ब्रिजपोर्ट : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील कनेक्टिकट राज्यातील प्रमुख शहर व बंदर. लोकसंख्या १,४२,४५९ (१९८०). हे कनेक्टिकट राज्याच्या नैऋत्य भागात लाँग आयलंड साउंडला मिळणाऱ्या पिक्वॉनक नदीमुखावर वसलेले आहे. न्यू हेवनच्या नैऋत्येस २७ किमी. व न्यूयॉर्कच्या ईशान्येस ९६ किमी. अंतरावर वसलेले हे शहर राज्यातील हार्टफर्डनंतर दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर व पहिल्या क्रमांकाचे औद्योगिक केंद्र आहे. त्याची स्थापना १६३९ मध्ये झाली व १८३६ साली त्यास शहराचा दर्जा मिळाला. १८४० मध्ये लोहमार्गाबरोबरच नवनवीन उद्योगधंद्यांचाही शहरात विकास झाला. १८०० पर्यंत शहराची पिक्वॉनक, फेअरफील्ड, स्ट्रॅटफील्ड, न्यूफील्ड इ. नामांतरे झाली. येथे बांधण्यात आलेल्या उचलपुलावरून शहरास ब्रिजपोर्ट हे नाव पडले.

शहराच्या मधूनच पिक्वॉनक नदी वाहत असून तिच्या पुरेशा खोलीमुळे महासागरीय बोटी थेट आतपर्यंत येऊ शकतात. क्षेपणास्त्रादी शस्त्रास्त्रे, हेलिकॉप्टर व विमाने, ॲल्युमिनियम, ॲस्बेस्टस, पितळी व ब्राँझच्या वस्तू, शिवणयंत्रे, टंकलेखन यंत्रे, विद्युत् सामग्री, औषधे, लोखंडी सामान, कपडे, ध्वनिमुद्रिका इ. येथील विविध उत्पादने होत. ब्रिजपोर्ट अभियांत्रिकी संस्था (१९२४), ब्रिजपोर्ट विद्यापीठ (१९२७), बुलार्ड-हेवन्स तांत्रिक विद्यालय, सेक्रिड हार्ट यूनिव्हर्सिटी (१९६३), हूसटॉनिक कम्यूनिटी कॉलेज (१९६६) या येथील प्रमुख शैक्षणिक संस्था आहेत.

प्रसिद्ध प्रदर्शक आणि ‘बार्नम अँड बेली सर्कशी’चा संयोजक पी. टी. बार्नम याच्या सन्मानार्थ बार्नम हा वार्षिकोत्सव येथे भरतो. १८४६ नंतर बार्नमचे वास्तव्य येथेच होते. काही काळ (१८७५ – ७६) तो शहराचा महापौरही होता. शहरात अनेक उद्याने व करमणूक केंद्रे आहेत. लाँग आयलंड साउंडच्या किनाऱ्यावर सीसाइड पार्क असून त्यात इलाअस हौ (शिवणयंत्राचा शोधक) व बार्नम यांची स्मारके आहेत. शहराच्या विकासामध्ये या दोघांचा सिंहाचा वाटा आहे. नदीतीरावर बिर्डझ्ली हे प्राणिसंग्रहोद्यान आहे. यांशिवाय गोल्फ, बेसबॉल, फुटबॉल, टेनिस इ. विविध खेळांची मैदाने तसेच पोहणे, मासेमारी, स्केटिंग इत्यादींच्या सुविधाही उपलब्ध आहेत. कला, विज्ञान व औद्योगिक संग्रहालय, बार्नम ऐतिहासिक संग्रहालय, सु. १२० पेक्षा अधिक चर्च, क्लाइन मिमॉरिअल प्रेक्षागृह येथे असून येथील वाद्यवृंदही प्रसिद्ध आहे. बार्नमच्या सर्कशीमध्ये ‘जनरल टॉम थम’ नावाने प्रसिद्धीस आलेल्या ठेंगू माणसाचे हे जन्मस्थान होय.

चौधरी, वसंत