हिंडेनबर्ग : झाब्झे. पोलंड देशाच्या नैर्ऋत्य भागातील इतिहासप्रसिद्ध शहर. पूर्वी झाब्झे या नावाने ओळखले जाणारे १९१५–४५ या कालावधीत जर्मनीमध्ये असलेले हे शहर दुसऱ्या महायुद्धानंतर पोलंड-मध्ये समाविष्ट करण्यात आले. पोलंडच्या कोटोव्हीत्से प्रांतात सायलीशियाच्या औद्योगिक विभागात हे वसले आहे. लोकसंख्या १,८६,९१३ (२००९). चौदाव्या शतकात हे शहर स्थापन झाले असावे. या शहरावर १५२६ मध्ये ऑस्ट्रियातील हॅप्सबर्ग साम्राज्याचा अंमल होता. सायलीशियन युद्धानंतर प्रशियनांनी हे शहर आपल्या ताब्यात घेतले होते (१७४२). १७९० मध्ये येथे खाण उद्योगास (कोळसा खाण) सुरुवात झाली. १९१५ मध्ये जर्मन फिल्ड मार्शल पॉल फॉन हिंडेनबुर्ख याच्या सन्मानार्थ या शहराचे हिंडेनबर्ग असे नामकरण करण्यात आले. १९२१ मध्ये सायलीशियन युद्ध उद्भवले. त्या वेळेस पोलंडच्या बंडखोरांनी याशहराचा ताबा घेतला. यादवी संपेपर्यंत यावर त्यांचा अंमल होता. जेव्हा १९२१ मध्ये अप्पर सायलीशियाचे जर्मनी आणि पोलंड यांमध्ये विभाजन झाले, तेव्हा हिंडेनबर्ग जर्मनीत समाविष्ट करण्यात आले. १९२२ मध्ये यास शहराचा दर्जा मिळाला. दुसऱ्या महायुद्धात या शहराचे अतोनात नुकसान झाले. १९४५ मध्ये हे पोलंडकडे आले. या शहराची अर्थव्यवस्था ही प्रामुख्याने कोळसा खाणी आणि खाण उद्योगांवर आधारलेली आहे. दगडी कोळशापासून कोक तयार करणे, धातुकाम, रसायनेनिर्मिती इ. उद्योग येथे चालतात. हे देशातील महत्त्वाचे औद्योगिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. 

अमृते, विद्याधर