पोफळी : महाराष्ट्र राज्याच्या रत्नागिरी जिल्ह्यातील गाव. लोकसंख्या ६,००० (१९७८ अंदाज). वीज केंद्रासाठी प्रसिद्ध असलेले हे गाव चिपळूण तालुक्यात चिपळूणच्या आग्नेयीस सु. १८ किमी., चिपळूण–कराड मार्गावर आहे. याचे महत्त्व ⇨ कोयना प्रकल्पामुळे खूपच वाढले. हे सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने वीजनिर्मित्तीस सोयीचे ठरले. जागतिक बँकेच्या सहकार्याने तीन टप्प्यात पूर्ण होणाऱ्या कोयना प्रकल्पाद्वारे येथे भुयारी वीजगृह बांधण्यात आले आहे. कोयना धरणाच्या शिवाजी सागर जलाशयातील पाणी ४ किमी. लांबीच्या व ६·४ मी. व्यासाच्या बोगद्यावाटे पश्चिमेकडे वळविले असून, ते पोफळी येथील जलविद्युत् केंद्रात आणले आहे. हे पाणी सु. ४०० मी. उंचीवरून येथील वीजगृहातील टरबाईनांवर पडून पुढे वाशिष्ठी नदीत जाते. त्यामुळे तिला बाराही महिने पाणी असते. येथील विद्युत्‌गृहात ८० मेवॉ. क्षमतेची ८ जनित्रे असून त्यांद्वारे महाराष्ट्रातील एकूण वीज उत्पादनाच्या ४०% वीजनिर्मिती होते. याचे नियंत्रण व देखभाल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाकडून होते.

गावात ग्रामपंचायत (स्थापना १९५६),प्राथमिक शिक्षण, दवाखाना इ. सोयी असून आकूसखान दर्गा, महाकालीचे देऊळ इ. धर्मिक ठिकाणे आहेत. प्रतिवर्षी माघ आमावस्येला येथे देवीची मोठी जत्रा भरते.

फडके, वि. शं चौंडे, मा. ल.