प्रशिया : उत्तर-मध्य जर्मनीतील १९४७ पूर्वीचे जर्मन साम्राज्य. प्रशिया ही संज्ञा ते साम्राज्य व त्याचा जर्मनीतील प्रदेश या दोन्ही अर्थांनी वापरली जाते. या साम्राज्याचे क्षेत्रफळ सु. २,९२,६६९ चौ. किमी. व लोकसंख्या ४,०७,४५,००० (१९३५) होती. उत्तरेस बाल्टिक समुद्र, मेक्लनबुर्क उपसागर, डेन्मार्क, उत्तर समुद्र पश्चिमेस नेदर्लंडस, लक्सेंबर्ग, बेल्जियम दक्षिणेस थुरिंजियाचे जंगल, सुडेटन पर्वत व चेकोस्लोव्हाकिया आणि पूर्वेस पोलंड यांदरम्यानच्या प्रशियन साम्राज्यात (बर्लिनसह) एकूण १३ प्रांत असून बर्लिन ही राजधानी होती. या प्रदेशाचा तीन-पंचमांश भाग सखल होता. आग्नेय भाग डोंगराळ असून सुडेटन पर्वतामुळे हा प्रदेश ऑस्ट्रियापासून वेगळा झाला होता. श्नॅकॉप (१,५०२ मी.) हे या प्रदेशातील सर्वोच्च शिखर असून व्हिश्चला, ओडर, एल्ब, एम्स, ऱ्हाईन इ. नद्या महत्त्वाच्या होत. पूर्व जर्मनीतील बहुतेक सर्व महत्त्वाची बंदरे याच प्रदेशात होती.

 प्रशियन सत्तेचा उदय जर्मनीच्या ब्रांडेनबूर्क विभागात झाला. दहाच्या शतकात जर्मन सम्राट पहिला ऑटो याने त्या प्रदेशातील स्लाव्ह लोकांचा पराभव केला. ऑटोचा मुलगा हेन्री फाउलर याने एल्ब नदीच्या पूर्वेकडील प्रदेशात राज्यविस्तार केला. रशियाच्या जंगलमय प्रदेशातील वेंडिश लोकांपासून संरक्षण मिळावे, म्हणून नंतरच्या काळात प्रशियन सत्तेची पूर्व सीमा ओडर नदीच्याही पुढे वाढविण्यात आली. पराभूत वेंडिश लोकांचे तेराव्या शतकात जबरीने ख्रिस्तीकरण करण्यात आले. पुढे जर्मनांनी (ट्यूटन लोकांनी) आपल्या राज्याला ‘ट्यूटॉनिक ऑर्डर स्टेट ऑफ प्रशिया’ असे नामाभिधान दिले. या प्रदेशातील मूल रहिवाशांचे हळूहळू समूळ उच्चाटन करुन जर्मन व डच अधिकाऱ्यांनी या प्रदेशात आपल्या वसाहती स्थापन केल्या. त्यांनी शहरे वसविली, व्यापार व शेतीत सुधारणा केल्या आणि त्याबरोबरच आपल्या प्रदेशाचा पूर्व-पश्चिम विस्तार घडवून आणला. तथापि जुलमी सत्तेमुळे येथील रहिवाशांत असंतोष वाढत गेला. लिथ्युएनियन व पोलिश यांनी यागेल्लोच्या नेतृत्वाखाली १४१० मध्ये ⇨टॅननबर्गच्या लढाईत ट्यूटन सरदारांचा पराभव केला. त्यानंतरच्या दुसऱ्या लढाईत पुन्हा पराभव होऊन १४६६ मध्ये पश्चिम प्रशिया पोलंडला द्यावा लागला व पूर्व प्रशियलाही पोलिशांचे अधिराज्य मान्य करावे लागले. १५२५ मध्ये या प्रदेशाची सत्ता होहेंझॉलर्न या जर्मन घराण्याकडे आली. सोळाव्या शतकात धर्मसुधारणेची चळवळ सुरु झाली. प्रशियन राज्यकर्त्यांनी प्रॉटेस्टंट पंथाचा स्वीकार केला. याच काळात प्रशियात वंशपरंपरागत राजसत्ता सुरू होऊन ब्रांडेनबुर्कचे होहेंझॉलर्न राजघराणे सत्ताधारी बनले. १६१८ नंतर या प्रदेशाचे ब्रांडेनबुर्क-प्रशिया असे राज्य बनविण्यात आले. ⇨तीस वर्षाच्या युद्धात (१६१८–४८) ब्रांडेनबुर्क-प्रशियाचे अतोनात नुकसान झाले. याच शतकातील स्वीडन व पोलंड यांच्यातील सतत होणाऱ्या युद्धांमुळे प्रशियाच्या विल्यम फ्रीड्रिख [द ग्रेट इलेक्टर (कार. १६४०–८८)] याला एक सुसंघटित अधिराज्य स्थापन करण्याची संधी प्राप्त झाली. त्याच्या सत्ताग्रहणाच्या वेळी होहेंझॉलर्न घराण्याकडील प्रदेश तीस वर्षांच्या युद्धात स्वीडिश सैन्याने उद्‌ध्वस्त केला. तेव्हा विल्यम फ्रीड्रिखने वेस्टफेलियाचा शांतता तह (१६४८) करून पूर्व पॉमरेनीया व इतर गमावलेला भाग मिळविला. या तहाने तीस वर्षे चाललेले युद्ध समाप्त झाले. यानंतर विल्यमने स्वीडनला पोलंडविरुद्ध मदत केली (१६५५–६०). पोलंडबरोबरच्या तहात त्याने प्रशियाचा अधिकृत राजा आपण असल्याचे यूरोपच्या निदर्शनास आणून दिले. इतर लहान संस्थाने विलीन करुन त्याने एकसंध प्रशियन सत्तेचा पाया घातला आणि राज्याचे उत्पन्न वाढविले, सैन्याची वाढ केली व दळणवळणाची व्यवस्था सुधारली. त्याचा मुलगा पहिला विल्यम फ्रीड्रिख (कार. १६८८–१७४०) यांने वडिलांचेच धोरण पुढे चालू ठेवले व केंद्रसत्ता अधिक बळकट केली. १७०१ मध्ये स्वतःला राज्याभिषेक करुन घेऊन केनिग्झबर्ग येथे आपण प्रशियाचा राजा झाल्याची ग्वाही फिरवली. त्याच्या कारकीर्दीत प्रशियास स्वीडिश पॉमरेनीयाचा (श्टेटीन धरुन) पूर्वेकडील भाग मिळाला. उर्वरित आयुष्यात त्याने फारशा लढाया केल्या नाहीत. प्रशियाची संरक्षणात्मक फळी मजबूत करण्याच्या निमित्ताने सीमेवर विखुरलेली सेना त्याने एकत्र आणली. तीत काही सुधारणा केल्या. प्रशासन व्यवस्थेसाठी प्रशिक्षित नोकरशाही निर्माण केली व सरदार, सरंजामदार,जमीनदार यांना त्यांचेवेठबिगारीचे हक्क मान्य करुन लष्करी सेवेत रुजू करुन घेतले. यामुळे त्यास ‘प्रशियाचा जनक’ समजतात.

 त्याच्यानंतर फ्रीड्रिख द ग्रेट (कार. १७४०–८६) गादीवर आला. त्याने आपल्या सुसज्ज सेनेचा बहुविध मोहिमांसाठी उपयोग करून घेतला. सर्व क्षेत्रांत प्रगती करून त्याने प्रशिया हे एक बलवत्तर राष्ट्र निर्माण केले. विद्या-कलांचीही त्यास अभिरुची होती. त्याचे राजकीय विचारही स्वतंत्र होते. व्हॉल्तेअरबरोबरचा त्याचा पत्रव्यवहार आणि त्याने लिहिलेली अँटीमॅकिआव्हेले ही पुस्तिका प्रसिद्ध असून द ॲलांबेर, ला मेत्री, मोपेर्त्युई वगैरे तत्कालीन विद्वान साहित्यिकांशी त्याची मैत्री होती. यांशिवाय त्याने युद्धशास्त्र, इतिहास, तत्त्वज्ञान यांसारख्या विषयांवरही लेखन केले. त्याच्या काही कविताही आहेत. ⇨ऑस्ट्रियन वारसा युद्धात (१७४०–४८) त्याची मुत्सद्देगिरी व नेतृत्व हे गुण प्रकर्षाने दिसून आले. माराया टेरीसाबरोबरच्या दोन तहांत (१७४२ व १७४५) त्याचे फ्रान्स, रशिया व ऑस्ट्रिया यांबरोबरचे धोरण स्पष्ट झाले. त्याने सायलीशियावर आक्रमण करून तो प्रदेश काबीज केला पण सप्तवार्षिक युद्धात (१७५६–६३) ऑस्ट्रिया, रशिया व फ्रान्स यांच्या संयुक्त सेनेचा इंग्लंडच्या मदतीने पराभव केला (१७५७). पुढे कूनर्सडॉर्फच्या लढाईत त्याचा दारुण पराभव झाला. तिसरा पीटर रशियाच्या गादीवर आल्यावर त्याने रशियाशी मैत्री केली (१७६२) आणि झालेल्या पराभवाचे उट्टे काढले. रशियाने १७७२ मध्ये पोलंड विभाजनानंतर पॉमरेनीया (डॅन्झिग वगळता) आणि एर्मलांट हे प्रदेश त्याने मिळविले. यासच पुढे पश्चिम प्रशिया असे संबोधिले जाऊ लागले. फ्रीड्रिख द ग्रेटने राज्यविस्ताराबरोबरच देशांतर्गत अनेक सुधारण्या केल्या. नवीन उद्योगधंद्यांस त्याने उत्तेजन दिले, रस्ते बांधले, कालवे खणले व जलसिंचनाच्या अनेक योजना कार्यवाहीत आणल्या.


त्याच्या मृत्यूनंतर दुसरा विल्यम फ्रीड्रिख (कार. १७८६–९७) गादीवर आला. त्याने १७९३ व १७९५ या साली झालेल्या पोलंडच्या विभाजनांचा फायदा घेऊन प्रशियाचा विस्तार केला. त्यानंतर तिसरा विल्यम फ्रीड्रिख (कार. १७९७–१८४०) गादीवर आला. यावेळी प्रशियावर फ्रान्समधील घटनांचा, विशेषतः फ्रेंच राज्यक्रांतीचा आणि तीतून उदभवलेल्या युद्धांचा परिणाम झाला. सुरुवातीस प्रशियाने क्रांतिकारकांविरुद्ध भाग घेतला पण बाझेलच्या तहानंतर (१७९५) आपले धोरण बदलले आणि तटस्थतेचा स्वीकार केला. पहिल्या नेपोलियनने (१७६९–१८२१) ⇨येना व आउअरश्टेटयेथील लढायांत प्रशियाचा पराभव केला आणि टिल्झिटचा अपमानास्पद तह त्यावर लादला (१८०७). प्रशियाचा अधिकाधिक मुलूख नेपोलियनने ताब्यात घेऊन वेस्टफेलियाचे राज्य बनविले व प्रशियाच्या ताब्यातील पोलंडच्या प्रदेशाचे वॉर्साचे संस्थान बनविले. याशिवाय प्रशियाला एल्ब नदीच्या पश्चिमेकडील बऱ्याच प्रदेशावर पाणी सोडावे लागले. याही आणीबाणीच्या काळात प्रशियात उदारमतवाद्यांची चळवळ मूळ धरत होती आणि कार्ल फोम त्सूम श्टाइन, कार्ल आउगुस्ट फोन हार्डेनबेर्ख, विल्यम फोन हंबोल्ट वगैरे सुधारकांमुळे काही सुधारणा होत होत्या. १८११ मध्ये विल्यमने संविधान देण्याचे वचन कृतीत आणले नाही, तरी लोकांच्या दबावामुळे वेठबिगारी पद्धत व सरदारांचे खास हक्क रद्द करून सामाजिक सुधारणेचे नवे पाऊल टाकले आणि शिक्षणक्षेत्रात व महसूल व्यवस्थेत काही सुधारणा केल्या. तसेच लष्करातील काही सेनापतींनी उदा., गेरहार्ट फोन शार्नहोर्स्ट, आउगुस्ट, ग्राफ फोन गनाइझनाऊ यांनी सेनेस प्रशिक्षण देऊन लष्कराचे आधुनिकीकरण केले. प्रशियाने नेपोलियनविरुद्ध रशियास मदत केली (१८१२). लाइपसिक (१८१३) व वोटर्लू (१८१५) या दोन महत्त्वाच्या लढायांत नेपोलियनचा पराभव करण्यात प्रशियन सेनापती फील्ड मार्शल ब्ल्यूखर याने प्रशंसनीय कामगिरी बजावली. त्यामुळे व्हिएन्ना काँग्रेसमध्ये (१८१५) प्रशियाला ऱ्हाईन प्रांत, वेस्टफेलिया, स्वीडिश पॉमरेनीया वगैरे प्रदेश मिळाले. पण प्रशियातील उदारमतवादी पक्षास या काँग्रेसमधील व पवित्र संघातील ऑस्ट्रियाचा पंतप्रधान मेटरनिख याचे प्रभुत्व आवडले नाही. त्या पक्षाने राजाच्या एकतंत्री सत्तेविरुद्ध चळवळ सुरू केली आणि संसद व संविधान यांची मागणी केली.

जर्मनीतील एकूण चाळीस संस्थानांपैकी प्रशिया, सॅक्सनी, हॅनोव्हर, बव्हेरिया, व्ह्यूर्टंबेर्क ही काही मोठी संस्थाने सोडल्यास उरलेली लहान होती. प्रत्येक संस्थानात कायदे व रीतिरिवाज वेगळे होते पण कमीअधिक प्रमाणात उदारमतवाद्यांची चळवळ मूळ धरु पहात होती. समान हितानहिताच्या प्रश्नांवरून एकत्र येण्याचा निर्णय घेण्यासाठी सर्व प्रतिनिधींची सभा फ्रँकफुर्ट येथे बोलावण्यात आली. तिला ‘फेडरल डायेट ऑफ फ्रँकफुर्ट’ असे नाव देण्यात आले. तिच्यापुढे जर्मन एकराष्ट्राची कल्पना नव्हती पण लोकांच्या स्वातंत्र्यासाठी प्रत्येक संस्थानात प्रातिनिधिक सभेची कल्पना पुढे येत होती. काही छोट्या संस्थानांनी ही कल्पना प्रत्यक्ष कृतीत आणण्यास संमतीही दिली. प्रशियात या कल्पनेस विरोध झाला आणि तिसऱ्या विल्यमने भाषण-लेखन-स्वातंत्र्यांवर निर्बंध लादले. पण १८३० च्या पॅरिस क्रांतीने उदारमतवाद्यांची चळवळ अधिकच तीव्र झाली. त्यांना विद्यार्थ्यांचेही सहकार्य लाभले. तिसऱ्या विल्यमच्या मृत्यूनंतर चौथा विल्यम फ्रीड्रिख (कार. १८४०–६१) गादीवर आला. तो विद्वान होता, पण उदारमतवाद्यांच्या इच्छा-आकांक्षांची त्याला जाण नव्हती. प्रशासनात जनतेचा काही सहभाग असावा पण राजाच्या इच्छेविरुद्ध तो नसावा असे त्याचे मत होते. इतर यूरोपीय देशांप्रमाणे राष्ट्रीय लोकसभा स्थापन करण्यासाठी उदारमतवाद्यांची चळवळ चालूच होती. तिला १८४६ मधील रेल्वेच्या सुधारणेने अधिक जोर आला. रेल्वेमुळे शासनास कर्ज झाले. कर्जासाठी लोकांची संमती हवी होती. तशा आशयाचा वटहुकूम तिसऱ्या विल्यमने पूर्वीच जारी केला होता. साहजिकच चौथ्या विल्यमला संमतीसाठी राष्ट्रीय सभा बोलाविणे भाग पडले. या सभेने संमती तर दिलीच नाही, याउलट यातून राजांच्या हक्कांसंबंधी वादंग झाला. यातून जॉर्ज फिक व ऑटो फोन बिस्मार्क हे दोन परस्परविरोधी मतांचे राजकीय नेते पुढे आले. राजाने राजकीय हक्कांची सनद देण्याचे कबूल करून निवडणुकीस मान्यता दिली. तीतून नवीन लोकसभा अस्तित्वात आली. पुढे १८४८ मध्ये पॅरिस येथे पुन्हा क्रांती झाली. तिचा परिणाम जर्मन जनतेवर झाला. लहान संस्थानांनी प्रजेस काही हक्क दिले. प्रशियाने त्यांस विरोध केला तेव्हा यादवी युद्धास सुरुवात झाली आणि राजाने ब्रांडेनबुर्ख ह्यास पंतप्रधान केले. त्याने लष्कराच्या बळावर पुन्हा राजाची सत्ता दृढतर केली पण राष्ट्रीय सभा अस्तित्वात राहिली. १८३४ मध्ये प्रशियाने आर्थिक क्षेत्रात जर्मनीचे एकीकरण करण्यात पुढाकार घेतला होता. पुढील राजकीय एकीकरणासाठी ही बाब आवश्यक होती. १८४८ च्या यादवीनंतर फ्रँकफुर्ट संसदेने चौथ्या विल्यमला देऊ केलेले अखिल जर्मनीचे तख्त राजाने नाकारले. ऑस्ट्रियाला वगळून प्रशियाच्या नेतृत्वाखाली जर्मनीचे एकीकरण करण्याची त्याची योजना ऑलॉमोत्स करारामुळे बारगळली (१८५०) व प्रशिया हा पुन्हा जर्मन राज्यसंघ या कल्पनेभोवती घुटमळत राहिला. १८५८ मध्ये चौथ्या विल्यमला राजप्रतिनिधी (रीजंट) बनविण्यात आले. तो १८६२ मध्ये राजा झाला आणि त्याने बिस्मार्कची पंतप्रधान म्हणून ब्रांडेनबुर्खच्या जागी नेमणूक केली. फ्रिड्रिख द ग्रेटने प्रशियाचा विस्तार केला आणि एक बलवत्तर राष्ट्र म्हणून त्याची कीर्ती वाढविली तर बिस्मार्कने आंतरराष्ट्रीय राजकारणात प्रशियाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली. बिस्मार्कने प्रशियाच्या नेतृत्वाखाली जर्मनीच्या एकीकरणाची मोहीम आखली.

त्याकरिता तीन युद्धे बुद्धिपुरस्पर योजली. अनेकांशी लष्करी व मैत्रीचे करार व तह केले. अखेर ⇨फ्रँकोप्रशियन (जर्मन) युद्धात (१८७०-७१) युद्धाने तिसऱ्या नेपोलियनचा पराभव करुन जर्मनीचे एकीकरण साधले. या संघराज्याचा चौथा विल्यम हा पहिला सम्राट झाला. पहिल्या महायुद्धात जर्मनीचा पराभव झाल्यामुळे प्रशियाचा बराच भाग पोलंडला देण्यात आला त्यामुळे पश्चिम प्रशिया पूर्व प्रशियापासून वेगळा झाला. दुसऱ्या महायुद्धात हिटलरने पोलंडकडे गेलेला प्रदेश पुन्हा मिळविला परंतु युद्धात प्रशियाचे अतोनात नुकसान झाले. या युद्धातील जर्मनीच्या पराभवानंतर रशियने पूर्व प्रशियाचा उत्तर भाग व पोलंडने उरलेला ओडर नदीच्या पूर्वेकडील भाग ताब्यात घेतला. ब्रांडेनबुर्क हा जिल्हा रशियनव्याप्त प्रदेशात समाविष्ट करण्यात आला. १९४७ मध्ये दोस्त राष्ट्रांच्या नियंत्रण समितीने प्रशियाचे राज्य बरखास्त केले.

देशपांडे, सु. र. चौंडे, मा. ल.