जोधपूर : राजस्थान राज्याच्या जोधपूर जिल्ह्याचे ठाणे आणि पूर्वीच्या जोधपूर संस्थानची राजधानी. लोकसंख्या ३,१७,६१२ (१९७१). १४५० मध्ये राव जोधाने वसविले म्हणून याला जोधपूर नाव पडले. येथून जवळच उत्तरेस जुनी राजधानी मंडोर आहे. जुन्या जोधपूरभोवती सोळाव्या शतकात मालदेवाने बांधलेला मजबूत कोट आहे. जोधपूरला विमानतळ असून ते लोहमार्ग व सडका यांचे मोठे प्रस्थानक आहे. इमारती दगड, कापड, लोकर, कातडी, गुरेढोरे, शेतमाल, मीठ यांच्या व्यापाराचे हे केंद्र आहे. काचसामान, हस्तिदंती व लाखेच्या वस्तू, कातडी सामान, नमदा व चाकू, सुऱ्या वगैरे बनविणे, कापड रंगविणे इ. हस्तव्यवसाय येथे चालतात. अभियांत्रिकी व रेल्वे कर्मशाळा आणि सुती कापड, पितळी व लोखंडी सामान, सायकली, शाई, पोलोचे साहित्य इत्यादींचे कारखाने यांनी शहर गजबजलेले आहे. 

जोधपूरचा किल्ला

भव्यतेमुळे उठून दिसणारा एकाकी खडकावरील येथील एक किल्ला प्रेक्षणीय आहे. मोगलांवरील विजयाचे प्रतीक म्हणून अजितसिंहाने उभारलेला किल्ल्याचा फत्ते पोल दरवाजा, महाराजांबरोबर सती गेलेल्या स्त्रियांच्या हातांचे ठसे, भिंतीवर असलेला लोह पोल दरवाजा, जुन्या शस्त्रास्त्रांचा संग्रह, धनमंडीतले देऊळ, इतर मंदिरे गुलाब सागर तलावाकाठचे मोतीमहाल, फूलमहाल, तलहटीकामहाल हे राजवाडे उमदभवन हा नवा राजवाडा इत्यादींवरील कोरीवकाम, बालसमंद. कैलाना व इतर अनेक सुंदर तलाव, विलिंग्डन बागेतील संग्रहालय, तेहतीस कोटी देवांचे तीर्थ, ‘हीरोज हॉल’ ही जोधपूरमधील प्रवासी आकर्षणे होत.

जोधपूरला भारतीय वायुदलाचे प्रशिक्षण महाविद्यालय  होते. येथे राजस्थानचे उच्च न्यायालय, राजस्थान विद्यापीठाला जोडलेले वैद्यकीय महाविद्यालय, १९६२ मध्ये स्थापन झालेले जोधपूर विद्यापीठ आणि त्याच्याशी संलग्न असलेली शास्त्रीय व शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालये या महत्त्वाच्या आधुनिक संस्था आहेत.

दातार, नीला