व्होल्टा नदी : पश्चिम आफ्रिकेतील घाना देशामधील प्रमुख नदीसंहती. काळी व्होल्टा व श्वेत व्होल्टा य दोन शीर्षप्रवाहांपासून बनलेली व्होल्टा नदी देशातून सामान्यपणे दक्षिणेस वाहत येऊन आदा येथे गिनीच्या आखाताला जाऊन मिळते. काळी व्होल्टा व श्वेत व्होल्टा या दोन नद्या बर्किना फासो प्रजासत्ताकाच्या अंतर्गत भागातील उंचवट्याच्या प्रदेशात उगम पावून घानाच्या उत्तरमध्य भागात समुद्रकिनाऱ्या पासून ४८० किमी. उत्तरेस एकमेकींना मिळतात. तेथून पुढील संयुक्त प्रवाह व्होल्टा नावाने ओळखला जातो. बर्किना पठारावर काळी व्होल्टा मौहौन नावाने, तर श्वेत व्होल्टा नाकांबे या नावाने ओळखली जाते. आफ्राम व ओटी या व्होल्टाच्या प्रमुख उपनद्या आहेत. व्होल्टा नदीप्रणालीची एकूण लांबी १,६०० किमी. व जलवाहनक्षेत्र ३,९८,००० चौ. किमी. असून नरसाळ्याच्या आकाराप्रमाणे असणाऱ्या सखल भूमीचे तिने जलवाहन केले असून मुखाशी दलदलयुक्त त्रिभुज प्रदेश आहे.

काळी व्होल्टा या मुख्य शीर्षप्रवाहाचा उगम व्होल्टी नदीसंहतीच्या वायव्य भागात होतो. उगमानंतर ती प्रथम ईशान्येस वाहत जाते. पूर्वी ती तशीच नायजर नदीला जाऊन मिळत होती. काळी व्होल्टा जेथे आग्नेयीस वळते, तेथील तिला ईशान्येकडून सौरी ही नदी येऊन मिळते. जेव्हा काळी व्होल्टा नदीला पूर येतो, तेव्हा तिचे पाणी सौरौ नदीपात्रात चढते पुढे काळी व्होल्टा दक्षिणवाहिनी होते. काही अंतर घाना-बार्किना फासो व घाना-कोत दीव्ह वॉर (आयव्हरी कोस्ट) यांच्या सरहद्दीवरून वाहते. त्यानंतर ते थोडीशी पूर्वेकडे वळून घानात प्रवेश करते. नंतर तिला श्वेत व्होल्टा येऊन मिळते. व्होल्टा नदीखो-याच्या ईशान्य भागात श्वेत व्होल्टाचा उगम होतो. ही सामान्यपणे दक्षिणवाहिनी आहे. मार्गात कोनीय वळणे आहेत. उत्तरमध्य खोऱ्यातून वाहणारी तांबडी व्होल्टा ही नदी बर्किना फासो प्रजासत्ताकातून दक्षिणेस घानामध्ये आल्यानंतर श्वेत व्होल्टाला मिळते. व्होल्टाच्या प्रवाहमार्गात बरेच द्रुतवाह असल्यामुळे जलवाहतुकीसाठी तिचा विशेष उपयोग होऊ शकत नाही. केवळ लहान बोटीच तिच्यातून वाहतूक करू शकतात. कोरड्या ऋतूत, विशेषतः जानेवारीत, नदीतील पाण्याचे प्रमाण कमी असते, तर उन्हाळ्याच्या उत्तरार्धात अधिक पाणी असते.

आकोसोंबो येथे व्होल्टा नदी अक्कापीम पर्वतश्रेणीतील निदरीतून वाहते. येथेच व्होल्टा नदीवरील ६० मी. उंचीचे आकोसोंबो हे प्रमुख धरण आहे (१९९६). या धरणामुळे ४०० किमी. लांबीच्या व ८,४८२ चौ. किमी. क्षेत्रफळाच्या लेक व्होल्टा जलाशयाची निर्मिती झालेली आहे. या धरणाने घानाच्या अंतर्गत भूगोलात मूलभूत बदल घडून आले आहेत. आकोसोंबो धरणाजवळील जलविद्युत केंद्राची निर्मितिक्षमता ८२२ मेवॉ. आहे. येथील विजेचा फार मोठा वापर टेमा बंदराजवळील ऑल्युमिनिअम कारखान्यात केला जातो. घानाच्या एकूण विजेच्या गरजेपैकी ९०% वीज येथूनच पुरवली जाते. वाहतूक व मासेमारी विकास आणि धरणाच्या खालच्या बाजूस असलेल्या अँक्रा प्लेन्स या कोरड्या प्रदेशातील शेतीला पाणीपुरवठा करणे, असेही या धरणाचे उद्देश आहेत. व्होल्टा रिव्हर प्रोजेक्ट या बहुउद्देशीय प्रकल्पांतर्गत कपाँग येथे एक धरण बांधण्यात आले आहे.

व्होल्टाच्या खालच्या टप्प्यातील प्रवाहमार्गाची माहिती पंधराव्या शतकापासून युरोपियनांना होती. त्या वेळी पोर्तुगीजांनी या प्रदेशाचे समन्वेषण केले होते. नदीला वळणे अधिक आढळल्याने त्या अर्थाचे नाव (व्होल्ट) त्यांनी नदीला दिले. एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस या नदीच्या संपूर्ण प्रवाहमार्गाने लांबी व तिच्या खोऱ्याची व्याप्ती यांची माहिती झाली व ती नकाशावरही घेण्यात आली.

चौधरी, वसंत