ब्लीडा: अल्जीरियातील एक प्रमुख शहर. लोकसंख्या १,६२,००० (१९७७ अंदाज). हे अल्जिअर्स शहराच्या नैऋत्येस ४० किमी. असून टेल ॲटलास पर्वतपायथ्याशी व नीतीजा मैदानाच्या दक्षिण टोकाशी वसलेले आहे. ओरान अल्जिअर्स या लोहमार्गावरील हे एक प्रमुख स्थानक आहे.

प्राचीन काळी येथे रोमन सैनिकी छावणी होती. अब्दुल केबिर याने येथील निसर्गसौंदर्य व आल्हाददायक हवामान यांमुळे आकर्षित होऊन हे शहर सोळाव्या शतकात वसविले असे म्हणतात. त्याच्या बरोबर आलेल्या अँडलूझीयामधील (स्पेनचा विभाग) लोकांनी येथे नारिंगांच्या बागा विकसित केल्या. या तटबंदीयुक्त शहराला साह प्रवेशद्वारे आहेत. १९२५ व १८६७ मध्ये झालेल्या भूकंपांनी शहराची अतोनात हानी झाली. तुर्कांच्या अंमलाखालील हे शहर फ्रेंचांनी १८३९ मध्ये जिंकले. दुसऱ्या महायुद्धात फ्रेंचांचा येथे प्रमुख हवाई तळ होता.

शहराच्या परिसरात बदाम, ऑलिव्ह, गुलाब यांसारख्या विविध फळाफुलांच्या बागा असून कृषिमालाची ही एक प्रमुख बाजारपेठ आहे. येथील न्युमिदियाचा राजा दुसरा जूबा याने परनीच्या स्मरणार्थ बांधलेली ‘द टूम ऑफ क्रिस्तियाना’ ही कबर व खैरूद्दीन बार्बारोसा याने बांधलेली मशीद उल्लेखनीय आहे. जवळचे मेरगेब शिखर (१,६२९ मी.), शीफा घळई व श्रेआ पर्वताचा निसर्गरम्य परिसर यांमुळे पर्यटकांची येथे नेहमी वर्दळ असते.

सावंत, प्र. रा.