न्यू कॅलेडोनिया : पॅसिफिक महासागरातील फ्रान्सच्या आधिपत्याखालील याच नावाचा सागरपार प्रांत. लोकसंख्या १,२८,००० (१९७५ अंदाज). २०° द. ते २२° २५ द. व १६२° १५ पू. ते १६४°१५ पू. यांदरम्यानच्या १९,१०३ चौ. किमी. क्षेत्रफळाच्या या भूप्रदेशात न्यू कॅलेडोनिया, लॉयल्टी, ह्यूअन, हंटर, वॉल्पोल, चेस्टरफील्ड, पाइन्स, बेलेप इ. बेटे द्वीपसमूहांचा समावेश होतो. यांपैकी ऑस्ट्रेलियाच्या पूर्वेस सु. १,२०० किमी.वर असलेले न्यू कॅलेडोनिया हे बेट प्रमुख असून या बेटाची लांबी ४०० किमी., रुंदी ५० किमी. आणि क्षेत्रफळ १६,९१५ चौ.किमी. आणि लोकसंख्या ८४,००० (१९६३ अंदाज) आहे. वायव्य-आग्‍नेय पसरलेल्या या ज्वालामुखी बेटामधून जाणारी पर्वतरांग, ईशान्येकडील चिंचोळे मैदान, दक्षिणेकडील व नैर्ऋत्येकडील रुंद मैदाने व पश्चिमेस असलेली थोडी दलदल अशी या बेटांची साधारण भूस्वरूपे दिसतात. बेटावर रूपांतरित व ज्वालामुखी खडक, तर सभोवती प्रवाळरांगा आढळतात. लांबीच्या बाबतीत ऑस्ट्रेलियाच्या सुप्रसिद्ध ग्रेट बॅरिअर रीफनंतर याच प्रवाळभित्तीचा क्रमांक लागतो. तीव्र उताराच्या पूर्व किनारपट्टीवर पुराजीव महाकल्पातील खडक, तर पश्चिमेकडील दंतुर किनाऱ्यावर मध्यजीव व नवजीव महाकल्पांतील खडक आहेत. पर्वतरांगेतील मौंट पानीए (१,६५० मी.) व मौंट हंबोल्ट (१,६३४ मी.) ही प्रमुख शिखरे होत. येथील नद्या वायव्येस व नैर्ऋत्येस वाहतात. दिहॉट हीच नदी लांब जलवाहतुकीस उपयोगी आहे. इतर नद्या लहान आहेत. या प्रदेशाचे हवामान समशीतोष्ण प्रकारचे असून न्यू कॅलेडोनिया बेटावरील मासिक सरासरी किमान व कमाल तपमान अनुक्रमे १७° से. व ३२° से. तर वार्षिक पर्जन्य पूर्व व पश्चिम किनाऱ्यांवर अनुक्रमे २०० व १०० सेंमी. पडतो. पूर्व भागात व्यापारी वाऱ्यांपासून पाऊस जास्त पडतो. डिसेंबर – मार्च दरम्यान तो सर्वाधिक असतो.

कॅप्टन जेम्स कुकने दुसऱ्या सफरीच्या वेळी (१७७४) या बेटांचा शोध लावला. कुकला या भूप्रदेशाचे स्कॉटलंडच्या किनाऱ्याशी बरेच साम्य आढळल्यामुळे त्याने त्याला ‘न्यू कॅलेडोनिया’ असे नाव दिले. ब्यूनी द आंत्रकास्तो या फ्रेंच समन्वेषकाने १७९२–९३ मध्ये न्यू कॅलेडोनिया बेटाची पाहणी केली. लंडन मिशनरी सोसायटीने १८४१ मध्ये काही प्रचारक या बेटावर पाठविले पण शेजारच्या बेटांवरील लोकांनी प्रचारकांच्या कत्तली केल्याने त्यांना परत बोलविण्यात आले. रोमन कॅथलिक मिशनऱ्यांचे प्रयत्नही सफल झाले नाहीत.

चंदनी लाकडाच्या व्यापाऱ्यांत व रहिवाशांत नेहमी तंटे होत. १८४३ मध्ये फ्रेंच रोमन कॅथलिक मिशनची येथे स्थापना झाली व २४ सप्टेंबर १८५३ रोजी फ्रेंचांनी या बेटाचे वसाहतीत रूपांतर केले. १८६४ पर्यंत या बेटांचा उपयोग फ्रेंच गुन्हेगार व राजबंदी यांच्या वसाहतीसाठी केला जाई. काही ठिकाणी ब्रिटिश मिशनऱ्यांचा विरोध झाला, तर १८७८–७९ मध्ये बेटांवरील लोकांनी मोठा उठाव केला. १९१७ मध्येही छोटा उठाव झाला होता. १९४२ मध्ये अमेरिकन लष्कर येथे आल्यानंतर हा महत्त्वाचा तळ बनला. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेच्या सशस्त्र दलाचे हे मुख्य केंद्र होते. १९४६ मध्ये फ्रान्सने निर्माण केलेल्या सागरपार भूप्रदेशात ही बेटे समाविष्ट करण्यात आली. सात निर्वाचित सदस्यांची परिषद व ३५ निर्वाचित सदस्यांचे मंडळ, यांच्या मदतीने फ्रेंच गव्हर्नर वसाहतीचा कारभार व इतर पॅसिफिक बेटांतील फ्रान्सचे हितसंबंध सांभाळतो. फ्रान्सची राष्ट्रीय सभा (लोकसभा) व सीनेट यांवर या प्रांतातील प्रत्येकी एक प्रतिनिधी पाठविण्यात येतो.

एकूण जमिनीपैकी ६% जमीन शेतीयोग्य असून ६,००० हे. क्षेत्रात व्यापारी शेती, तर ४,१६,००० हे. क्षेत्रात चराऊ कुरणे आहेत. येथील वनस्पतीजीवन अत्यंत समृद्ध असून ७७% वनस्पती स्थानिक व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. २,५०,००० हे. क्षेत्रात जंगले असून त्यांतून १९७४ साली १७,७१४ घ.मी. लाकडाचे उत्पादन झाले. काही भागांत दलदल व गवत आढळते. कॉफी, तांदूळ, खोबरे, मका, फळे व भाजीपाला, सूर्यफूलांचे बी, कापूस, बटाटे, याम, तारो, कसावा ही येथील प्रमुख कृषिउत्पन्ने होत. शेतीयोग्य बरीच जमीन पडीक असली, तरी मजुरांची कमतरता आहे.

पशुपालनाचा व्यवसाय महत्त्वाचा आहे. गाई १,२६,००० मेंढ्या ५,००० शेळ्या १४,००० घोडे ९,००० डुकरे ३०,००० व कोंबड्या १,८१,००० असा १९७५ चा पशुधनाचा अंदाज होता. वाको येथे मांस डबाबंद करण्याचा कारखाना आहे.

या बेटांवर विविध प्रकारच्या खनिजांचे मोठे साठे असले, तरी निकेलचे उत्पादन महत्त्वाचे असून १९७४ मध्ये ७०·१५ लक्ष मे. टन निकेलचे उत्पादन झाले १९७१ मध्ये क्रोमियमचे १,१०० मे. टन उत्पादन होते. यांशिवाय कोबाल्ट, लोह, चांदी, तांबे, सोने, मँगॅनीज, पारा, शिसे, जस्त, कोळसा, खनिज तेल, जिप्सम ही खनिजेही सापडतात. न्यू कॅलेडोनिया बेटावर क्लोरीन व ऑक्सिजन बनविणे, कॉफी तयार करणे, मांस टिकविणे, निकेल वितविण्याच्या भट्ट्या इ. महत्त्वाचे कारखाने आहेत. पॅसिफिक फ्रँक हे येथील अधिकृत चलन असून १ अमेरिकी डॉलर = ९०·९१ पॅसिफिक फ्रँक आणि १ स्टर्लिंग पौंड = १५०·५९ पॅसिफिक फ्रँक असा विनियम दर होता (डिसेंबर १९७६). १९७५ मध्ये २,७०,४८६ लक्ष पॅ. फ्रँकची आयात, तर २,२३,८०२ लक्ष पॅ. फ्रँकची निर्यात झाली. १९७४ मध्ये ४३·२% निर्यात फ्रान्सला झाली, तर ४०·८% आयात फ्रान्सकडून केली. आयातीत प्रामुख्याने धान्य, यंत्रे, विद्युत् साहित्य तर निर्यातीत अशुद्ध निकेल, धातुरूप निकेल, कॉफी, खोबरे यांचा समावेश होतो. एक प्रमुख शहर, बंदर आणि न्यू कॅलेडोनिया भूप्रदेशाच्या राजधानीचे ठिकाण असलेले नूमेया हे न्यू कॅलेडोनिया बेटावरच असून, त्याची १९७४ ची लोकसंख्या ५९,८६९ होती. नूमेया येथे चार बँकशाखा आहेत.

प्रांताच्या १९७५ मधील १,२८,००० या एकूण लोकसंख्येपैकी ५३,७५० यूरोपीय (प्रामुख्याने फ्रेंच) ५४,५०० मेलानेशियन ९,२८० वॉलीशियन ६,१६९ पॉलिनीशियन व ४,२५० इतर लोक होते. स्थायिक लोक मुख्यतः मेलानेशियन असून त्यांचे काही बाबतींत ऑस्ट्रेलियातील आदिवासींशी साम्य आहे. बव्हंशी लोक ख्रिस्ती असून रोमन कॅथलिक ६३% व प्रॉटेस्टंट पंथीयही बरेच आहेत. येथील लोकांनी फ्रेंचांस विरोध केल्याने त्यांच्या जमिनी फ्रेंचांनी हिसकावून घेतल्या. खाणीत काम करण्यास इतर भागांतून फ्रेंचांनी मजूर आणले व त्यांतूनच आजची मिश्र लोकसंख्या निर्माण झाली. स्थानिक लोक भिन्न उपभाषा बोलतात, पण त्यांच्या चालीरीती सर्वत्र सारख्या आहेत. १९५१ मध्ये काही इटालियन लोकही येथे येऊन स्थायिक झाले.

न्यू कॅलेडोनियाच्या पश्चिम किनाऱ्यावरील येंगेन व त्यो ह्या प्रमुख बंदरांना जोडणारा रस्ता सर्वांत महत्त्वाचा असून तो शेतीदृष्ट्या महत्त्वाच्या नद्यांची खोरी जोडतो. १९७४ मध्ये रस्त्यांची एकूण लांबी ५,२१४ किमी. होती. दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी अमेरिकेने या बेटावर बरेच चांगले रस्ते बांधले. बेटावर २७,४५१ मोटारगाड्या १०,०४५ मोटारसायकली आणि ४५४ ट्रॅक्टर होते (१९६९). फ्रान्स, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, फिजी, ताहिती, न्यू हेब्रिडीझ, वॉलीस द्वीपसमूह यांच्याशी सागरी आणि हवाई वाहतूक चालते. याते नदीवरील जलविद्युत् प्रकल्पापासून विद्युत् पुरवठा होतो. रेडिओ, दूरध्वनी व दूरचित्रवाणी यांचे नूमेया हे प्रमुख केंद्र असून अनेक वृत्तपत्रे व मासिके तेथूनच निघतात. १९७५ मध्ये बेटावर एकूण ६०,००० रेडिओ, १७,०९२ दूरध्वनी व २०,००० दूरचित्रवाणी संच होते. दररोज फ्रेंच भाषेतून रेडिओ प्रक्षेपण आणि आठवड्यातून २८ तास दूरचित्रवाणी प्रक्षेपण होते. काही प्रमाणात शैक्षणिक सोयींची उपलब्धता असून १९७४ मध्ये प्राथमिक शाळांत ३०,२७८ माध्यमिक शाळांत ५,०१२ आणि तांत्रिक व धंदेशिक्षण शाळांतून २,०९५ विद्यार्थी शिकत होते. १९७३ साली २४० प्राथमिक आणि ८ माध्यमिक शाळा होत्या. हे प्रवाशांचे एक आकर्षण केंद्र असून १९७४ मध्ये २४,००८ प्रवाशांनी या बेटाला भेट दिली.

डिसूझा, आ. रे. चौधरी, वसंत