हार्टफर्ड : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानातील कनेक्टिकट राज्याची राजधानी व महत्त्वाचे औद्योगिक आणि वित्तीय केंद्र व नदी बंदर. कनेक्टिकट व पार्क या नद्यांच्या संगमावर हे शहर वसलेले आहे. लोकसंख्या २,४६,४८९ (२०११).

 

न्यू ॲम्स्टरडॅम येथून आलेल्या डच व्यापाऱ्यांनी येथील कनेक्टिकट नदीची उपनदी पार्क या उपनदीवर १६३३ मध्ये एक किल्ला बांधला मात्र पहिली वसाहत १६३५ मध्ये, जॉन स्टील याच्या नेतृत्वाखाली न्यू टाउन (केंब्रिज) येथून आलेल्या इंग्रज लोकांनी स्थापन केली. याच दरम्यान टॉमस हुकर आणि सॅम्युअल स्टोन यांच्या नेतृत्वात जमिनीच्या शोधात व केंब्रिज येथील धर्मछळाला कंटाळून अनेक लोकांनी हार्टफर्ड येथे स्थलांतर केले (१६३७). येथे पहिल्या इंग्रज समाजाची स्थापना टॉमस हुकर याच्या नेतृत्त्वाखाली झाली. १७९४ मध्ये येथे प्रथमतः विमा कंपनीची सुरुवात झाली. १८७५ मध्ये हे शहर कनेक्टिकट राज्याची राजधानीबनले. १९७३ मध्ये हे प्रमुख आर्थिक व व्यापारी उलाढालीचे शहरबनले. आज येथे विविध कंपन्यांची कार्यालये असून बाजारपेठा व उद्योगधंद्यांबरोबरच विमा बचतीसाठी मोठ्या प्रमाणावर आर्थिक गुंतवणूक केली जात आहे. येथे विविध आंतरराष्ट्रीय विमा कंपन्यांची १०० कार्यालये आहेत. त्यामुळे या शहरास ‘विमा कंपन्यांचे शहर’ असे म्हणतात. विमानाचे सुटे भाग, अणुभट्टी उपकरणे, विद्युत् टरबाइन उपकरणे इत्यादींचे निर्मितिउद्योग शहरात चालतात. हे शहर रस्ते, लोहमार्ग, जलमार्ग आणि हवाईमार्गाने आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय, प्रादेशिक व स्थानिक शहरांशी जोडलेले आहे. ब्रॅडले हा येथील आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ आहे.

 

ट्रिनिटी विद्यापीठ (१८२३), कनेक्टिकट विद्यापीठ, हार्टफर्ड विद्यापीठ (१८७७), सेंट जोसेफ विद्यापीठ (१९३२) ही विद्यापीठे आणि लॉ स्कूल (१९२१), हार्टफर्ड सेमिनरी (१९३४), कॅपिटॉल कम्युनिटी टेक्निकल कॉलेज (१९४६), हार्टफर्ड पदवीधर केंद्र (१९५५) या शैक्षणिक संस्थांमार्फत शहरात शैक्षणिक सुविधा पुरविल्या जातात.

 

म्हस्के, पांडुरंग