रूबेन दारीओ थिएटर, मानाग्वा.

मानाग्वा : निकाराग्वाची राजधानी आणि देशातील सर्वांत मोठे व्यापारी आणि औद्योगिक शहर. लोकसंख्या ८,१९,६७९ (१९८१). हे शहर मानाग्वा सरोवराच्या (२६ किमी. रुंद व ५८ किमी. लांब) उत्तर काठावर वसले असून ‘पॅन-अमेरिकन हायवे’ या राजमार्गावरील महत्त्वाचे केंद्र आहे. हे देशातील ग्रानाडा, दिरिआंबा व लेओन या प्रमुख शहरांशी तसेच कोरिन्तो या पॅसिफिक महासागरावरील प्रमुख बंदराशी लोहमार्गाने जोडलेले आहे.

 लेओनचा उदारमतवादी (लिबरल) पक्ष व ग्रानाडाचा रूढिवादी (कॉन्झर्व्हेटिव्ह) पक्ष यांच्यातील संघर्ष व  वितुष्ट संपविण्याच्या उद्देशाने तडजोड म्हणून या दोन शहरांऐवजी मानाग्वा हे राजधानीचे ठिकाण १८५५ मध्ये  निवडण्यात आले. त्यानंतर काही काळ (१९१२–२५ व १९२६–३३) सरकारच्या विनंतीवरून शांतता रक्षणासाठी हे शहर अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या नौदलाच्या ताब्यात होते. मानाग्वावर अनेकदा नैसर्गिक आपत्ती (१९३१ व १९३६ मध्ये अग्निप्रलय १९३१ व १९७२ मध्ये भीषण भूकंप) ओढवल्या होत्या आणि त्यांमध्ये शहराचे अतोनात नुकसान झाले होते. २३ डिसेंबर १९७२ रोजी झालेल्या भयंकर भूकंपामुळे संपूर्ण शहरच उद्ध्वस्त झाले होते. त्यात सु. १०,००० लोक मृत्युमुखी पडले, तर त्यांहूनही अधिक लोक जखमी झाले.

 अलीकडे मात्र शहरात भूकंपातही सुरक्षित राहतील अशा वैशिष्ट्यपूर्ण घरांची आणि वसाहतींची उभारणी करण्यात आली आहे. शहरात जुन्या इमारतींचे अवशेष पहावयास मिळतात. मानाग्वा सस. पासून ६० मी. उंचीवर असून तेथील हवामान मुख्यतः उष्ण व दमट आहे, त्यामुळे याच्या परिसरात कॉफी व कापूस ही पिके घेतली जातात. सरोवराकाठी थोडे सौम्य व उबदार हवामान आल्हाददायक वाटते. येथून जवळच मोमोतोम्बो (१,२८० मी.) हे ज्वालामुखी शिखर आहे. शहराजवळ ज्वालामुखीपासून दूर पळणाऱ्या लोकांच्या पावलांचे लाव्हातील ठसे पहावयास मिळतात.

शहरात तेलशुद्धीकरण, झटपट कॉफी, कापड, सिमेंट, साबण, रंग, प्लॅस्टिके, दुग्धपदार्थ, थंड पेये, औषधे, बीर, सिगारेटी, खाद्यतेले, प्रक्षालके इत्यादींचे कारखाने आहेत. स्पॅनिश भाषेतील नवकाव्याचा प्रणेता रूबेन दारीओ (१८६७–१९१६) याचे भव्य स्मारक, मध्य अमेरिका विद्यापीठाची एक शाखा व आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे असून भव्य इमारती, उद्याने, तलाव इत्यादींनी शहराची आकर्षक रचना करण्यात आली आहे.

अनपट, रा. ल.