नायजर नदी : नाईल व काँगो यांच्या खालोखालची, आफ्रिकेतील तिसऱ्या क्रमांकाची नदी. लांबी ४,१८० किमी. जलवाहन क्षेत्र १८,९०,००० चौ. किमी. ही गिनीतील फूटा जालन पठाराच्या पूर्व उतारावर, अटलांटिकपासून अवघ्या २४० किमी. वर सु. ८६३ मी. उंचीवर उगम पावून प्रथम सामान्यतः ईशान्येकडे, मग पूर्वेकडे व नंतर आग्‍नेयीकडे व दक्षिणेकडे जाऊन गिनीच्या आखातास मिळते. ती गिनी, माली व नायजर देश ओलांडून, नायजर व बेनिन प्रजासत्ताक (दाहोमी) यांच्या सीमेवरून आणि पुढे नायजेरियातून वाहते. तिने मुखाशी सु. २४० किमी. लांब, ३२० किमी. रुंद व ३५,२६० चौ. किमी. क्षेत्रफळाचा विस्तृत त्रिभुज प्रदेश निर्माण केला आहे. उगमापासून तिंबक्तूपर्यंत (काहींच्या मते बामाकोपर्यंतच) वरची नायजर, मग जेबापर्यंत मध्य नायजर व पुढे खालची नायजर असे तिचे तीन भाग मानतात. वास्तविक नायजर ही दोन प्राचीन नद्यां मिळून बनलेली आहे. वरची नायजर जोलिबा नावाने तिंबक्तूनंतर तशीच पुढे सहारातील आता कोरड्या पडलेल्या एल जाऊफ सरोवरास मिळे. खालची नायजर कोरा नावाने सहारातील अहॅग्‍गर पर्वतात उगम पावे. तिने जोलिबाचे जलापहरण केले असावे.

गिनीत नायजरला मॅफाऊ, निआंदन, क्कार येथे मीलो व सीगीरी येथे तिंगकीसो या उपनद्या मिळतात. तिच्यावरील कुरूसा व मीलोवरील कांकान ही येथील इतर महत्त्वाची गावे होत. मालीमध्ये वरच्या नायजरला सांकरानी व मॉप्ती येथे बानी या उपनद्या मिळतात. बामाको, कूलीकोरो, सेगू, सांसांडिंग व तिबक्तूचे बंदर काबारा ही तिच्या काठावरील शहरे होत. बामाकोनंतरच्या सु. ८० किमी. मध्ये नायजर, वाटेवरील द्रुतवाह पार करून सु. ३०५ मी. खाली दरीत उतरते. सांसांडिंग येथे १९४७ मध्ये बंधारा घालून कालवे काढल्यामुळे १९६९ पर्यंत सु. ५ लाख. हे. क्षेत्रास पाणी मिळून भात, कापूस, ऊस, भाजीपाला यांचे मोठे उत्पन्न येऊ लागले. येथून तिंबक्तूपर्यंत गुंफित प्रवाह, बेटे, दलदली व सरोवरे यांचा विस्तृत प्रदेश आहे. तेथेही विकासाचे प्रयत्‍न जारी आहेत. नंतर एक निदरी पार करून ताउसापर्यंत नायजर सहाराच्या दक्षिण सीमेवरून वाहते. नंतर तिच्यावर गाऊ, आन्साँगो व लॅब्‍बेझेंगा ही शहरे आहेत. नायजरमध्ये तिला गारूआ आणि नायजर – दाहोमी सीमेवर मेक्राऊ या उपनद्या मिळतात. नायजरमध्ये तिच्यावर न्यामे, साय, गाया व मालांव्हिल ही गावे आहेत. आन्साँगो ते सायपर्यंतच्या भागात पुन्हा द्रुतवाह आहेत. नायजेरियात नायजरला गूंबा येथे केबी, सोकोटो, साकाबा मूरेजी येथे काडूना आणि लोकोजा येथे सर्वांत मोठी बेन्वे या उपनद्या मिळतात. येल्‌वा, बूसा, काइंजी, जेबा, बारो, ईदा, ओनिचा आणि आबो ही या भागातील मुख्य ठिकाणे आहेत. बूसानंतरच्या सु. १९० किमी. भागात पुन्हा द्रुतवाह व बूसा धबधबाही आहे. काइंजी येथे १९६९ मध्ये मोठे धरण बांधून पाणीपुरवठा व जलविद्युत् उत्पादन केले जाते. दुसरे धरण बांधून १९८२ पर्यंत आणखी ५०० मेवॉ. जलविद्युत् उत्पादन वाढविण्याची योजना आहे. १९६४ मध्ये जेबाच्या खाली बॅसीटा येथे ओलितावर मोठे ऊसनिर्मितिक्षेत्र सुरू झाले आहे. त्रिभुज प्रदेशातील प्रवाहांवर बूरूटू व पोर्ट हारकोर्ट ही प्रमुख आणि फोर्काडोस, अकासा, डेग्येमा, वॉरी ही सागरी बंदरे आहेत. तेथून पूर्वी पामतेल निर्यात होत असे, म्हणून या प्रवाहांस तेलनद्या म्हणत. एस्क्राव्हो, फोर्काडोस, नून, ब्रास, न्यू कॅलबार, सोम्ब्रेरो, बानी हे त्रिभुज प्रदेशातील मुख्य प्रवाह होत. त्यांच्या मुखांशी वाळूचे दांडे साचतात.

नायजर नदी


वरच्या व खालच्या नायजरच्या प्रदेशांत सु. १२५ सेंमी. व त्रिभुज प्रदेशात ४०० सेंमी. तर तिंबक्तू येथे फक्त २५ सेंमी. पाऊस पडतो. हवा उष्ण असते. नदीच्या वेगवेगळ्या भागांत वेगवेगळ्या वेळी पूर येत असल्यामुळे आणि द्रुतवाहांच्या अडथळ्यांमुळे तिच्यावरील वाहतूकही खंडित असते.

नायजर वेगवेगळ्या वनस्पती विभागांतून वाहते. फूटा जालन भागात पुंजक्यांनी उगवणारे गवत, फूटा जालन ते बेन्वे संगमाच्या खालपर्यंत उत्तरेकडे उंच गवत, काटेरी झुडुपे व बाभळीच्या जातीची झाडे यांचा व दक्षिणेकडे खुरट्या गवताचा सॅव्हाना गवताळ प्रदेश, ओनिचानंतर उंच वर्षावने व आबोनंतर खारफुटी, दलदल असे प्रकार दिसतात. वर्षावनांत इमारती लाकूड, तेल्या पाम, कोको, केळी, रबर इ. उत्पन्न मिळते.

हिप्पो, सुसरी, सरडे, अनेक प्रकारचे खाद्य मासे, हंस, बगळा, करकोचा, प्लव्हर, सँडपायपर इ. पक्षी व गवताळ प्रदेशात तृणभक्षक व मांसभक्षक पशू असे नायजरच्या प्रदेशातील विविध प्राणिजीवन आहे.

सरोवरप्रदेश व नायजेरियाचा भाग सोडून या नदीच्या खोऱ्यात लोकवस्ती विरळ आहे, काही गावे मध्ययुगापासूनची आहेत. बांबारा, सोंघाई, हौसा, योरूबा, इबो, फुलानी इ. अनेक छोट्यामोठ्या जमाती शेती व मुख्यत: मासेमारी करून या खोऱ्यात राहतात. नायजरवरून नाव पडलेल्या नायजेरियात औद्योगिक विकासास अलीकडेच सुरुवात झाली आहे. कुरुसा व जेबा येथील आणि बेन्वेवरील माकूर्डी येथील रेल्वेपूल, सेगू, मालांव्हिल, काइंजी, ओनिचा येथील सडकपूल व अनेक ठिकाणच्या नदीपार नौका यांमुळे वाहतुकीच्या सोयींत भर पडली आहे. मुखापासून सु. ९०० किमी. जेबापर्यंत मोठ्या नौका जातात. इब्‍न बतूता, अल् इद्रीसी इत्यादींच्या काळी नायजरचा संबंध सेनेगल, नाईल व काँगो यांच्याशी लावीत असत. परंतु एकोणिसाव्या शतकात मंगो पार्क, लेंग, रिचर्ड, लँडर, बार्ट, फ्लेगेल, क्लॅपर्टन इत्यादींनी नायजरचे व बेन्‍वेचे संपूर्ण समन्वेषण केले. फ्रेंच व ब्रिटिश यांनी नायजर खोऱ्याच्या विकासाचे प्रयत्‍न केले. त्यानंतर नायजेरिया, नायजर, माली, गिनी, चॅड, कॅमेरून, आयव्हरी कोस्ट, दाहोमी व अपर व्होल्टा या देशांनी १९६३ मध्ये नायजर नदी आयोग स्थापन करून, नायजर खोऱ्याचा सर्वांगीण विकास सुरू केला आहे.

यार्दी, ह. व्यं. कुमठेकर, ज. ब.