस तूला ही नवी राजधानी त्याने वसविली. तिचा प्रभाव पुढे २० वर्षे टिकून राहिला. भूतलावरील नंदनवन असे त्या नगरीचे वर्णन केले जाई. टोपिल्टझीन क्वेट्झाकोट्ल याने २०० वर्षे येथे राज्य केले. त्यानंतर त्याच्यावर हद्दपारीची वेळ आली परंतु त्याने आपल्या पुनरागमनाचे आश्वासन देऊन ही नगरी सोडली. तूला नगरीवर त्यानंतर क्रूर, युद्धपिपासू जमातीचे राज्य आले. तत्कालीन संस्कृतीचे हे युद्धखोर आणि आक्रमक अंतरंग तॉल्तेक कलेत प्रतिबिंबित झाले आहे. तूला येथील अवशेषांत योद्ध्यांच्या प्रचंड मूर्ती, तसेच मानवी हृदयांचा लचका तोडणाऱ्या गरूड आणि जॅगुआर यांची भित्तिलेपचित्रे आढळतात. तूलाचे सांस्कृतिक केंद्र ११५६ च्या सुमारास अवर्षण व दुष्काळ यांमुळे ओस पडले आणि मेक्सिकन संस्कृतीची उत्तरसीमा ही पुन्हा बाह्य आक्रमणांना बळी पडली.

दक्षिण मेक्सिकोत विद्यमान वाहाक राज्याच्या प्रदेशात झपोटेक इंडियनांनी मीत्ला या नव्या सुंदर नगराची उभारणी केली. त्याच्या पश्चिमेला आणि उत्तरेला मीक्सतेक ही इंडियन जमात रहात होती. या दोन जमातींत संघर्ष झाले, तरी बराचसा काळ शांततापूर्ण सहजीवनात त्यांनी व्यतीत केला. मीक्सतेक लोकांची जडजवाहिराची कारागिरी व अप्रतिम सचित्र पुस्तके प्रसिद्ध आहेत.

तॉल्तेक निर्वासितांनी उत्तरेकडील यूकातान प्रदेशात माया संस्कृतीचा वारसा पुढे चालविला. दहाव्या शतकानंतरच्या उत्तर माया संस्कृतीत नगरराज्ये आणि त्यांचे संघ उदयास आले पण त्यांचा भर हा सैनिकी संस्कृतीवर अधिक होता. सामान्यपणे १,००० वर्षे माया संस्कृतीचा प्रभाव या भागात टिकून राहिला. तूला नगरीच्या पतनानंतर बाराव्या व तेराव्या शतकांत अनेक भटक्या जमातींनी मध्य मेक्सिकोत प्रवेश केला. हळूहळू या भटक्या जमाती शेतीच्या अनुषंगाने सुस्थिर झाल्या, काही नवी नगरे त्यांनी वसविली पण त्यांच्यातील परस्पर-कलह हा टिकूनच राहिला. १३१८ मध्ये तेस्कोको ही नवी राजधानी (विद्यमान मेक्सिको सिटी) स्थापन झाली. नेझॅहॉलकोत्ल (कार. १४१८–७२) हा त्यांचा येथील प्रसिद्ध राजा होता. तो कवीही होता. तेस्कोको नगर तेव्हा विशाल उद्याने, सुंदर मंदिरे व शेकडो हस्तलिखितांचे ग्रंथालय यांनी समृद्ध होते.

ॲझटेक इंडियन हे वायव्येकडून सु. बाराव्या शतकात आले. काही काळ ते तत्कालीन सत्ताधाऱ्यांच्या सेवेत राहिले तथापि १३२५ च्या सुमारास त्यांनी तेस्कोको सरोवरातील बेटाचा कबजा घेतला. तेथेच त्यांनी तेनॉच्तित्लान ही राजधानी वसविली. पुढील दोन शतके मेक्सिकन संस्कृतीचे ते केंद्र होते. तूला परंपरेतील धार्मिकतेचा आणि सत्ताविस्ताराचाच वारसा ॲझटेकांनी पुढे चालविला. सूर्य ही त्यांची प्रमुख देवता आणि युद्धदेवताही होती. [⟶ ॲझटेक].

मेक्सिकोचा वसाहतकालीन इतिहास ⇨ एर्नांदो कोर्तेझच्या आगमनापासून (१५१९) सुरू होते. कोर्तेझला क्यूबाच्या राज्यपालाने मोहिमेवर पाठविले होते. ॲझटेकांचा शेवटचा सम्राट दुसरा माँतेझूमा १५२१ मधील संघर्षात ठार झाला. ॲझटेक वर्चस्वाविरुद्ध इतर काही इंडियन जमातींत जो असंतोष होता, त्याचा फायदा कोर्तेझने घेतला. परागंदा झालेल्या तॉल्तेक नेत्याच्या पुनरागमनाच्या दंतकथेचाही कोर्तेझने उपयोग करून घेतला. तीन महिन्यांच्या संघर्षानंतर ॲझटेक राजधानी कोर्तेझच्या हाती पडली त्यावेळेस स्पॅनिश वसाहतकार हे काही अधिकृत सैनिक नसून केवळ साहसी लोक होते. ॲझटेकांच्या पराभवानंतर आपल्याला खूप लूट मिळेल, ही त्यांची अपेक्षा फोल ठरली. त्यामुळे असंतोष निर्माण झाला. परिणामतः प्रत्येक स्पॅनिश व्यक्तीला काही इंडियन गावे वाटून देण्यात आली. इंडियनांचे ख्रिस्ती धर्मांतर घडवून आणणे, त्यांच्याकडून काम करून घेणे आणि त्यांचा पोटापाण्याची व्यवस्था करणे, हे काम त्यांच्यावर सोपविण्यात आले. १५४२ मध्ये गुलामगिरीविरुद्ध कायदे करण्यात आले तसेच १५४९ मधील कायद्याने सक्तीच्या कामाचा निर्बंध काढण्यात आला. तथापि कामगारांची चणचण निर्माण झाली व प्रत्येक गावाने दर आठवड्याला विशिष्ट कामगार पुरविले पाहिजेत, असा कायदा करण्यात आला. कोर्तेझने नव्या स्पॅनिश वसाहतीला ‘नवे-स्पेन’ हे नाव दिले होते, ते पुढे तीन शतके टिकून राहिले. कोर्तेझ काही वर्षे नव्या स्पेनचा अधिकृत राज्यपालही होता. त्यानंतर वसाहतीची व्यवस्था शाही अधिकाऱ्यांच्या मंडळाकडे सोपविण्यात आली (१५२८). न्यायमंडळासारख्या या मंडळावर वैधानिक, कार्यकारी आणि न्यायिक अशी तीनही कामे सोपविलेली होती. पुढे स्पेनच्या सम्राटाने वसाहतीच्या कारभारासाठी व्हाइसरॉयची नेमणूक केली. वरील न्यायमंडळ त्याच्या हाताखाली काम करीत होते. याशिवाय वसाहतीचा विस्तार लक्षात घेता व्यापक नोकरशाही यंत्रणा उभारण्यात आली. १७९० पर्यंत ही व्यवस्था टिकून राहिली. या काळातील कायदेकानू चांगले होते पण त्यांची अंमलबजावणी नीट झाली नाही. अधिकाऱ्यांच्या गैरवर्तनाबाबत कधी शासन करण्यात आले नाही. स्पॅनिश आणि इंडियन समूहांसाठी स्वतंत्र नगरपरिषदाही याच काळात स्थापन करण्यात आल्या. स्पेनने केवळ व्यापारी दृष्टीनेच या वसाहतीकडे पाहिले. नव्या स्पेनमधील चांदी, सोने, इ. तसेच साखर, व्हॅनिला, कातडी, कोको ही किफायतशीर उत्पादने स्पेनला महत्त्वाची वाटत. आयात-निर्यात व्यापार वर्षातून एकदा, स्पॅनिश जहाजांतून केला जाई. पोप शासनाने स्पेनला आपल्या वसाहतीत धार्मिक सर्वांधिकार दिले होते. त्यामुळे वसाहतींचा विस्तार आणि तेथील लोकांचे ख्रिस्तीकरण हे आपले कर्तव्य आहे, अशी स्पेनची भूमिका होती. त्यामुळे मेक्सिकोतील इंडियनांचे फार मोठ्या प्रमाणात धर्मांतर करण्यात आले. अनेक ख्रिस्ती पंथोपपंथाचे धर्मोपदेसक सोळाव्या शतकाच्या उत्तरार्धात मेक्सिकोत आले. त्यांनी शाळा, रुग्णालये व इतर प्रकारची परोपकारी कामे सुरू केली. राजकारणातही त्यांना महत्त्व होते. १५७१ मध्ये येथे ⇨ इन्क्विझिशन (ख्रिस्ती न्यायमंडळ) स्थापन झाले.


वसाहतकाळात जी सामाजिक घडण झाली, तीत व्यापक प्रमाणावर वांशिक मिश्रण घडून आले. स्पॅनिश पुरुष आणि इंडियन स्त्रिया यांच्या संततीला ‘मेस्टिझो’ अशी वर्गसंज्ञा लाभली. प्रारंभीची इंडियन लोकांची बहुसंख्यांकता पुढे कमीतकमी होत गेली, तिचे कारण यूरोपीय लोकांनी आणलेले देवीसारखे संसर्गजन्य रोग हे होय. पुढे खाणकाम आणि ऊसमळ्यांत काम करण्यासाठी गुलाम म्हणून कृष्णवर्णीय आणण्यात आले. इतरांशी झालेल्या वांशिक मिश्रणातून कृष्णवर्णी यांचा ‘मुलेट्टो’ असा वर्ग तयार झाला. इंडियन आणि कृष्णवर्णीय यांच्या मिश्रणातून ‘झांब्योस’ निर्माण झाले. या संमिश्र समाजात मात्र त्वचेचा रंग महत्त्वाचा ठरला आणि त्यानुसार काटेकोर सामाजिक वर्गसंरचना तयार होत गेली. गौरवर्णीयांतही स्पेनमध्ये जन्मलेले आणि मेक्सिकोत जन्मलेले (क्रीओल) यांच्यात उच्चनीचता पाळली जाई. शासनातील आणि चर्चमधील उच्चाधिकारपदे स्पेनमध्ये जन्मलेल्यांनाच लाभत.

दुसऱ्या चार्लस्‌च्या निधनानंतर (१७००) स्पेनमध्ये फ्रेंच बूँर्बा घराण्यातील वारस सम्राटपदी आला. बूँर्बा राजवटीत मेक्सिकोत बऱ्याच राजकीय सुधारणा घडून आल्या. मेक्सिकोतील शासन २०० प्रांतिक अधिकाऱ्यांऐवजी फक्त १२ प्रमुख अधिकाऱ्यांच्या हाती देण्यात आले तसेच उत्तरेकडील प्रांतासाठी कमांडंट जनरल असे नवे राजकीय तथा सैनिकी पद निर्माण करण्यात आले. करवसुली, जकात, चोरटा व्यापार यांसंबंधी कडक व्यवस्था करून वसाहतीतील अर्थव्यवस्था सुधारण्यात आली. वर्षातून एकदाच आयात-निर्यात करण्याची पद्धत बंद करण्यात आली. सागरपार व्यापारासाठी अधिक बंदरे खुली करण्यात आली. मूलभूत उद्योगांच्या विकासासाठी करविषयक सवलतीही देण्यात आल्या. योगायोगाने त्याच वेळी चांदीचे उत्पादन अफाट वाढले. सर्व जगातील एकत्र चांदीइतके उत्पादन मेक्सिकोत त्यावेळी होई. बूँर्बा काळातील या आर्थिक सुबत्तेचा फायदा मात्र सामान्य जनतेपर्यंत पोहोचू शकला नाही.

अठराव्या शतकातच मेक्सिकोच्या स्वातंत्र्यलढ्याचा उदय झाला. हे शतक यूरोपातील ज्ञानोदयाचे युग म्हणून समजले जाई. उदारमतवादी विचारसरणीचा उदय त्या काळात झाला. मेक्सिकोतील बुद्धिमंतांवर त्याचा मोठा प्रभाव होता. त्यातच नेपोलियनने १८०८ मध्ये स्पेन जिंकला व या घटनेचा परिणाम नव्या स्पेनमधील वसाहतकारांवर झाला. फ्रेंचांसारख्या परक्या राज्यकर्त्यांच्या अंमलात राहण्यापेक्षा आपण स्वतंत्र व्हावे, अशी आकांक्षा त्यांच्यात निर्माण झाली. अमेरिकेचे स्वातंत्र्ययुद्ध (१७७५–८३), फ्रेंच राज्यक्रांती (१७८९) व स्पेनवरील नेपोलियनचे आक्रमण आणि सत्तासंपादन (१८०८) या घटनांचा परिणाम होऊन मेक्सिकोत स्वातंत्र्याची चळवळ उदयास आली. ईदाल्गो कोस्तीया या धर्मोपदेशकाने १६ सप्टेंबर १८१० रोजी स्वातंत्र्याचा जाहीरनामा काढून चळवळीची सुरूवात केली. मुक्तिसैनिकांत मेस्टिझोंचा आणि इंडियनांचा भरणा होता. १८११ सालच्या कॅल्डेरॉन ब्रिज येथील लढाईत ईदाल्गोचा पराजय झाला. १८१५ पर्यंत मरेलोस व मॅटामोरोस या मुक्तिवाहिनीच्या सेनाधिकाऱ्यांचाही पराभव झाला व गेर्रेरो या नेत्यास परागंदा व्हावे लागले. पुढे १८२० साली स्पेनमध्ये उदारमतवादी सत्तेवर आले. गेर्रेरो आणि स्पेनच्या सम्राटाचा प्रतिनिधी जनरल आगुस्तीन ईतूर्बीदे यांच्यात ईग्वाला शहरी एक योजना मंजूर करण्यात आली. या योजनेनुसार मेक्सिकोत रोमन कॅथलिक हाच एकमेव धर्म असावा, देश पूर्णपणे स्वतंत्र करण्यात यावा (शक्य असेल तर स्पॅनिश राजघराण्याचे संविधानात्मक प्रमुख पद ठेवावे) व वांशिक क्षमता राखून सर्वांना शासनात सेवेची संधी असावी, असे ठरले. १८२१ मध्ये स्पेनने मेक्सिकोच्या स्वांतत्र्याला संमती दिली. प्रत्यक्षात मात्र ईतूर्बीदे हाच नव्या स्पेनचा सम्राट म्हणून सत्ता बळकावून बसला. पुढे १८२३ मध्ये मेक्सिकोत प्रजासत्तकाची स्थापना करण्यात आली आणि ईतूर्बीदेची हकालपट्टी झाली. या सत्तांतराचे सूत्रधार सांता आना आणि ग्वादालूपे व्हीक्तोर्या हे नेते होते. मेक्सिको प्रजासत्ताकाचा पहिला अध्यक्ष ग्वादालू व्हीक्तोर्या हा झाला. पुढील ५–६ वर्षे ही राजकीय अस्थिरतेचीच होती. पुष्कळसे लष्करी अधिकारी आपापले प्रभावगट आणि व्यक्तीगत महत्त्वाकांक्षा यांचे राजकारण खेळत. या काळात सत्तांतरेही वरचेवर झाली. १८२९–३० मध्ये अल्पकाळ गेर्रेरो हा सांता आनाच्या पाठिंब्याने अध्यक्ष होता. १८३२ साली स्वतः सांता आना हाच प्रजासत्ताकाचा अध्यक्ष बनला. त्याचा राजकीय प्रभाव पुढे १८५५ पर्यंत टिकून होता. १८३६ च्या अमेरिकेशी झालेल्या टेक्सस संघर्षात त्याची सत्ता गेली तथापि पुन्हा १८४१–४४ या काळात तो राष्ट्राध्यक्ष बनला. टेक्ससच्या प्रश्नावरून अमेरिकेशी युद्ध उद्‌भवले (१८४६–४८) व या मेक्सिकन युद्धाच्या अंती झालेल्या तहानुसार बराच मोठा प्रदेश मेक्सिकोला गमवावा लागला. १८४८–५५ पर्यंत सांता आना हा राष्ट्राध्यक्ष होता. १८५७ मध्ये काही उदारमतवादी नेत्यांनी एक नवीन राज्यघटना तयार केली आणि सांता आनाची सत्ता संपुष्टात आली. मेक्सिकोची ही राज्यघटना अत्यंत महत्त्वाची आहे. चर्चची मालमत्ता शासनाने ताब्यात घेतली. लष्कराचे विशेष अधिकार कमी करण्यात आले. मात्र या संविधानामुळे देशात यादवी युद्धास तोंड फुटले.

बेनितो ह्‌वारेस हा या क्रांतिकारक उदारमतवादी पक्षाचा प्रभावी नेता होता. १८५८–६१ दरम्यान विरोधकांशी झालेल्या लढायांत ह्‌वारेसने यश संपादन केले. सनातन्यांनी फ्रान्सच्या तिसऱ्या नेपोलियनच्या मदतीने मेक्सिकोत पुन्हा एकदा फ्रेंचाची सत्ता आणली (१८६४–६७). मॅक्सिमिल्यन गा मेक्सिकोचा सम्राट म्हणून घोषित करण्यात आला परंतु त्याला फ्रान्सकडून मिळणारी मदत पुढे बंद झाली आणि ह्‌वारेसने पुन्हा त्याचा पाडाव केला.

पॉर्फिऱ्यो दीआस याने १८७६ साली सशस्त्र उठाव करून राष्ट्राध्यक्षपद बळकावले व १८८०–८४ एवढा काळ वगळता पुढे १९११ पर्यंत तोच सत्तेवर राहिला. या काळात देशाचा आर्थिक-औद्योगिक विकास झाला. मात्र आर्थिक विषमता व गरिबी वाढतच गेली. लोकशाहीच्या फसव्या बुरख्याखाली एका विशिष्ट गटाचेच शासन देशात होते.


मेक्सिकोची प्रसिद्ध क्रांती १९१० साली सुरू झाली. फ्रांथीस्को मादेरो हा तिचा नेता होय. मादेरोला लोकांचा पाठिंबा मिळाला आणि दीआसला १९११ मध्ये राजीनामा द्यावा लागला. मादेरो आदर्शवादी असला, तरी प्रत्यक्षात त्याचा प्रभाव कमी होता. सनातनी व क्रांतिकारक या दोहोंनी त्याला विरोध केला. १९१३ साली मादेरोचा खून झाला. त्यानंतर आलेल्या वेर्ता याच्या हुकुमशाही राजवटीचा शेवट १९१४ मध्ये झाला. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष वुड्रो विल्सन यांनी त्यावेळी या हुकुमशहाला मदत करण्याचाही प्रयत्न केला होता. त्यानंतर कारांसा हा राष्ट्राध्यक्ष झाला (१९१५) तरीही गनिमी क्रांतिकारकांचे लहानमोठे उठाव देशांत होतच राहिले. त्यांपैकी फ्रांथीस्को फ्रांको व्हिया व एमिल्यानो सापाता हे दोन नेते उल्लेखनीय आहेत. १९१६ साली व्हियाने अमेरिकन प्रदेशांत छापे घातले आणि त्यांतून अमेरिकन प्रतिकार मोहीम अल्पकाळ निर्माण झाली. १९१७ साली कारांसाने नवी राज्यघटना अमंलात आणली. तिच्यावर १८५७ च्या राज्यघटनेची छाप होती. तथापि देशातील खनिज सामग्रीचे राष्ट्रीयीकरण, इंडियन लोकांना त्यांच्या जमिनी परत देणे, चर्च आणि शासन अलग करणे, त्याचप्रमाणे शैक्षणिक, जमीनविषयक व कामगारविषयक सुधारणा करणे इ. महत्त्वाच्या तरतुदी या नव्या राज्यघटनेचा होत्या तथापि त्यांची अंमलबजावणी झाली नाही. १९२० साली ज. ओब्रेगॉन हा कारांसाचा पूर्वीचा लष्करी प्रमुख अध्यक्ष झाला. तसेच मोठ्या प्रमाणावर शाळा सुरू करण्यात आल्या. त्यानंतर प्लूटार्को कायेस हा अध्यक्ष झाला. भूधारणविषयक व शैक्षणिक सुधारणांचे कार्य त्याने पुढे नेले. मात्र खनिज तेल उत्पादनातील अमेरिका आणि चर्च यांच्याशी संघर्ष होऊ लागले. कॅथलिक पंथीयांनी ‘लाँग लिव्ह क्राइस्ट द किंग’ असे घोषवाक्य घेऊन देशभर उघड बंडाळी सुरू केली. १९२६–२९ या काळात चर्चप्रणीत सर्व शाळा व धार्मिक सेवा बंद होत्या, अमेरिकन राजदूत ड्‌वाइट मॉरो याच्या मध्यस्थीने वरील दोन्ही प्रश्नांची तीव्रता पुढे कमी झाली. १९२८ मध्ये ओब्रेगॉन परत राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून आला पण लगेचच त्याचा खून झाला. नंतर १९३४ पर्यंत इतर राष्ट्राध्यक्षांच्या राजवटी आल्या आणि गेल्या पण कायेस याचा राजकीय प्रभाव टिकून राहिला. त्याने १९२९ साली राष्ट्रीय क्रांतिकारक पक्षाची स्थापना केली. या पक्षाचे पुढे १९४६ मध्ये ‘इन्स्टिट्यूशनल रेव्होल्यूशनरी पार्टी ‘ असे नामांतर करण्यात आले. मेक्सिकोतील हा आजतागायतचा प्रमुख सत्ताधारी पक्ष होय. १९३४ साली लाथारो कार्देनस हा राष्ट्राध्यक्ष झाला. तळागाळातल्या लोकांच्या प्रश्नांना त्याने महत्त्व दिले तसेच इंडियन लोकांना शासनाला एक एकात्म घटक बनविण्याचा प्रयत्न केला. इंडियनांना त्याने जमिनींचे वाटप केले आणि कामगार चळवळीला पाठिंबा दिला. त्याच्या कारकीर्दीत रेल्वेचे आणि खनिज तेल उत्पादनाचे राष्ट्रीयीकरण तसेच मोठ्या प्रमाणावर शाळा स्थापन करण्यात आल्या. आरोग्यसेवा, वाहतूकव्यवस्था इ. सुधारणाही त्याने केल्या. जमिनीचे पुनःप्रापण करण्याच्या योजना आणि जलविद्युत् व औद्योगिक प्रकल्पांची सुरुवात त्याने केली. चर्चबरोबर त्याने समेट घडवून आणला. १९४० साली राष्ट्राध्यक्ष बनलेल्या मॅन्युएल कामाचो याच्या राजवटीत मात्र वरील विविध सुधारणांची गती थोडीशी मंदावली. दुसऱ्या महायुद्धात मेक्सिकोने १९४२ पासून दोस्त राष्ट्रांच्या बाजूने भाग घेतला.

दुसऱ्या महायुद्धोत्तर काळात मेक्सिकोचा मोठ्या प्रमाणावर आर्थिक विकास घडून आला पण त्याचे फायदे सामान्य जनतेपर्यंत पोचले नाहीत. मीगेल आलेमन या राष्ट्राध्यक्षाच्या राजवटीत (१९४६–५२) मोठे जलसिंचन व जलविद्युत् प्रकल्प उभारण्यात सुरुवात झाली आणि औद्योगिकीकरणाचा वेग वाढला. या काळात ‘इंटर अमेरिकन हायवे’ हा महामार्ग बांधण्यात आला व त्यामुळे पर्यटन व्यवसायाचाही मोठा विकास झाला. लोहमार्गांचाही विस्तार झाला. करपद्धतीत सुधारणा, जमिनींचे पुनर्वाटप, ग्रामीण भागातील शिक्षणाच्या सोयी इ. सुधारणा करण्यात आल्या.

अमेरिकेशी असलेले मेक्सिकोचे संबंध मित्रत्वाचेच राहिले. टेक्सस प्रदेशातील सरहद्दीचे भांडण तह करून (१९६४–६७) तसेच कोलोरॅडो नदीच्या जलपुरवठ्यासंबंधीचा प्रश्नही मिटविण्यात आला (१९६५) तरीही क्यूबाशी या देशाने राजनैतिक संबंध अबाधित राखले. १९६२ च्या संघर्षात मात्र या देशाने अमेरिकेला पाठिंबा दिला.

१९७० साली लुईश आल्व्हारेथ अध्यक्ष झाला. १९१० च्या मेक्सिकन क्रांतीचे चैतन्य पुन्हा निर्माण करण्याचा त्याने प्रयत्न केला. मात्र उजव्या आणि डाव्या विचारप्रणालीच्या विद्यार्थिवर्गांतील संघर्ष, गनिमी युद्धतंत्र वापरणारे बंडखोर इत्यादींचे गालबोट त्याच्या राजवटीला लागलेच. कॅथलिक चर्चमध्येही डाव्या विचारसरणीचे आणि सनातनी यांच्यातील वाद निर्माण झाला.

१९७० नंतरच्या काळात काही जुनी राजकीय दुखणी निर्माण झाली. लोकसंख्येची वेगवान वाढ, गतिमान नागरीकरण, वाढती बेकारी आणि अमर्याद चलनवाढ यांची पार्श्वभूमी त्यांस होती. देशात एकाच पक्षाची सत्ता दीर्घकाळ कायम होती. एकपक्षीय लोकशाही हे असंतोषाचे एक कारण होते. दुसरे कारण आर्थिक विकासाची विषम वाटणी. श्रीमंत अधिक श्रीमंत व गरीब अधिक गरीब होत गेले. यातूनच छोट्या-मोठ्या गनिमी टोळ्यांचे हिंसाचार, राजकीय नेत्यांची पळवापळव, शेतकऱ्यांच्या जमीन बळकाव मोहिमा आणि विद्यार्थी निदर्शने इ. समस्या निर्माण झाल्या. ऑलिंपिक क्रीडासामन्यांपूर्वी (१९६८) मेक्सिको सिटीच्या मध्यवर्ती चौकात झालेली विद्यार्थ्यांची उग्र निदर्शने व शेकडो व्यक्तींची प्राणहानी (२ ऑक्टोबर, १९६८) हे या परिस्थितीचे निदर्शक आहे. 

१९७६ साली जोस पोर्टिलो राष्ट्राध्यक्ष बनला. त्याचवेळी फार मोठ्या खनिज तेल साठ्यांचा शोध लागला. १९८१ पर्यंत देशाच्या एकूण निर्यातमूल्यांपैकी दोन-तृतीयांशहून अधिक वाटा या नैसर्गिक तेलाचा होता. त्यानंतर मात्र खनिज तेलाचे आंतरराष्ट्रीय दर घटले. त्यामुळे देशाच्या आर्थिक परिस्थितीवर अत्यंत विपरीत परिणाम झाला. बेकारी व्यापाराची पीछेहाट व चलनवाढ यांमुळे आर्थिक समस्या तीव्र झाल्या. त्यासाठी शासनाने १९८२ साली पेसो या चलनाचे ६३ टक्क्यांनी अवमूल्यन केले. खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण, परदेशी विनिमय व्यवहारांवर सक्त नियंत्रणे, अमेरिकेकडून व आंतरराष्ट्रीय बँकेकडून तातडीची मदत इ. मार्गांनी देशाचा आर्थिक समतोल सावरण्याचा प्रयत्न केला जात आहे. १९८२ साली मीगेल हुतार्दो हा अध्यक्ष झाला. आर्थिक विषयातील तो तज्ञ आहे. सरकारी खर्च व चलनवाढ यांवरील नियंत्रणे, काटेकोर आर्थिक नियोजन, परराष्ट्रीय धोरणातील स्वायत्तता आणि सामाजिक न्याय इ. सुधारणांच्या आधारे नैतिक नूतनीकरण करण्याचे धोरण स्वीकारलेले त्याने जाहीर केले आहे.

मेक्सिकोच्या लोकशाही प्रजासत्ताक संघराज्याचे शासन १९१७ च्या वेळोवेळी दुरुस्त केलेल्या संविधानानुसार चालते. देशात ३१ राज्ये व मेक्सिको सिटी हा एक संघजिल्हा असून, प्रत्येक राज्य अतंर्गत बाबतीत स्वतंत्र आणि सार्वभौम आहे. या सर्व राज्यांचे मिळून देशाचे संघराज्य बनलेले आहे. १८ वर्षांवरील सर्व नागरिकांना मतदानाचा हक्क आहे. संघराज्याचे विधिमंडळ द्विसदनी आहे. त्यांपैकी कनिष्ठ सभागृहात (चेंबर ऑफ डेप्युटीज) तीन वर्षांसाठी ४०० लोकप्रतिनिधी निवडण्यात येतात. त्यांपैकी १०० सदस्य हे प्रमाणशीर प्रतिनिधित्व पद्धतीने निवडले जातात. वरिष्ठ गृहात ६ वर्षांच्या मुदतीसाठी प्रत्येक राज्याचे व संघजिल्ह्याचे प्रत्येकी दोन असे एकूण ६४ प्रतिनिधी असतात. संघराज्याच्या विधिमंडळाचे-जनरल काँग्रेसचे-सप्टेंबर ते डिसेंबर या महिन्यांत अधिवेशन असते. वर्षाच्या उर्वरित काळात १५ डेप्युटी आणि १४ सीनेटर यांची एक कायमची समिती कामकाज पाहते. राष्ट्राध्यक्ष हा राज्याचा आणि शासनाचा घटनात्मक प्रमुख असतो. ६ वर्षांसाठी त्याची निवड केली जाते. मंत्रिमंडळ, वरिष्ठ सैनिकी व प्रशासकीय अधिकारी यांची नेमणूक राष्ट्राध्यक्ष करतो. ‘नॅशनल रेव्होल्यूशनरी इन्स्टिट्यूशन’ हाच देशातील प्रमुख राष्ट्रीय पक्ष असून ४ जुलै १९८२ च्या निवडणुकीत कनिष्ठ गृहात या पक्षाचे ३०० पैकी २९९ प्रतिनिधी निवडून आले. देशाचे विद्यमान राष्ट्राध्यक्ष मीगेल हुतार्दो हे त्याच वेळच्या निवडणुकीत निवडून आले.

मेक्सिको सिटी हा संघजिल्हा आहे. राष्ट्राध्यक्ष त्यावर राज्यपालाची नेमणूक करतो. प्रत्येक राज्याचे स्वतंत्र संविधान असून तेथील राज्यपाल ६ वर्षांसाठी निवडून दिले जातात. राज्यांतील विधिमंडळ एकसदनी असते. तीन वर्षांसाठी त्यावर लोकप्रतिनिधी निवडले जातात.


देशात लष्करी शिक्षण सक्तीचे नाही, तथापि लोकसेवेत अर्धवेळ काम करणे आवश्यक आहे. देशात ३५ भूसेना विभाग आहेत. १९८५ अखेर एकूण भूसेना ९५,००० होती. देशाची नौसेना सुसज्ज आहे. ५ नाविक सैनिकी विभाग आखाती भागात, ११ पॅसिफिक किनाऱ्यावर असून ६ नौसैनिकी हवाईतळ आहेत. नौसेनेचे बळ २३,६५० (१९८५) होते. वायुसेनेत ५,५०० सैन्य व अधिकारी आहेत. तिचे ९ कार्यकारी गट आहेत. देशात सैनिकी प्रशिक्षणाची अकादमी आहे.

राष्ट्राध्यक्ष देशातील सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची ६ वर्षांसाठी नेमणूक करतो, मात्र त्यांस वरिष्ठ गृहाची मान्यता असावी लागते. सर्वोच्च न्यायालयात २१ न्यायाधीश आहेत. त्याखालोखाल १२ विभागीय न्यायालये आणि ९ त्यांखालील न्यायालये, तसेच ६८ जिल्हा न्यायालये देशात आहेत. प्रत्येक राज्य स्वतःचे न्यायाधीश नेमू शकते. १९३० च्या दंडसंहितेप्रमाणे मृत्युदंड रद्द करण्यात आला आहे. व्यक्तिगत मूलभूत हक्कांच्या रक्षणासाठी बंदी-प्रत्यक्षीकरणाची तरतूद देशाच्या संविधानात आहे.

परराष्ट्रीय धोरणात मेक्सिकोचा कल अमेरिकेच्या बाजूचा आहे तथापि क्यूबाशी त्यांचे राजनैतिक संबंध टिकून आहेत.

आर्थिक स्थिती : देशातील सु. ८०% जमीन शेतीला पोषक नाही कारण पर्जन्याचे प्रमाण अत्यल्प आहे. देशात कृषिभूमिविषयक सुधारणा करण्यासाठी ग्रामीण समूहांना बऱ्याच जमिनीचे वाटप करण्यात आले तथापि आर्थिक व तांत्रिक मदतीच्या अभावी या सुधारणेमुळे शेती उत्पादन मात्र अपेक्षेप्रमाणे वाढले नाही. शेतीखालील क्षेत्र २१९ लक्ष हे. चराऊ प्रदेश ७४४ लक्ष हे. वनविभाग ४८१ लक्ष हे. नगदी पिकांचे क्षेत्र १६ लक्ष हे. देशात आढळते. १९८० साली अन्नधान्याबद्दल स्वयंपूर्णता आणण्यासाठी एक मोठी मोहीम उघडण्यात आली. मका हे प्रमुख पीक असून त्याखालोखाल कडधान्ये व गहू ही पिके येतात. यांशिवाय कापूस, ऊस, वाटाणे, कॉफी, भाजीपाला इ. नगदी पिके देशात होतात. संत्री, केळी, लिंबे, अननस, सफरचंद, द्राक्षे, आंबे इ. फळांचेही उत्पादन घेतले जाते. कॉफी आणि साखर यांची निर्यात केली जाते तथापि देशातंर्गत साखरेचे सेवन फार मोठे आहे. शेतीचे यांत्रिकीकरण झाले असून देशात १९८२ साली १,४६,०८३ ट्रॅक्टर होते.

देशातील पशुधन पुढीलप्रमाणे : गुरे ३·७५ लक्ष मेंढ्या ६३ लक्ष डुकरे १·९४ लक्ष घोडे ६० लक्ष बकऱ्या ९८ लक्ष खेचरे ३१ लक्ष गाढवे ३१ लक्ष व कोंबड्या २०·४ लक्ष (१९८३).

देशातील वनक्षेत्र ४८१ लक्ष हे. असून पाइन, स्प्रूस, सीडार, मॅहॉगनी, रोजवुड, लॉगवुड इ. वृक्षविशेष यात आढळतात. देशात १४ सुरक्षित वने आणि ४७ राष्ट्रीय उपवने आहेत. देशातील लाकूड उत्पादन आणि मत्स्योत्पादन महत्त्वाचे आहे. सार्डीन, कोळंबी, शार्क इ. विविध प्रकारचे मासे येथे सापडतात. १९८३ साली ९,७२,६२७ टन मत्स्योत्पादन झाले. देशातील नैसर्गिक तेल आणि वायू यांचे उत्पादन मोठे आहे. १९३८ साली तेलखाणींचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. तेलाचे उत्पादन, शुद्धीकरण, विक्री इ. कामांसाठी स्वतंत्र शासकीय यंत्रणा आहे. मेक्सिकोच्या आखाताजवळ तसेच देशाच्या आग्नेयीस व दक्षिणेस नैसर्गिक वायूचे व तेलाचे मोठे साठे सापडले आहेत. सागरांतर्गत तेलविहिरीही आहेत. अलीकडे प्रमुख उत्पादन त्यांतूनच मिळते. १९८४ साली अशुद्ध खनिज तेलाचे उत्पादन १५ कोटी टन होते. १९५९ साली देशातील ४ राज्यांत युरेनियमचे साठे आढळून आले. १९८३ साली चांदी व सोने यांचे उत्पादन अनुक्रमे १,९११ टन व ६,९३० किग्रॅ. असे होते. देशात दगडी कोळशाचे साठेही भरपूर असून त्याचा दर्जाही चांगला आहे. यांखेरीज शिसे, तांबे, जस्त, लोहखनिज, गंधक, मँगॅनीज अशी इतरही खनिजे आढळतात.

देशाच्या औद्योगिक क्षेत्रात, कारखानदारी, कृषिउद्योग, खाणकाम, खनिज तेल रसायन उद्योग, बांधकाम उद्योग आणि सर्वसामान्य सेवा उद्योग असे प्रमुख घटक आहेत. त्यांपैकी मोटारगाड्या, पोलाद, खनिज तेल रसायन उत्पादने आणि खते हे अत्यंत विकसित असे राष्ट्रीय उद्योग आहेत. पर्यटन हाही अत्यंत महत्त्वाचा आणि विकसित उद्योग आहे. देशाच्या निर्यातीत मुख्यतः अशुद्ध खनिज तेल, कॉफी व मोटारगाड्या तर आयातीत मका, कडधान्ये, वाहतुकीची साधने, यांत्रिक उपकरणे यांचा अंतर्भाव होतो. देशाचा आंतरराष्ट्रीय व्यापार मुख्यतः अमेरिका, फ्रान्स, प. जर्मनी, ग्रेट ब्रिटन इ. देशांशी चालतो.

पेसो हे मेक्सिकोचे चलन आहे. १ अमेरिकी डॉ. = २०३ पेसो असा विनिमय दर होता (१९८५). बँक ऑफ मेक्सिको ही मध्यवर्ती बँक (स्था. १९२५) असून १९८२ साली देशातील खाजगी बँकांचे राष्ट्रीयीकरण करण्यात आले.

देशात वीजनिर्मितीची ४९८ संयंत्रे असून देशातील उद्योगधंद्यांना पुरेसा वीज पुरवठा करण्यात येतो. कामगार संघटना या सत्ताधारी राजकीय पक्षाच्या एकात्म अशा शाखा किंवा यंत्रणा आहेत. देशातील अशा संघटनांची संख्या सु. १८,००० व सदस्यसंख्या सु. २० लक्ष आहे. कामगार संघटनांचे ५ प्रमुख संघीय विभाग आहेत. सत्ताधारी पक्षाचा एक अधिकृत घटक म्हणूनच कामगार संघटना काम करतात. देशात व्यापारी संघटना असून प्रत्येक उद्योगासाठी व व्यापारासाठी त्या त्या संघटनेचे सदस्यत्व असते. चेंबर ऑफ कॉमर्स तसेच इंडस्ट्रियल चेंबर्स या त्यांपैकी मोठ्या संघटना होत.

देशातील सडकांची एकूण लांबी २,१४,०७३ किमी. पॅन अमेरिकन हायवेसह असून १५,६६७ किमी. लांबीचे लोहमार्ग होते (१९८४). रेल्वेचे १९३७ साली राष्ट्रीयीकरण करण्यात आले. मेक्सिको सिटीमधील भुयारी रेल्वेमार्ग ७८ किमी. लांबीचा आहे (१९८२). देशात एकूण ३२ आंतरराष्ट्रीय व ४० देशांतर्गत विमानतळ आहेत. देशातील हवाई वाहतूक उत्तम मानली जाते. देशात ४९ सागरी बंदरे आहेत. तेथून देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीच्या सर्व सुविधा आढळतात. मालाची वाहतूक आणि प्रवासी सेवा यांसाठी जलमार्गांचा मोठाच उपयोग होतो. देशात दूरध्वनी आणि तारायंत्र सेवा उपलब्ध असून ती शासनाच्या अखत्यारीत आहे.

मेक्सिकोत १,०१४ व्यापारी नभोवाणी केंद्रे असून ४७ शासकीय सांस्कृतिक नभोवणी केंद्रे होती (१९८२). तसेच १९१ व्यापारी दूरचित्रवाणी केंद्रे आणि ८ सांस्कृतिक दूरचित्रवाणी केंद्रे देशात आहेत. मेक्सिकोत एकूण १,७८९ चित्रपटगृहे होती (१९८२). याच वर्षी देशात एकूण ३६३ दैनिके आणि ३६ साप्ताहिके प्रकाशित होत होती. मेक्सिको सिटीमधून अनेक दैनिके प्रसिद्ध होतात. ही सर्व नियतकालिके स्पॅनिश भाषेतील आहेत.


लोक व समाजजीवन: मेक्सिकोतील विद्यमान समाज हा ॲझटेक, माया, झपोटेक इ. अनेक इंडियन जमाती आणि स्पॅनिश वसाहतकार यांच्या वांशिक-सांस्कृतिक मिश्रणातून तयार झाला आहे. आफ्रिकेतील कृष्णवर्णीय हे अल्प प्रमाणात गुलाम म्हणून वसाहतकाळात येथे आले. मेक्सिकन समाजात वांशिक भेदांपेक्षा सांस्कृतिक भेद महत्त्वाचे मानले जातात. १८१० सालच्या क्रांतीनंतरच्या काळात देशात स्वत्वाची, अस्मितेची आणि राष्ट्रीयत्वाची एक नवी जाणीव निर्माण झाली. मेक्सिकन सांस्कृतिक वारशात इंडियनांच्या सांस्कृतिक परंपरेचा अभिमान आहे, त्याचप्रमाणे स्पॅनिश संस्कृतीचा वैशिष्ट्यांविषयी आत्मीयताही आहे.

मेक्सिकन समाजातील लोकसंख्या वाढीचा दर हा लॅटिन अमेरिकेतील इतर देशांपेक्षा अधिक आहे. त्यामुळे १९७३ पासून कुटुंब नियोजनाचे कार्यक्रम शासनातर्फे हाती घेण्यात आले आहेत. मात्र कॅथलिक चर्चचा संततिनियमनाच्या कृत्रिम साधनांना विरोध आहे.

मेक्सिकन समाजात पारंपरिक ग्रामव्यवस्थेत मोठे जमीनदार आणि बहुसंख्य मजूर अशी रचना होती. क्रांत्युत्तर काळात जमिनीचे फेरवाटप झाल्याने ही रचना मोडकळीला आली. १९४० नंतर वाढते औद्योगिकीकरण व नागरीकरण यांमुळे उद्योजक, राजकीय नेते, व्यापारी, तंत्रज्ञ, शास्त्रज्ञ आणि व्यावसायिक असे नवे प्रभावी वर्ग समाजात निर्माण झाले. विद्यमान समाजात ग्रामीण-शहरी, तसेच प्रादेशिक आणि इतर वर्गनिदर्शक असे सामाजिक वर्ग व वर्गवैशिष्ट्ये दिसून येतात. शेतकरी आणि शेतीउत्पन्न यांची मात्र पुरेशी प्रगती होऊ शकली नाही.

देशातील बहुसंख्य (९२·६०%) लोक रोमन कॅथलिक पंथाचे आहेत. १८५७ साली चर्च आणि शासन अलग करण्यात आले आणि १९१७ च्या संविधानानुसार चर्चची मालमत्ता ही शासनाची मालमत्ता समजण्यात येऊ लागली. १९२० ते ३० च्या दरम्यान धर्मसंस्थेचा राजकीय प्रभाव कमी करण्याचा शासनाने प्रयत्न केला. देशात प्रॉटेस्टंट पंथाचे (३·३%) आणि इतर धर्मांचे (४·१%) लोक आहेत.

देशात प्राथमिक व माध्यमिक शिक्षण सक्तीचे, मोफत व धर्मनिरपेक्ष आहे. ख्रिस्ती धर्मगुरूंना प्राथमिक शाळा काढण्यास बंदी आहे. शिक्षण हा राज्याच्या अखत्यारीतील विषय आहे. मेक्सिको सिटीमधील राष्ट्रीय स्वायत्त विद्यापीठ जुने व महत्त्वाचे आहे (स्थापना १५५१). १९२० पासून त्याला पूर्ण स्वायत्तता देण्यात आली आहे. या शहरात तंत्रविद्या आणि उपयोजिता विज्ञान यांचे प्रसिद्ध मोठे विद्यापीठ आहे. देशात अन्यत्र मोठी विद्यापीठे आहेत. १९८२–८३ सालची शैक्षणिक आकडेवारी पुढीलप्रमाणे-पूर्वप्राथमिक शाळा २३,३०५ प्राथमिक शाळा ७७,९०० माध्यमिक शाळा १५,५०९ १९८१–८२ मध्ये धंदेशिक्षण शाळा २,१६३ शिक्षक-प्रशिक्षण संस्था ५१२ उच्च माध्यमिक शाळा १९४१.

देशात १९८० साली ६६,३७३ डॉक्टर, ६,३१५ रुग्णालये आणि दवाखाने होते. त्यांतून उपलब्ध खाटांची संख्या ८२,७१७ होती. देशातील समाजकल्याणविषयक कार्य ‘सामाजिक सुरक्षा संस्थे’ मार्फत चालते. कुपोषणविषयक समस्यांना तोंड देण्यासाठी राज्य सरकारांनी काही योजना हाती घेतल्या आहेत. आरोग्यसेवेची केंद्रे देशात विशेष महत्त्वाची आहेत तथापि गरिबांसाठी कल्याणकारी योजना मात्र देशात अभावानेच आढळतात.

भाषा-साहित्य: मेक्सिकन साहित्य हे स्पॅनिश भाषेतील एक वैशिष्ट्यपूर्ण दालन मानले जाते. विसाव्या शतकात देशातील मुद्रण आणि प्रकाशन व्यवसाय वेगाने विकसित झाला. मेक्सिकन साहित्यपरंपरेत ॲझटेक, माया आणि इतर इंडियन जमातींच्या लोकवाङ्‌मयाचा वाटा मोठा आहे. हे लोकसाहित्य आता स्पॅनिश भाषेतून प्रकाशित झाले आहे. त्यात सृष्टिनिर्मितीच्या पुराणकथा, धार्मिक विधींच्या कहाण्या, त्याचप्रमाणे पारंपरिक वैद्यक, शेती, सण-उत्सव यासंबंधीच्या गोष्टींचाही अंतर्भाव होतो. वसाहतकाळात कोर्तेझने स्पेनच्या राजाला लिहिलेली पाच पत्रे प्रसिद्ध आहेत. आपल्या बंडखोरीचे समर्थन त्यांत त्याने केले आहे. वसाहतींच्या मोहिमांचा इतिहास सांगणारे ग्रंथही त्याच काळात झाले. सतराव्या शतकातील मानवतावादी कवी बेर्नार्दो द बाल्‌ब्वेना याने मेक्सिकोच्या निसर्गाचे आणि लोकजीवनाचे सुंदर वर्णन केले आहे. ह्वाना आलॉर्कन हा सतराव्या शतकातील नाटककार प्रसिद्ध आहे. ह्वाना ईनेस द ला क्रझ ही जोगीण तिच्या आत्मचरित्रपर कवितेबद्दल प्रसिद्ध आहे. तत्कालीन स्त्रीवरील अन्यायाचे आणि बंधनांचे वर्णन त्या काव्यात आढळते. फर्स्ट ड्रीम ही तिची प्रसिद्ध तात्त्विक दीर्घकविता. एकोणिसाव्या शतकात मेक्सिकन कादंबरी उदयास आली. शासनाचे आणि चर्चचे निर्बंध सांभाळून सामाजिक आणि शैक्षणिक प्रश्नांचे दर्शन तत्कालीन पत्रकार लीसार्दी याच्या द इचिंग पॅरट या कादबंरीत घडते. अल्ता मिरानो या इंडियन कादंबरीकाराची द झार्को ही कादंबरी प्रसिद्ध आहे. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस निकाराग्वातील कवी रूबेन दारीओ आणि फ्रेंच प्रतीकवादी यांच्या काव्याचा परिणाम मेक्सिकन कवितेवर झाला. विसाव्या शतकात मेक्सिकन कवितेचा अधिक विकास झाला. त्यापैकी होसे गोरोस्तीझा या कवीची एन्डलेस डेथ ही कविता मृत्यूच्या कल्पनेशी सतत झगडणाऱ्या मेक्सिकन मनोवृत्तीची निदर्शक आहे. ऑक्टेव्हिया पास याच्याही कविता राष्ट्रीय आणि वैश्विक आशयाच्या आहेत. त्याचे निबंलेखनही प्रसिद्ध आहे. यूसिग्ली हा नाटककार त्याच्या ऐतिहासिक नाटकांसाठी विशेष प्रसिद्ध आहे. अल्फांसो रेस आणि होसे व्हाशकॉन्सेलूश हे दोन प्रसिद्ध विचारवंत लेखक आहेत. १९३० नंतरच्या काळात देशातील तत्कालीन राजकीय घडामोडींसंबंधी कथा-कादंबऱ्या लिहिणारे लेखक पुढे आले. १९४० नंतरच्या काळात डाव्या विचारसरणीच्या लेखकांचे कथा, उपरोध, विनोद इ. दृष्टींनी वैशिष्ट्यपूर्ण लेखन प्रकाशित होऊ लागले.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात अनेक लेखिकाही पुढे आल्या. रोझार्यो कास्तेयानोस हिने इंडियन लोक आणि विशेषतः स्त्रियांचे बदलते कार्य यांसंबंधी चांगले लेखन केले आहे. विद्यमान मेक्सिकन साहित्य हे प्रयोगशीलता आणि परंपरा यांचे नवे आविष्कार दर्शविणारे आहे.

जाधव, रा. ग.

कला: मेक्सिको येथील कलापरंपरा फार प्राचीन आहे. वसाहतपूर्वकालीन संस्कृतीतील मेक्सिकन कला वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्या काळातील कलावशेषांत आलंकारिकता, आकारांना उत्स्फूर्त रूप देण्याचे सामर्थ्य व भावाविष्कार हे गुण दिसून येतात. ह्या पुरातन संस्कृतीचे महत्त्वाचे अवशेष इ. स. च्या सुरुवातीपासून पहावयास मिळतात. त्यांत सर्वांत प्राचीन वास्तूंच्या अवशेषांत कुईकुईल्को येथील मंदिराच्या गोल पायावरील कोनाकृती स्तंभ व त्लातिल्को संस्कृतीतील अत्‌झ्कापोत्झाल्को येथील मृत्पात्री व पक्वमृदेतील नग्न स्त्रीप्रतिमा यांचा उल्लेख करता येईल. पुढे पाचव्या शतकापासून ह्या संस्कृतीचा विस्तार मेक्सिकोच्या आखाती भागात झाला. वास्तेक, तोतोनॅक, ओलमेक व तेरेस्कन ही या संस्कृतीची मुख्य केंद्रे होती. ह्या काळातील शिल्पांत विविध प्रकारची शिरस्त्राणे घातलेल्या नग्न मूर्ती, ओलमेक भागात खडकात खोदलेले अनेक भव्य मानवी चेहरे, पाषाणस्तभांवर कोरलेल्या, लहान मुले घेतलेल्या व सर्पमुखातून बाहेर येणाऱ्या मानवाकृती इ. उल्लेखनीय आहेत. ओलमेक कलाकारांची खरी प्रतिभा त्यांनी कोरलेल्या, नवसपूर्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या कुऱ्हाडींच्या अवशेषांत व ‘बॉल गेम’ ह्या धार्मिक विधीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘यू’ आकाराच्या, सुंदर, कोरीवकाम केलेल्या आकृत्यांत दिसून येते. ह्या संस्कृतीचा सर्वांत विकसित भाग म्हणजे ⇨ माया संस्कृती. या संस्कृतीतील वास्तुकला, शिल्पकला, चित्रकला यांचे उत्कृष्ट नमुने तीकाल, पालेंके, कोपान या ठिकाणी सापडले आहेत. पालेंके ह्या भागातील राजवाडा, क्रॉस व सूर्यमंदिरे ही हवेशीरपणा व सौंदर्य ह्या दृष्टींनी अपूर्व आहेत. तसेच शिलालेख असलेले, पिरॅमिडवरील मंदिर व त्याखालील दगडावरील नक्षीकाम केलेले भुयार उल्लेखनीय आहे. तीकाल व कोपान ह्या भागांत भव्य व अप्रतिम कोरीवकाम केलेली मंदिरे व पाषाणात खोदलेल्या भव्य मूर्ती आहेत. माया अभिजात काळातील वास्तुशिल्प, दगडातील कोरीवकाम, लहान पुतळे, शिल्पे तसेच बोनांपाक येथील मंदिर व त्यातील भित्तिचित्रे उल्लेखनीय आहेत. या संस्कृतीच्या अभिजात युगानंतर नवनव्या कल्पना व कलाविष्कार ह्यांचा मूळ माया संस्कृतीशी समन्वय साधला जाऊन त्यातून भव्य वास्तुशिल्पे साकारली गेली. चीचेन ईत्सा व तूला येथे खोदकाम व शिल्पे असलेली भव्य पिरॅमिड्स उभारली गेली.


मायाच्या पश्चिमेस दक्षिण किनाऱ्यावर झपोटेक व मीक्सतेक संस्कृतींची ख्रिस्ती काळात वाढ झाली. त्याचे मोंते अल्बान हे मुख्य केंद्र होते. तेथील भव्य पिरॅमिड्स असलेली मंदिरे, धार्मिक व नागर वास्तुशिल्पे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. मीत्ला येथील वास्तूवरील भौमितिक अलंकरण व नक्षीकाम अप्रतिम आहे. तसेच ह्या काळातील मृत्स्नाशिल्पे व हस्तलिखितेही प्रसिद्ध आहेत. येथील ह्याच खोऱ्यातील तेओतीवाकान हे शहर त्याच्या सुरेख आखणीबद्दल प्रसिद्ध आहे. येथील पिरॅमिड्सची सूर्य व चंद्र मंदिरे त्यांच्या भव्यतेमुळे आकर्षक वाटतात. तसेच तेतिल्ला व तेपांतिल्ला येथील वास्तूंतील भित्तिचित्रे विशेष उल्लेखनीय आहेत. तूला ही राजधानी असलेल्या तॉल्तेक संस्कृतीचा उदय ९०० ते १२०० च्या सुमारास झाला. या संस्कृतीत अनेकविध वास्तुशिल्प शैली उदयास आल्या व त्यांचा प्रभाव नंतर येणाऱ्या ⇨ ॲझटेक संस्कृतीवर झाला. ॲझटेकांनी तेनॉचतित्लान ही आपली राजधानी १३२५ च्या सुमारास वसवली. तत्कालीन अमेरिकेतील हे सर्वांत मोठे शहर होते. ह्या शहरात जाण्यास भव्य मार्ग होता व आतील रस्त्यांची सुंदर आखणी केली होती, तसेच शहरातून अनेक कालवे काढले होते. हे शहर प्रसिद्ध धार्मिक केंद्रही होते. तिथे अनेक पिरॅमिड्स असलेले पर्जन्यदेवतेचे चौरस मंदिर व युद्धदेवतेचे मंदिर ह्या प्रसिद्ध वास्तू होत्या. ह्या शहराचा १५२१ साली स्पॅनिश आक्रमकांनी विध्वंस केला. ॲझटेक काळातील मूर्तिकला भव्यता व अस्सलपणा ह्या गुणांच्या दृष्टीने अजोड होती व कलेतिहासात ती अप्रतिम समजण्यात येते. ॲझटेकांच्या पंचांगाचे कोरीव पाषाणशिल्प हे विशेष उल्लेखनीय आहे.

हिस्पनो-मेक्सिकन संस्कृतीचा काळ सु. १५२३ पासून मानला जातो. मेक्सिकोवर स्पॅनिश लोकांचे आक्रमण झाले व त्यानंतर तिथे पाश्चिमात्य कलेचा उगम झाला. त्यांत तिथे आलेल्या ख्रिस्ती धर्मगुरूंचा फार मोठा वाटा आहे. त्यांनी रोमनेस्क, गॉथिक व प्रबोधन शैलींचे मिश्रण असलेल्या चर्चवास्तू, भव्य इमारती, पटांगणे, आश्रम, बगीचे, कालवे व शहरे बांधली व धार्मिक उद्‌बोधनाकरिता वास्तूंवर भित्तिचित्रे रंगवली. चर्चवास्तूंना सुंदर शिल्पांनी सुशोभित केले. १५७२ साली जेझुइट लोक आले व त्यामुळे धर्मगुरूंचे प्राबल्य बरेच वाढले. त्यांनी अनेक नागर व धार्मिक वास्तू बांधल्या. विद्यालये, दवाखाने, गिरिजाघरे, राजवाडे व भव्य प्रासाद ह्यांची उभारणी केली. ह्या वास्तूंमध्ये क्वेर्नाव्हाका येथील कोटस व मेरीढा येथील माँतेजो हे राजप्रासाद प्रसिद्ध आहेत. यूरोपीय शैलीच्या प्रभावाखाली अनेक वास्तू जशा निर्माण झाल्या, तसेच अनेक स्पॅनिश चित्रेही येथे आणली गेली व त्यांच्या प्रभावातून सतराव्या शतकातील अनेक स्थानिक कलाकार धार्मिक चित्रे, मेणाच्या मूर्ती व काष्ठशिल्पे ह्यांत पारंगत झाले. येथील प्राचीन कलेची या स्पॅनिश प्रभावांशी मेळ साधला जाऊन त्यातून मेक्सिकन कलेत एक प्रकारचा गोडवा व रंगसंगतीचे सौंदर्य निर्माण झाले. मेक्सिकन चित्रकारांच्या चित्रांत चमकदार लाल, निळ्या इ. रंगांच्या छटा दिसू लागल्या. ह्या घाटणीचा उल्लेख ‘मेक्सिकन बरोक’ असा होऊ लागला. थोरला बाल्ताझार ज एकोर (१५४८–१६३०) हा मेक्सिकोतील एक ज्येष्ठ चित्रकार मानला जातो. त्यानेच प्रथम स्थानिक कलासंस्थेची स्थापना (१६०९) केली. त्याचे ॲगनी इन द गार्डन (१५८२) हे स्पॅनिश प्रभाव दर्शविणारे एक उल्लेखनीय चित्र होय. याच काळातील आँझो व्हेझ्‌क्वेझ (१५६५–१६०८) ह्या चित्रकाराने काही श्रेष्ठ कलाकृती निर्माण केल्या. सतराव्या शतकाच्या मध्यावधीस चित्रकलेस उतरती कळा लागली तर मूर्तिकला व वास्तुकला ह्यांना उर्जितावस्था आली. ह्याच काळात रोकोको शैली व प्रसिद्ध वास्तुकार होसे चूर्रीगेरा ह्याच्या नावाने ओळखली जाणारी नवीन ‘चूर्रीगेरेस्क’ शैली ह्यांच्या समन्वयातून नवी बरोक शैली उदयास आली. अठराव्या शतकातील चित्रकारांत होसे इब्रा व मीगेल काब्रेरा हे उल्लेखनीय आहेत. एकोणिसाव्या शतकात उदयास आलेल्या होसे मारीआ व्हेलास्को ह्या ख्यातनाम चित्रकाराच्या निसर्गचित्रांतून राष्ट्रीय शैलीचे पुनरूज्जीवन झाल्याचे दिसून येते. त्याचे व्हॅली ऑफ मेक्सिको हे अतिशय प्रभावी चित्र आहे. ह्याच काळात स्थानीय कलेत राजकीय दृष्टिकोण प्रभावी ठरला. होसे ग्वादालूपे पोसादा हा आपल्या उपहासगर्भ मुद्राचित्रांकरिता प्रसिद्ध होता. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यात मॅक्सिमिल्यन ह्या बादशहाच्या दुर्दैवी काळात फ्रान्समधील वास्तुशैली येथे आणण्यात आली. त्याने चापूलतेपेक येथील राजवाडा व अनेक सुंदर बगीचे निर्माण केले. तत्कालीन राष्ट्राध्यक्ष दीआस याने मेक्सिको शहरात पॅसेओ दे ला रिफॉर्मा ह्या भव्य प्रासादाची निर्मिती केली. ह्या सर्व वास्तूंवर फ्रेंच शैलीचा प्रभाव दिसून येतो. त्याच्यावर कोरलेल्या अलंकरणात तो विशेषत्वाने जाणवतो.

मेक्सिकोच्या १९१० च्या क्रांतीनंतर चित्रकारांना शासकीय पाठिंबा व आधार मिळाला व त्यांनी आपल्या कलेत क्रांतीतील राजकीय व सामाजिक आदर्श अभिव्यक्त केले. ह्याच काळात वरील आदर्शांपासून प्रेरणा घेऊन व आधुनिक तंत्रशैलींचा कुशलतेने उपयोग करून सामाजिक व राजकीय विषयांची अभिव्यक्ती घडवणारे अनेक भित्तिचित्रकार उदयास आले. त्यांत द्येगो रीव्हेरा. होसे क्लेमेंते ओरोस्को व डेव्हिड सिकेईरोस हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार होत. त्यांच्या अपूर्व भित्तिचित्रांनी ह्या कलाप्रकारात महत्त्वाची परिवर्तने घडवून आणली. ही कला मानवतावादी व म्हणूनच सर्वमान्य होती. ऐतिहासिक व दैनंदिन जीवन ह्या तिच्या प्रेरणा होत्या. अस्सल सौंदर्य, विलक्षण कल्पकता, भावनांची नाट्यमयता व विषयांचे वैविध्य ही ह्या भित्तिचित्रकलेची काही ठळक वैशिष्ट्ये होत. भित्तिचित्रणाच्या विकासाबरोबरच इतर कलाप्रकारांतही प्रगती घडून आली. मीगेल कोव्हाररूब्यास हा प्रसिद्ध व्यंगचित्रकार व ग्रंथसजावटकार होता. इंडियन शेतकऱ्यांच्या हालअपेष्टा फ्रान्सीस्को गोतिया ह्या चित्रकाराने आपल्या कलाकृतींतून प्रभावीपणे दाखविल्या. रूफीनो तामायो व होसे लूईस क्वाव्हास हे प्रसिद्ध आधुनिक चित्रकार होत.

चित्रकलेबरोबर आधुनिक काळात मेक्सिकोत वास्तुकलेचाही विकास घडून आला. ह्या वास्तुकलेत मूळ मेक्सिकन शैलीतील वैशिष्ट्ये व आधुनिक यूरोपीय व अमेरिकन तंत्रशास्त्र ह्यांचा सुंदर समन्वय दिसून येतो. माँटेरेसारख्या औद्योगिक परिसरात औद्योगिक वास्तुकलेचे उत्कृष्ट नमुने पहावयास मिळतात. मेक्सिको सिटीजवळील मेक्सिकोच्या नव्या राष्ट्रीय स्वायत्त विद्यापीठ नगरीत सुंदर इमारती व मोकळी मैदाने ह्यांचा सुरेख संगम पहावयास मिळतो. ह्या सहकारी प्रकल्पाचे मार्गदर्शन कॉरलॉस लोझो ह्याने केले. प्रसिद्ध वास्तुकार व चित्रकार ह्‌वान गॉर्‌मन ह्याने बांधलेले, चमकदार कुट्टिमचित्रणयुक्त बहिरंग असलेले मध्यवर्ती ग्रंथालय हा वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना होय. प्रख्यात आधुनिक वास्तुशिल्पज्ञ फेलीक्स कँडेला ह्याने अभिव्यक्तिवादी शैलीत बांधलेले ‘न्युस्ट्रा सॅनोरा डेलॉस मिलेग्रॉस’ हे चर्च त्या प्रकारातील उत्तम नमुना मानता येईल. चित्रकला, वास्तुकला ह्यांबरोबरच मेक्सिकोत लोककला व कारागिरी यांचीही भरभराट झाली. सुंदर विणकाम, मृत्स्नशिल्पे व चांदीचे उत्कृष्ट कलाकाम निर्माण झाले. ह्या लोककलेमध्येही अन्य कलांप्रमाणेच मेक्सिकोची राष्ट्रीय पृथगात्मता व लोकमान्यता दिसून येते.

करंजकर, वा. व्यं.


संगीत व नृत्य : मेक्सिकोमध्ये प्रागैतिहासिक काळातील काही वाद्यांचे-उदा., मातीच्या शिट्ट्या वगैरे-अवशेष उपलब्ध झाले आहेत. माया संस्कृतीमध्ये (इ. स. चवथे ते दहावे शतक) धार्मिक विधी-उत्सवांतून संगीत-नृत्याला फार महत्त्वाचे स्थान होते. अशा प्रसंगी संगीताच्या साथीवर नृत्ये केली जात, त्या संगीतातील वाद्यांचा प्रमुख संचालक व गायक यांचे उल्लेख आढळतात. माया संस्कृतीतील उपलब्ध भित्तिलेपचित्रांमध्ये शंख, तुताऱ्या, बासऱ्या, शिट्ट्या, हिरणाच्या शिंगांनी वाजवली जाणारी कासवाची कवचे, लाकडी ओबो, निरनिराळे ढोल आदींची चित्रे पाहावयास मिळतात. ‘तुंकुल’ नामक विशिष्ट लाकडी ढोल हे प्राचीन काळातले प्रमुख वाद्य म्हणता येईल. त्यास ॲझटेकांमध्ये ‘तेपोनाझत्ली’ हे नाव होते. शंख व तुंकुल वाद्यांचा गजर करून लोकांना देवळात जमवत असत. ॲझटेकांचे सांगीतिक जीवन समृद्ध होते. राजेरजवाडे व श्रीमंत वर्गाकडे स्वतःचा गायक-संगीतकारांचा ताफा असे. देवळांतूनही स्तोत्रगायक असत. ॲझटेक वर्षाचे अठरा महिने असून प्रत्येक महिन्यात किमान एखादा तरी उत्सव असेच व त्या प्रत्येक उत्सवाची नाच-गाणी व पोषाख वेगवेगळे असत. मोठ्या उत्सवांतून जवळजवळ ८,००० नर्तक मोठमोठी रिंगणे करून नाचत. पहिल्या दोन-तीन रिंगणांत ज्येष्ठ उमराव-सरदार, धर्मगुरू इ. असत. तरुण मुलामुलींना नृत्य-संगीताचे खास शिक्षण दिले जाई. युद्धातील आज्ञा सर्वदूर पोचवण्यासाठी भयंकर कर्कश आवाजांचे शंख वापरले जात.

वसाहतकाळात चर्चसंगीताच्या प्रकारात बरीच वाढ झाली. चर्च व मठ यांतून धार्मिक संगीताचे शिक्षण देणारी केंद्रे उघडण्यात आली. पेद्रो दे गान्ते याने १५२४ मध्ये तेस्कोको येथे पहिले संगीत विद्यालय स्थापले. तिथे इंडियन आदिवासींना धार्मिक संगीताचे व वाद्ये तयार करण्याचे शिक्षण दिले जाई. १५२७ मध्ये या विद्यालयाचे स्थलांतर मेक्सिको शहरात झाले आणि अल्पावधीतच अनेक चर्च व मठ यांतून संगीतशिक्षणाची केंद्रे फैलावत गेली. सोळाव्या व सतराव्या शतकांतील उल्लेखनीय संगीतकारांत होसे दी लिएनास, एर्नांदो फ्रांको, आंतोन्यो गो सालाझार, होसे मारीआ आल्दाना इत्यादींचा निर्देश करता येईल.

मेक्सिकोच्या लोकसंगीतात आदिवासी इंडियन, निग्रो व यूरोपीय हे तीन प्रवाह येऊन मिसळलेले दिसतात. ‘कॉरिदो’ हे दीर्घकथनपर पोवाडे व ‘कॅन्सिऑन’ हे मेक्सिकोत सर्वत्र रूढ असलेले गीतप्रकार होत. कॉरिदो गीतांतून मेक्सिकन क्रांती, चर्चसत्ता व राजसत्ता यांतील संघर्ष, बहिष्कृत व्यक्ती, शेरीफ इत्यादींचे चित्रण असे विषय सामान्यतः हाताळले जात. गायनाच्या साथीने केल्या जाणाऱ्या नृत्यप्रकारांत सर्वत्र प्रचलित असे ‘सोन’ गेरेरोचे ‘चिलेना’ यूकातानचे ‘जाराना’ गल्फकोस्टचे ‘हुआपँगो’ इत्यादींचा उल्लेख करता येईल. लोकप्रिय स्पॅनिश संगीताचा प्रभावही जबरदस्त होता. जाराबे टॅपॅटिओ हे मेक्सिकन हॅट-नृत्य नंतरच्या काळात फार लोकप्रिय ठरले.

एकोणिसाव्या शतकात मेक्सिकोच्या सांगीतिक जीवनात प्रथमच इटालियन संगीत ऑपेरा संचांच्या व संगीतकारांच्या द्वारे येऊन दाखल झाले. मार्यानो एलिझागाने स्थापलेली ‘सोशिएदॉद फिलआमोर्निका’ (१८२५) होसे आंतोन्यो गोमेसची ‘ग्रॅन सोशिएदॉद फिलआर्मोनिका’ (१८३९) व ऑगूस्तीन काबाल्येरोची ‘सोशिएदॉद फिलआर्मोनिका मेक्सिकाना’ (१८६६) या तीन संगीत संस्थांनी एकूण सांगीतिक चळवळीस हातभार लावला. त्यांतून ‘कॉन्सर्वेतोरिओ नॉसिनोआल’ (१८७७) या प्रमुख संघटनेची निर्मिती झाली. खास मेक्सिकन विषयांवर आधारित अशा कल्पनाप्रचुर संगीतरचना रीकार्दो कास्त्रो (१८६४–१९०७), हूल्यो इत्यूआर्ते (१८४५–१९४५) यांनी निर्माण केल्या. या काळातील अँजेला पेराल्ता (१८५४–१८८३) हा संपूर्ण यूरोपखंडात कीर्ती मिळवणारा पहिला मेक्सिकन गायक होय. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस कार्लोस मेनेसेस (१८६३–१९२९) याने ‘सिम्फनी’ वाद्यवृंदाची स्थापना करून स्वरमेळ पद्धतीच्या संगीतास मेक्सिकोत लोकप्रियता मिळवून दिली.

विसाव्या शतकात कास्त्रो, इत्यूआर्ते प्रभृती संगीतकारांच्या प्रेरणेने निर्माण झालेला राष्ट्रीय संगीताचा प्रवाह अव्याहत चालू राहिला. पुढे त्यात अन्य यूरोपीय संगीताचे प्रवाह येऊन मिसळले. व्हायोलिनवादक व संगीतरचनाकार हूल्यान काररीयो (१८७५–१९६५) याने जर्मन संगीत, तर गृसताव्हो इ. कॅम्पा (१८६३–१९३४) याने फ्रेंच संगीत मेक्सिकोत आणून रुजवले. मान्वेल एम्. पॉन्से (१८८२–१९४८) याने मेक्सिकन लोकगीतांना आधुनिक वळण व उच्चवर्गात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याच्याच प्रेरणेने होसे रोलॉन (१८८३–१९४५), कांदेलारिओ हुइझार (१८८८– ), पियानोवादक व रचनाकार सिल्व्हेस्त्रा रेव्हूल्‌ताज (१८९९–१९४०) व कार्लोस शाव्हेस (१८९९– ) यांनी आपापल्या सांगीतिक प्रतिभाधर्मांनुसार आपापल्या संगीतरचनांमध्ये आदिवासी इंडियन संगीताचा वापर करून घेतला व त्यातून मेक्सिकन संगीताची राष्ट्रीय शैली घडत गेली. लूईस सॅन्डी (१९०५– ) हाही एक महत्त्वाचा आधुनिक संगीतकार मानला जातो. विसाव्या शतकाआधीच्या संगीतकारांनी इटालियन, फ्रेंच, जर्मन संगीतरचना मेक्सिकोच्या भूमीत रुजवल्या तर विसाव्या शतकातील संगीतकार ज्याला खास ‘मेक्सिकन’ म्हणता येईल असे राष्ट्रीय गुणधर्म असलेले संगीत निर्माण करीत आहेत, हा महत्त्वाचा फरक मानता येईल.


खेळ व मनोरंजन : मेक्सिकोमधील लोकप्रिय खेळांत बेसबॉल, सॉकर फुटबॉल, व्हॉलीबॉल, पोहणे इ. प्रकारांचा समावेश होतो. बैलझोंबी हा मेक्सिकोचा राष्ट्रीय खेळ आहे. मेक्सिको सिटीमध्ये बैलझोंबीची दोन रंगणे आहेत. त्यांपैकी ‘प्लाझा दे तोरोस मॉन्युमेंटल’ हे जगातील सर्वांत मोठे असून त्यात सु. ५०,००० प्रेक्षक बसू शकतात. देशात आणखी सु. ३५ बैलझोंबीची रंगणे आहेत. शिवाय मेक्सिको सिटीमध्ये सॉकरसाठी ‘ॲझटेका स्टेडियम’ हे भव्य मैदान असून, त्यात सु. १,०५,००० प्रेक्षक मावू शकतात. १९६८ च्या ऑलिंपिक क्रीडास्पर्धासाठी बांधलेले क्रीडागार हे मेक्सिको सिटीतील आणखी एक आकर्षण आहे. हँडबॉलशी साधर्म्य असलेला ‘जाई अलाई’ नामक खेळही मेक्सिकोमध्ये लोकप्रिय आहे. त्यात खेळाडू बास्केटसारख्या रॅकेटने चेंडू समोरच्या भिंतीवर आपटून खेळतात. चेंडू विलक्षण वेगाने परत येत असल्याने हा जगातील सर्वांत वेगवान खेळ मानला जातो. गोल्फ, अश्वारोहण, पोलो, टेनिस, शीडजहाज शर्यती हे आणखी काही लोकप्रिय खेळ होत. सण व उत्सवप्रसंगी छोट्या शहरांतून व खेड्यांतून हौशी बैलझोंबी, कोंबड्यांच्या झुंजी भरवल्या जातात. नाताळाआधीच्या नऊ रात्री ‘पोसादा’ नामक उत्सव साजरे केले जातात. प्रत्येक रात्री पोसादानंतर मुले ‘पिनाता’ नावाचा खेळ खेळतात. पिनाता ही माती वा कागदलगदा यांपासून बनवलेली भांडी असतात. त्यांना कित्येकदा वेगवेगळ्या प्राण्यांचे आकार दिले जातात. पिनातामध्ये मिठाई, फळे, खेळ इ. वस्तू ठेवून तो अधांतरी टांगला जातो. लहान मुले डोळ्यांवर पट्टी बांधून व हातात काठी घेऊन तो काठीने आळीपाळीने फोडण्याचा प्रयत्न करतात. तो फुटला की, मुले त्यातल्या वस्तू गोळा करतात. नाताळानंतरच्या बाराव्या रात्री पालक आपल्या मुलांच्या बुटांमध्ये भेटवस्तू ठेवतात. अशा उत्सवप्रसंगी भरणाऱ्या जत्रा व मेळावे हे लोकांच्या खास आकर्षणाचे व रंजनाचे विषय होत.

इनामदार, श्री. दे. 

प्रेक्षणीय स्थळे : निसर्गसौंदर्य, विविध संस्कृतींची स्मारके, आधुनिकता अशा सर्वच दृष्टींनी मेक्सिकोत प्रेक्षणीय विविधता निर्माण झाली आहे. ज्वालामुखीजन्य पर्वतांची शिखरे, खोल दऱ्या, उंच गिरिस्थाने, वेधक पुळणी, प्राचीन संस्कृतींचे भव्य अवशेष व वाढती आधुनिक नगरे पर्यटकांना आकर्षित करतात. पारीकूटीन ज्वालामुखी व त्याच्या परिसरात लाव्हा रसाखाली गाडले गेलेले अवशेष कुतूहलजनक आहेत. व्हेराक्रूझ-प्वेब्लो सरहद्दीवरील ज्वालामुखी मुख्य असून ते देशातील सर्वोच्च शिखर मानले जाते. याशिवाय इतरत्रही ज्वालामुखी शिखरे आढळतात. दक्षिणेकडील पॅसिफिक महासागरकाठी सुंदर पुळणी व निसर्गसौंदर्य यांनी वेधक बनलेली स्थळे आहेत. यूकातान द्विपकल्पातील वनश्रीयुक्त पुळणी, तेथील चकाकती रुपेरी वाळू व स्वच्छ निळे पाणी यांमुळे आकर्षक ठरतात. मेक्सिकोच्या आखातावरही सागरी सौंदर्याची स्थळे आढळतात. 

प्राचीन माया, ॲझटेक संस्कृतींचे भव्य अवशेष मेक्सिको सिटी व परिसरात आढळतात. मोंते आल्बान हे झपोटेक इंडियनांचे प्राचीन स्थानही महत्त्वाचे आहे. माया व इतर इंडियन संस्कृतींचीही अनेक स्मारके आढळतात. त्यांचा निर्देश ऐतिहासिक आढाव्यात आला आहे. मेक्सिको सिटी हे राजधानीचे शहर असून येथे इंडियन वसाहतकालीन व आधुनिक अशा विविध संस्कृतींचा संगम झाल्याचे दिसते. याशिवाय ग्वादलूप हे कॅथलिकांच्या मोठ्या यात्रेचे स्थान, मेक्सिको सिटीतील तरंगत्या बागांचे उपनगर, बैलझोंबीचे प्रचंड क्रीडागार, अत्याधुनिक विद्यापीठनगर इ. प्रेक्षणीय स्थाने उल्लेखनीय आहेत. यांशिवाय देशात इतरही वसाहतकालीन वैशिष्ट्ये दर्शविणारी आहेत तथापि मेक्सिको सिटीमध्ये देशाचा निसर्ग, इतिहास आणि आधुनिकता यांचे प्रातिनिधिक दर्शन घडते. 

संदर्भ : 1. Bernal, Ignacio Bellew, Peter, Ed. Mexican Wall Paintings of the Maya and Aztek  Periods, New York, 1963.

             2. Charlot, Jean, Mexican Art and the Academy of San Carlos, 1785-1915, Texas, 1962.

             3. Fernandez, Justino, Mexican Art, London, 1965.

             4. Gonzalez. Pena Carlos, History of Mexcian Literature, Mexico City, 1968.

             5. Johnson, K. F. Mexican Democracy : A Critical View, New York, 1978.

             6. Meyor, Michael C. Sherman, William L. The Course of Mexican History, Oxford, 1979.

             7. Simpson, Lesley B. Many Mexicos, California, 1969.

             8. Toussaint, Manuel, Colonial Art in Mexico, Texas, 1967.

             9. Wyman, D. L. Ed. Mexico’s Economic Crists : Challenges and Opportunities, San Diego, 1983.

जाधव, रा. ग.


मेक्सिको देशाचा नकाशा

मका : मेक्सिकोचे प्रमुख कृषिउत्पादन.क्वेटझाकोट्‌ल पिरॅमिडच्या परिसरातील तॉस्तेक पुतळे, तूला.तूला येथील क्वेटझाकोट्‌ल पिरॅमिडमधील शिल्पालंकृत भिंत.कोलंबसचा पुरळा असलेला मेक्सिको सिटीमधील चौक.ताजिन येथील पिरॅमिड, इ. स. ९ वे शतक.मेक्सिको सिटीचे विहंगम दृश्य.ॲकापुल्को : द. मेक्सिकोतील पॅसिफिक किनाऱ्यावरील प्रसिद्ध पर्यटन केंद्र.