मिसूरी : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील एक मध्यवर्ती राज्य. क्षेत्रफळ १,७८,४३८ चौ. किमी. पैकी १,९४७ चौ. किमी. जलव्याप्त आहे. लोकसंख्या ४९,७०,००० (१९८३). याच्या उत्तरेस आयोवा, पूर्वेस इलिनॉय व केंटकी, दक्षिणेस आर्‌कॅन्सॉ, नैर्ऋत्येस ओक्लाहोमा, पश्चिमेस कॅनझस व वायव्येस नेब्रॅस्का ही राज्ये आहेत. राज्याची वायव्य सीमा मिसूरी नदीने, तर पूर्व सीमा मिसिसिपी नदीने बनलेली आहे. जेफर्सन सिटी (लोकसंख्या ३३,६१९–१९८०) हे राज्याच्या राजधानीचे ठिकाण आहे.

भूवर्णन : राज्याच्या मध्य भागातून मिसूरी नदी पश्चिम-पूर्व दिशेने वाहत जाते त्यामुळे राज्याचे दोन भाग झाले आहेत. नदीच्या उत्तरेकडील भागात कमी उंचीच्या लहानलहान टेकड्या, सुपीक मैदाने आहेत. तर दक्षिण भागात आग्नेय कोपरा व पश्चिम सरहद्दप्रदेश वगळता इतरत्र ओबडधोबड टेकड्या, अरूंद खोल दऱ्या व वेगवान प्रवाह आढळतात. हा संपूर्ण प्रदेश अनेक गुहांनी, विवरांनी व नैसर्गिक झऱ्यांनी व्यापलेला आहे. बहुतेक भूप्रदेश सस. पासून ३०० ते ४२५ मी. उंचीचा आढळतो. पश्चिम सरहद्दीलगतचा प्रदेश सामान्यपणे २,२९६ ते २,६२४ मी. उंचीचा असून, आग्नेय कोपरा मात्र मिसिसिपी नदीच्या पूरमैदानाने व्यापलेला सुपीक, सपाट व सस. पासून १,६४० मी. पेक्षा कमी उंचीचा आहे. राज्याचा मध्यवर्ती पूर्व भाग ओझार्क पठाराने व्यापलेला असून त्याच्या ईशान्य सरहद्दीवर मिसूरी नदी तर पूर्व सरहद्दीवर मिसिसिपी नदी आहे. हा प्रदेश चुनखडक व डोलोमाइट खडकांचा बनलेला असून, त्याच्या बऱ्याच भागाची झीज झालेली दिसून येते. याच भागात टॉम सॉक मौंटन हा राज्यातील सर्वोच्च (५३९ मी.) भाग आहे.

राज्याचा बहुतेक भाग पाण्याची विपुलता व चांगली मृदा यांमुळे शेतीच्या दृष्टीने फायदेशीर ठरतो. फक्त ओझार्क पठारावर कमी प्रतीची मृदा आढळते. उत्तर व पूर्व भागांतील मृदा मात्र अत्यंत सपीक आहे.

मिसिसिपी व मिसूरी या येथील प्रमुख नद्या आहेत. मिसूरी ही पूर्व सरहद्दीवर सेंट लूइस शहराजवळच मिसिसिपीला मिळते. यांशिवाय सॉल्ट, शॅरिटन, ग्रँड, लिटल प्लेट इ. नद्या राज्याच्या उत्तर भागाचे जलवाहन करतात तर ओसेज, गॅस्कनेड, व्हाइट, ब्लॅक इ. नद्या ओझार्क पठारावरून वाहतात. या नद्यांच्या खोऱ्यांत निर्माण झालेल्या दलदलीच्या प्रदेशात भराव टाकून जमिनीचे पुनर्मापन करण्यात आले आहे. तसेच मिसूरी व मिसिसिपी नद्यांच्या पुरांपासून रक्षण करण्यासाठी अनेक योजना आखण्यात आल्या आहेत. ओझार्क हे राज्यातील मोठे मानवनिर्मित सरोवर आहे.

हवामान : राज्याचे हवामान सामान्यपणे आर्द्रयुक्त खंडीय प्रकारचे आढळते. कॅनडातून येणाऱ्या थंड, तर मेक्सिकोच्या आखातावरून येणाऱ्या गरम तसेच नैर्ऋत्य भागातून येणाऱ्या कोरड्या वाऱ्यांचा परिणाम येथील वेगवेगळ्या भागांतील हवामानावर दिसून येतो. राज्याच्या उत्तर व वायव्य भागांत जानेवारीतील कमाल तापमान २° से., तर आग्नेय भागात ते ९° से. पर्यंत असते. आग्नेय भागापेक्षा वायव्य भागात उन्हाळा खूपच सौम्य असतो. उन्हाळ्यात राज्याच्या बऱ्याच भागात तापमान ३८° सें. पर्यंत जाते. राज्यात पाऊस मध्यम प्रतीचा पडतो. उत्तर भागात त्याचे प्रमाण ८९ सेंमी., तर आग्नेय भागात ते ११० सेंमी. पर्यंत असते. यापैकी एक-तृतीयांश पर्जन्य एप्रिल ते जून या काळात पडतो. फेब्रुवारी व मार्च या काळात बर्फ पडते. हे राज्य टॉर्नेडोसारख्या झंझावाताच्या पट्ट्यात असूनही येथे ओक्लाहोमा अथवा कॅनझस येथील वादळांइतकी मोठी वादळे उद्‌भवत नाहीत. वर्षाकाठी सरासरी सु. २७ वादळे होतात.

वनस्पती व प्राणी : राज्याचा सु. दोन-तृतीयांश भाग जंगलांनी व बाकीचा भाग प्रेअरी प्रकारच्या गवताळ प्रदेशाने व्यापृत आहे. नद्यांच्या खोऱ्यांत व ओझार्क पठारावरील दऱ्यांमध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. मिसूरीमध्ये प्रामुख्याने लार्कस्पर, कोन फ्लॉवर इ. वनस्पती प्रकार आढळतात. येथील जंगलांत पूर्वी एल्फ, हरणे, गवे व अस्वले भरपूर प्रमाणात होती. परंतू शेतीची प्रगती व फर उद्योगातील वाढ यांमुळे त्यांची संख्या खूप कमी झाली आहे. अलीकडच्या काळात फक्त बीव्हर, ऊद मांजर, मिंक इ. प्राणी तसेच बाहेरून येणारे विविध पक्षी दिसून येतात.

चौंडे, मा. ल.

इतिहास व राज्यव्यवस्था : सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात मिसिसिपी नदीचे फ्रेंच समन्वेषक झाक मार्केत आणि ल्वी झॉल्ये यांनी या राज्यात प्रथम प्रवेश केला. पुढे रॉबेर काव्हेल्ये व ल साल यांनी मिसिसिपी खोऱ्यातील प्रदेशावर फ्रेंच सत्ता प्रस्थापित केली व लुइझिॲना प्रदेश म्हणून तो भाग ओळखला जाऊ लागला. मिसूरी राज्याचा वसाहतकालीन इतिहास फरच्या व्यापारवृद्धीशी निगडित आहे. येथील स्थानिक इंडियन रहिवाशांबरोबरचा फरचा व्यापार फ्रेंचांनीच वाढविला. अठराव्या शतकाच्या प्रारंभी येथील जस्ताच्या खाणीतून उत्पादनही सुरू झाले. फर व्यापाराच्या निमित्तानेच सेंट जेनव्हीव्ह, सेंट लूइस इ. नदीबंदरांची वाढ झाली. १७५४–६३ दरम्यानच्या फ्रेंच-अमेरिकन इंडियन लढ्यात हे राज्य अलिप्त राहिले तथापि या युद्धातील फ्रेंचांच्या पराभवामुळे १७६२ साली मिसिसिपीच्या पश्चिमेकडील प्रदेश गुप्तपणाने स्पेनला देण्यात आला. १८०० मध्ये लुइझिॲना प्रदेश फ्रान्सकडे परत आला आणि अमेरिकेने हा नंतर विकत घेतला (१८०३). नंतरच्या काळात सेंट जेनव्हीव्ह आणि पोटोसी येथील जस्त खाणींच्या उद्योगात अमेरिकन प्रभाव वाढला. सेंट लूइस हे अतिपश्चिमी प्रदेशाकडील व्यापारी मोहिमांचे प्रदेशद्वार बनले. १८१२ मध्ये मिसूरी प्रदेशाची अधिकृतपणे स्थापना झाली. याच वर्षी इंडियनांबरोबर झालेल्या युद्धानंतरही चार वर्षे इंडियनांचा उपद्रव टिकून होता. वाफेच्या बोटी आल्यानंतर मिसिसिपी नदीवरील वाहतूक व व्यापार वाढला दक्षिणेकडून आलेल्या वसाहतकारांनी शेतीची प्रगती केली पण त्यासाठी दक्षिणेतून गुलामही या प्रदेशात आणले. गुलामांच्या प्रश्नावरूनच मिसूरी प्रदेशाला अमेरिकन संघराज्यात प्रवेश मिळण्यास अडचण आली. १८२१ मध्ये याचा निर्णय झाला व हा प्रदेश अमेरिकन संघराज्यास जोडण्यात आला. लुइझिॲना प्रदेशात गुलामगिरीला बंदी होती मात्र इतरत्र गुलामगिरीचे समर्थक राजकीय दृष्टीने वरचढ होते. १८३० च्या दशकातच मॉर्मन लोक आले पण गुलामगिरीस विरोध केल्याने त्यांना १८३९ मध्ये या राज्यातून हाकलून देण्यात आले.

शातो आणि मॅन्युअल लिसा या दोन मोठ्या कुटुंबांनी फर व्यापाराचा मोठा विकास घडवून आणला. मिसूरी नदीपर्यंत फरच्या व्यापारासाठी मोहिमा काढण्यात आल्या. सेंट लूइस हे त्यांचे केंद्र होते. १८३०–४० च्या दरम्यान मध्य आणि पश्चिम मिसूरी नदीखोऱ्यात वसाहती वाढत गेल्या. या राज्याच्या विद्यमान सीमा १८३७ मध्ये निश्चित झाल्या. १८३० नंतरच्या सु. ३० वर्षांत जर्मनांचे आगमन झाले व सेंट लूइसच्या परिसरात ते स्थायिक झाले. या राज्याला राजकीय सांस्कृतिक नेतृत्व या लोकांतूनच लाभले. १८४६ च्या मेक्सिकन युद्धात राज्याने भाग घेतला होता. १८५४ मध्ये गुलामगिरीचा प्रश्न तीव्र झाला. कारण त्यावेळच्या एका अधिनियमानुसार कॅनझस आणि नेब्रॅस्का प्रदेशांतील गुलामांचा प्रश्न सोडविण्याचे स्वातंत्र्य तेथील स्थानिक रहिवाशांना देण्यात आले. त्यामुळे राज्यातील गुलामगिरीच्या पुरस्कर्त्यांनी कॅनझस प्रदेश हस्तगत करण्यासाठी हिंसाचार व अराजक माजविले. अमेरिकन यादवी युद्धात हे राज्य संघराज्यांशी एकनिष्ठ राहिले. १८३२ च्या मध्यात हॅमिल्टन गँबल याच्या नेतृत्त्वाखाली हंगामी सरकार स्थापन करण्यात आले. १८६१ मध्ये मिसूरीत लष्करी कायदा पुकारून सर्व गुलामांना मुक्त करण्याचा आदेश देण्यात आला. तथापि राष्ट्राध्यक्ष लिंकनने हा लष्करी आदेश संघराज्याच्या कायद्यानुसार नीटपणे सुधारून घेण्याचा वटहुकूम काढला. यादवी युद्धाच्या वेळी सेंट लूइस येथे अल्पकाळ सत्तांतरे होत राहिली. यादवी युद्धोत्तर काळात बरेच दिवस राज्यात अराजकच होते. हळूहळू यातून हे राज्य बाहेर पडले. पुढे लोहमार्ग आल्याने नदीकाठाने वाढलेल्या व्यापारी शहरांची व संस्कृतीची पीछेहाट झाली. मार्क ट्‌वेन या प्रसिद्ध अमेरिकन लेखकाच्या साहित्यात तत्कालीन परिस्थितीचे चित्रण आले आहे. नागरीकरण, औद्योगिकीकरण यांना गती मिळून सेंट लूइस या शहराभोवती राज्याचा आर्थिक विकास घडू लागला. पहिल्या महायुद्धकाळात येथे समृद्धी टिकून होती पण १९३० च्या महामंदीच्या काळात मात्र शेती उत्पादनाचे मूल्य गडगडले व ग्रामीण बँका व बँकिंग व्यवसाय डबघाईस आला. दुसऱ्या महायुद्धकाळात सेंट लूइस व कॅनझस सिटी यांना मध्यखंडीय वाहतूक केंद्रांचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यानंतर मात्र राज्याचा औद्योगिक विकास वेगाने घडून आला.

राज्याने १९४५ साली स्वीकारलेले चौथे संविधान सध्या अंमलात आहे. त्यात आजवर २६ दुरूस्त्या झाल्या आहेत. राज्याचे सीनेट ३४ सदस्यांचे (मुदत ४ वर्षे, त्यांतील निम्मे दर दोन वर्षांनी पुनर्निर्वाचित करावे लागतात.) असून प्रतिनिधिगृह १६३ सदस्यांचे (मुदत २ वर्षे) आहे. राज्यपाल व नायब राज्यपाल ४ वर्षांसाठी निवडले जातात. राज्यातर्फे २ सीनेटर व ९ लोकप्रतिनिधी संघीय विधिमंडळावर पाठविले जातात.

राजकीय दृष्टीने राज्याचा कल रिपब्लिकन व डेमॉक्रॅटिक या दोन्ही पक्षांकडे आलटूनपालटून राहिलेला दिसतो. राष्ट्राध्यक्ष हॅरी ट्रूमन मिसूरीयन डेमॉक्रॅटिक पक्षाचे होते. १९८४ मधील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत या राज्यातून अधिक मते रिपब्लिकन पक्षाच्या रेगन यांनाच पडली.

आर्थिक स्थिती : राज्यात १९८३ साली १,१७,००० शेते असून प्रत्येक शेताचे सरासरी क्षेत्र १०८·४४ हे. होते. एकूण कृषिक्षेत्र १२,६१,१५५ हे. होते. १९८३ मधील महत्त्वाची कृषिउत्पादने पुढीलप्रमाणे (संख्या लक्ष बुशेल): मका ७४३·६ सोयाबीन १०१·४ गहू ७०३·०० ज्वारी ४०८·०० ओट २४·८ व कापूस ०·७३ गासड्या (प्रत्येकी ४८० पौंड). यांपैकी सोयाबीनची निर्यात केली जाते. औद्योगिकीकरणाचा वेग कृषिविकासापेक्षा अधिक आहे. राज्याच्या शेती-व्यवसायाला पूरक असे पशुपालन, मांसोत्पादन, दूध आणि दुग्धोत्पादने व कुक्कुटपालन हे उद्योग आहेत. यादृष्टीने कुरणांचे संवर्धन राज्यात महत्त्वाचे ठरते. राज्याची गरज भागविण्याइतके अन्नधान्य व चारा यांचे उत्पादन होते. राज्यात १३,०१,३१९ हे. जमीन जंगलव्याप्त होती (१९८२).

  खनिजांपैकी शिसे, जस्त, चिकणमाती, चांदी, कोळसा, लोहधातू, सिलिका, चुनखडक इ. उल्लेखनीय आहेत. यांशिवाय नैसर्गिक वायू, तसेच तांबे, निकेल, इ. खनिजे मिळतात. खनिजोत्पादन मात्र सामान्यपणे कमी होत चालले आहे. १९८२ साली खनिजोत्पादनाचे मूल्य ७३ कोटी ३८ लक्ष डॉ. होते. राज्यात मोटारी, अन्नप्रक्रिया, विजेची उपकरणे, तयार कपडे, यंत्रसामग्री, कातडी वस्तू, रसायने, कागद, धातूच्या वस्तू, काच, शीतपेये, छपाई व प्रकाशन इ. उद्योगधंदे मोठ्या प्रमाणावर विकसित झाले आहेत. १९५० नंतर विमाने, क्षेपणास्त्रे, झोत एंजिने यांच्या निर्मितिउद्योगात राज्याने खूपच प्रगती केली. चिकणमातीच्या उपलब्धतेमुळे येथील वीटनिर्मितीचा उद्योग विकसित झाला आहे. सेंट लूइझच्या जवळ भरपूर सिलिका उपलब्ध असल्याने त्या भागात काच उद्योगाला चालना मिळाली आहे. येथील पोर्टलंड सिमेंटउद्योग अत्यंत विकसित झाला आहे.

राज्यात ९६ राष्ट्रीय व ५५४ प्रांतिक बँका आहेत. सेंट लूइस व कॅनझस ही दोन शहरे व्यापाराची मोठी केंद्रे आहेत. उद्याने व सहलीची स्थळे विकसित केल्यामुळे राज्यातील पर्यटनउद्योगाला चालना मिळाली आहे.

राज्यात एकूण १,८९,४४५ किमी. राष्ट्रीय व प्रांतिक महामार्ग होते (१९८१). त्याच वर्षी राज्यात एकूण ३३ लक्ष स्वयंचलित वाहने होती. राज्यात १२,९३० किमी. लांबीचे लोहमार्ग आहेत. त्यांखेरीज इतर लहानलहान लोहमार्गही आहेत. राज्यात १९८४ मध्ये ११६ सार्वजनिक व २७७ खाजगी विमानतळ होते. मिसूरी आणि मिसिसिपी नद्यांतूनही जलवाहतूक मोठ्या प्रमाणात होते. राज्यात २४३ नभोवाणी केंद्रे आणि ३० दूरचित्रवाणी केंद्रे होती (१९८३). दैनिक आणि साप्ताहिके १९८४ साली अनुक्रमे २४४ व २२६ होती.

लोक व समाजजीवन : या राज्यातील शहरे आणि वसाहती मुख्यतः अमेरिकन लोकांच्या आगमनानेच वाढत गेल्या. केंटकी, टेनेसी, व्हर्जिनिया, नॉर्थ कॅरोलायना इ. राज्यांतून सामान्यपणे यादवी युद्धापूर्वी खूप लोक आले. १८३० ते १८६० च्या दरम्यान जर्मन, आयरिश, ब्रिटिश इ. लोक सेंट लूइस आणि त्याच्या परिसरात निघून गेले. १८७०–१९२० या काळात दक्षिणपूर्व यूरोपातून अमेरिकेत मोठ्या संख्येने यूरोपीय लोक आले असले, तरी या राज्यात मात्र त्यांपैकी कमीच लोक आले. कॅनझस राज्याचा आग्नेय प्रदेश आणि मिसूरी नदीलगतची काही शहरे यांतून निग्रो लोकवस्ती अधिक आढळते. राज्यात ते १०% होते (१९७०). येथील बहुसंख्य लोक रोमन कॅथलिक पंथाचे आहेत. त्याशिवाय सदर्न बॅप्टिस्ट, युनायटेड मेथडिस्ट, ख्रिश्चन चर्च, ल्यूथरन, प्रेसबिटेरियन इ. पंथांचेही लोक आढळतात.

७ ते १६ वर्षे वयोगटातील मुलामुलींसाठी सक्तीचे शिक्षण आहे. १९८३–८४ साली एकूण विद्यार्थिसंख्या (बालोद्यान ते बारावी) ७,९५,४५३ होती. राज्याच्या शिक्षण विभागांतर्गत शिक्षण मंडळांकडून शैक्षणिक व्यवस्थेवर देखरेख केली जाते. मिसूरी विद्यापीठ (स्था.१८३९), वॉशिंग्टन विद्यापीठ (१८५७), सेट लूइस विद्यापीठ (१८१८) इ. सात विद्यापीठे राज्यात आहेत. शासकीय व खाजगी महाविद्यालये राज्यात सर्वत्र आहेत. चर्चला संलग्न महाविद्यालयांतून १९८२ साली २८,६८९ विद्यार्थी शिकत होते. यांशिवाय राज्यात धंदेशिक्षणाच्या संस्थाही पुष्कळ आढळतात.

सार्वजनिक ग्रंथालये शासकीय मदतीने वाढत आहेत. फिरती ग्रंथालयसेवाही उपलब्ध आहे. मिसूरी, वॉशिंग्टन व सेंट लूइस विद्यापीठांची ग्रंथालये समृद्ध आहेत. लिंडा हॉल ग्रंथालय नैसर्गिक विज्ञाने व तंत्रविद्या यांवरील ग्रंथसंग्रहांसाठी प्रसिद्ध आहे. सेंट लूइसविद्यापीठात व्हॅटिकन ग्रंथालयातील पुस्तकाचे सूक्ष्मपट (मायक्रोफिल्म्स) उपलब्ध आहेत. मिसूरी विद्यापीठातील ग्रंथालय अमेरिकन इतिहास व कृषी यांवरील संदर्भग्रंथांसाठी उल्लेखनीय आहे. ‘राष्ट्राध्यक्ष ट्रूमन ग्रंथालया’ त त्यांच्याकारकीर्दीची महत्त्वाची कागदपत्रे जतन केलेली आहेत.

राज्यात ९ शासकीय मानसोपचार रुग्णालये व केंद्रे असून दोन बालमानसचिकित्सा रुग्णालये आहेत. त्यांत एकूण २३,६९२ रूग्ण होते (१९८३). राज्यात शासनातर्फे वैद्यकीय मदत उपलब्ध केली जाते. या तरतुदीखाली १९८१ साली ३,६१,००० रुग्णाना मदत देण्यात आली. निराधार मुलांसाठी खास मदतयोजना असून वृद्ध, अपंग, संघटनाग्रस्त इत्यादींना शासनाच्या समाजकल्याण खात्यातर्फे मदत देण्यात येते. कामगारांच्या हितसंबंधांस जपण्यासाठी, तसेच बेकारी आणि तीसंबंधीचा विमा इ. तरतुदी व सुविधा राज्यशासनाने केलेल्या आहेत.

महत्त्वाची स्थळे : राज्यात शासनाची वीस उद्याने आहेत. त्यांपैकी ९ ओझार्क विभागात आहेत. तेथील नैसर्गिक झरे, मासेमारीच्या व निवासाच्या सुविधा यांमुळे पर्यटकांची तेथे गर्दी असते. मार्क ट्‌वेन आणि जनरल जॉन जे पर्शिंग यांची जन्मग्रामे अनुक्रमे हॅनिबल व लक्लीड याच राज्यातील. ॲरो रॉक टॅव्हर्न या ठिकाणास वसाहतकालीन महत्त्वाच्या ऐतिहासिक बैठकींचे स्थान म्हणून महत्त्व आहे. ओझार्क सरोवर विशेष प्रेक्षणीय आहे. सेंट लूइस येथील उद्यानात जेफर्सन राष्ट्रीय स्मारक आहे. तेथे शहराच्या इतिहासातील महत्त्वाच्या वास्तू आढळतात. शहरातील गेटवे आर्च (अमेरिकेचे एकेकाळचे पश्चिम महाद्वार) ही अमेरिकेत सर्वांत उत्तुंग आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रुमन यांचे लूमार येथील जन्मस्थळ आता राष्ट्रीय स्मारक बनले आहे. राज्यात ५० अभयारण्ये आहेत. सेंट लूइसमध्ये अत्याधुनिक अशा वास्तू व स्थळे पुष्कळ असून येथील प्राणी आणि वनस्पतिउद्याने प्रसिद्ध आहेत. सेंट लूइसखेरीज राज्यात कॅनझस सिटी, स्प्रिंगफील्ड, इंडिपेंडन्स, कोलंबिया, जेफर्सन सिटी, किर्कवुड ही अत्यंत प्रगत अशी शहरे आहेत. मार्क ट्‌वेनप्रमाणेच टी. एस्‌. एलियट हा प्रसिद्ध कवी व समीक्षक याच राज्यातील होय.

संदर्भ : 1. Federal Writers’ Project, Missouri: A Guide to the ‘‘Show Me’’ State, St. Claire Shores, 1972.

             2. Larkin, Lew, Missouri Heritage, Ozark, 1971.

             3. Meyer, Duane, The Heritage of Missouri–A History, St. Louise, 1970.

जाधव, रा. ग.