लिंट्‍स : ऑस्ट्रियातील अपर ऑस्ट्रिया प्रांताची राजधानी आणि देशातील तिसऱ्या क्रमांकाचे व्यापारी व औद्योगिक शहर. लोकसंख्या १,९९,९१० (१९८१) हे व्हिएन्नाच्या पश्चिमेस १६० किमी. डॅन्यूब नदीच्या दोन्ही तीरांवर वसले आहे. 

रोमनांनी इ. स. पहिल्या शतकांत बांधलेल्या लेंटी या किल्ल्याच्या परिसरात विकसित होत गेलेल्या वसाहतीला लिंट्स असे नाव पडले आणि मध्ययुगात ती महत्वाची व्यापारपेठ बनली. बाल्टिक समुद्र ते इटली या ऐतिहासिक व्यापारमार्गावरील शहर म्हणून लिंट्सला मोठी प्रसिद्धी मिळाली होती. येथे १४९७ मध्ये डॅन्यूब नदीवर बांधलेला, पासौ व व्हिएन्ना यांना जोडणारा पूल त्या काळातील एकमेव समजला जात होता. तेराव्या शतकामध्ये सर्व शहरी सुविधा असूनही लिंट्‍सला शहराचा दर्जा मिळू शकला नाही. पंधराव्या शतकात तिसऱ्या फ्रीड्रिख सम्राटाच्या येथील वास्तव्यात लिंट्‍सला प्रांतिक राजधानीचा दर्जा देण्यात आला. याच काळापासून ते व्यापार-जत्रांचे शहर म्हणून ख्याती पावले. १७८५ पासून येथे रोमन कॅथलिक बिशपचे कार्यालय आहे. 

बाल्टीक व एड्रिअटिक समुद्रांवरील शहरांना जोडणाऱ्या लोहमार्गांवरील एक महत्त्वाचे स्थानक म्हणून त्याच प्रमाणे डॅन्यूब नदीमार्गावरील व्यापारी ठाणे म्हणून लिंट्‍सला मोठे महत्त्व आहे. १९३८ नंतर लिंट्‍सचा उद्योगधंद्यांच्या दृष्टीने (लोखंड व पोलाद निर्मिती, नायट्रोजन निर्मिती संयंत्र इ.) मोठ्या प्रमाणात विकास होत गेला. दुसऱ्या महायुद्धात झालेल्या अपरिमित हानीमुळे पुन्हा नव्याने उद्योगांची उभारणी करावी लागली. इतर उद्योगांमध्ये यंत्रसामग्री, विद्युत्‍सामग्री, कापड व वस्त्रे, रसायने, कागद, सिमेंट काच, फर्निचर, मद्ये, पादत्राणे, रबर, तंबाखू यांच्या निर्मितिउद्योगांचा समावेश होतो. 

लिंट्‍स हे अनेक ऐतिहासिक वास्तूंसाठी विख्यात आहे. त्यांमध्ये जुना किल्ला रोमनेस्क शैलितील सेंट मार्टिन्स चर्च (इ. ७९९) बरोक शैलितील नगरभवन, तेराव्या शतकातील चर्च, प्रमुख चौक व त्यामधील ख्रिस्ताच्या स्मरणार्थ उभारलेली स्मारकशिल्पे, जुने कॅथीड्रल, सोळाव्या शतकातील शासकीय भवन, कॅप्युचिन, अर्सलाइन व कार्मिलाइट हे जुने ख्रिस्ती मठ, नवगॉथिक शैलीतील न्यू कॅथीड्रल (१८६२-१९२४), एस्टेचा आर्चड्यूक मॅक्सिमिल्यन याने बांधलेली एकोणिसाव्या शतकातील तटबंदी, बिशपचा राजप्रासाद, फ्रान्सिस्को-कॅरोलिनम संग्रहालय इत्यादींचा समावेश होतो. 

येथे कला व संगीत यांची प्रशिक्षण केंद्रे, औद्योगिक व कलाविषयक अभिकल्प अकादमी (१९४७) योहानेस केप्लर विद्यापीठ (१९६६), शास्त्रीय संस्था, संग्रहालये, कलावीथी, ग्रंथालये, पुराभिलेखागार, संगीतिका-गृह व रंगमंदिरे असल्यामुळे सांस्कृतिक व शैक्षणिक केंद्र म्हणूनही लिंट्‍सला महत्त्व लाभले आहे. योहानेस केप्लर (१५७१-१६२९) या सुप्रसिद्ध जर्मन ज्योतिषशास्त्रज्ञ-गणितीचे लिंट्‍स येथे १६१२-२४ या कालावधीत राजगणिती म्हणून वास्तव्य होते. ऑस्ट्रियन कथालेखक ऑडाल्बेर्ट श्टिफ्टर (१८०५-६८) याचे १८५० पासून अखेरपर्यंत याच शहरी वास्तव्य होते. श्रेष्ठ ऑस्ट्रियन संगीतकार जोसेफ अँटन ब्रूकनर (१८२४-९६) यांनी १८५६ पासून काही काळ लिंट्‍स कॅथीड्रलमध्ये प्रमुख ऑर्गनवादक म्हणून काम केले. 

याच शहरात जर्मन राष्ट्रीय परिवर्तनवादाच्या विचारसरणीचा उदय झाला, १८८२ मध्ये गेओर्ग रिटर व्हॉन शनरर या आत्यंतिक राष्ट्रीय परिवर्तनवादी विचारसरणीच्या व्यक्तीने या संकल्पनेचा या शहरात मसुदा तयार केला, तो ‘लिंट्‍स कार्यक्रम’ (लिंट्‍स प्रोग्रॅम) म्हणून ओळखला जातो.

ऑक्सिजनच्या साहाय्याने फॉस्फरसचे प्रमाण कमी असलेल्या बिडाचे जलद परिष्करण करणारी आणि लिंट्‍स व डोनाव्हिट्‍स ह्या शहरांत प्रथम वापरात आलेली एल्. डी. पद्धत जगभरच्या पोलादनिर्मिती उद्योगात १९५२ पासून प्रसिद्ध झाली. 

दळवी, र. कों.