कोलंबिया नदी : पॅसिफिकला मिळणारी उत्तर अमेरिकेतील मोठी नदी. लांबी १,९४२ किमी. जलवाहनक्षेत्र ६७,१०० चौ.किमी. कॅनडाच्या ब्रिटिश कोलंबिया प्रांताच्या आग्नेय भागात, रॉकी पर्वतातील ८३३ मी. उंचीवरील कोलंबिया सरोवरात उगम पावून ती वायव्येस ३०४ किमी. वाहत जाते. तेथे सेलकर्क पर्वतरांगेस वळसा घालून एकदम दक्षिणेस वळते. ती रुंद होऊन ॲरो सरोवरे बनतात. कॅनडात कोलंबिया एकूण सु. ७४४ किमी. वाहते. वॉशिंग्टनच्या ईशान्य भागातून संयुक्त संस्थानांत शिरून ती २४० किमी. दक्षिणेस वाहते. मग पश्चिमेस वळून ‘बिग बेंड’ (मोठे वळण) प्रदेशात सु. १६० किमी. व्यासाचे अर्धवर्तुळाकार वळण घेते. हा वळणाचा भाग म्हणजे लाव्हा रसाने बनलेले कोलंबिया पठार होय. लाव्हा प्रवाहांमुळे व हिमयुगातील हिमप्रवाहांमुळे या प्रदेशात अनेक लहानमोठ्याव खोल दऱ्या किंवा कॅन्यन तयार झाल्या. त्यांतील प्रवाह नंतर बंद पडून त्या कोरड्या झाल्या. त्यांना ‘कूली’ असे नाव आहे. कुलींमुळे कोलंबियाच्या प्रवाहाचा मार्ग बदलला. ग्रँड कूली ही दरी सु. ८० किमी. लांब व ३०० मी. खोल आहे. तिच्या खालच्या बाजूस पूर्वीच्या सु. ४०५ किमी. रुंद व १२२ मी. उंच नायगारापेक्षाही मोठ्याधबधब्याची जागा आता कोरडी आहे. येथून जवळच कोलंबियावर १९४१ मध्ये ग्रँड कूली हे प्रचंड धरण बांधले आहे. ते १६८ मी. उंच आणि १,३१५ मी. लांब असून त्याचा फ्रँकलिन डी. रूझवेल्ट हा जलाशय २४२ किमी. लांब पसरला आहे. त्याच्यावर २१,६०,००० किवॉ. वीज उत्पन्न होते. १९७२ पर्यंत ५० लक्ष किवॉ. व १९९२ मध्ये ९० लक्ष किवॉ. पर्यंत वाढविण्याची योजना १९६७ मध्ये जाहीर झाली. कोलंबिया पठारावरून आलेली स्नेक ही सर्वांत महत्त्वाची उपनदी कोलंबियाला वॉशिंग्टन ऑरेगन सीमेवर मिळते. नंतर त्याच सीमेवरून ४८० किमी. वाहत जाऊन कोलंबिया समुद्रास मिळते. त्यापूर्वी कोस्टल व कॅस्केड या पर्वतरांगांमधून तिने आपला मार्ग खोदून काढला आहे. तेथील सृष्टिसौंदर्य मनोवेधक आहे. त्याच भागातून कोलंबिया महामार्ग व लोहमार्ग जातात. ऑरेगनच्या पोर्टलंड या बंदरापासून कोलंबिया उत्तरेकडे सु. ८० किमी. जाते व मग पश्चिमेकडे ८० किमी. जाऊन ॲस्टोरियाजवळ पॅसिफिकला मिळते. कोलंबियाच्या रुंद मुखाजवळील वाळूच्या बांधामुळे पूर्वी जहाजांना अपघात होत असत परंतु धक्के बांधून काढल्यामुळे, तसेच बिनतारी आणि रडार यंत्रणांमुळे हा धोका कमी झाला आहे. 

अमेरिकेच्या एकूण जलशक्तीपैकी तृतीयांश जलशक्ती कोलंबियास्नेक खोऱ्यात मिळते. कोलंबियाचा बहुतेक प्रवास दुर्जल आणि दऱ्याकॅन्यननी भरलेल्या प्रदेशातून होत असल्यामुळे शेतीला पाणीपुरवठा व वीजउत्पादन या मोठ्यागरजा होत्या. त्यासाठी या नदीवर व तिच्या उपनद्यांवर अनेक धरणे बांधण्यात आली. नदीच्या मार्गातील द्रुतवाह टाळून वरच्या भागात जहाजे नेता यावीत, म्हणून पाणशिड्यांची (लॉक्स) योजना अनेक ठिकाणी केलेली आहे. अंडी घालण्यासाठी नदीच्या वरच्या भागात जाणाऱ्या सामन माशांनाही मुद्दाम मार्ग उपलब्ध करून दिले आहेत. कूटने, क्लार्कफोर्क, स्पोकॅन, स्नेक या महत्त्वाच्या उपनद्या आहेत. यॅकमॉ, ओकॅनोगॅन, यूमाटिला, जॉन डे, डेश्यूट, विलेमिट इ. आणखी अनेक उपनद्या आहेत. त्यांचाही उपयोग करून घेतला आहे. कोलंबियावरील प्रकल्पांमुळे एकूण सु.१,००० किमी. नौकामार्ग, सु. २२ कोटी हे. ओलीत व १ कोटी १६ लक्ष किवॉ. हून अधिक विद्युत्शक्ती एवढा लाभ झाला आहे. १९६० मध्ये संयुक्त संस्थाने व कॅनडा यांत कोलंबियाच्या उपयोगाबाबत करार झालेला आहे व उभय देशांच्या सहकार्याने धरणे व वीजघरे यांची वाढ होत आहे. सामन मासे, इमारती लाकूड, फळे, धान्ये व अनेक प्रकारचे कारखानदारीचे उत्पादन यांच्या व्यापारास त्यामुळे फायदा होत आहे. कोलंबिया इतकी उपयुक्त असली, तरी पुरामुळे दरवर्षी फार नुकसान करते. १९४८ सालचा पूर फार विध्वंसक ठरला. धरणांमुळे याला आळा बसत आहे.

कोलंबियाची खाडी हासेटा या स्पॅनिश कॅप्टनने प्रथम पाहिली. कॅ. रॉबर्ट ग्रे हा १७९२ मध्ये प्रथम नदीमुखातून आत शिरला व त्याने त्या आधी या नावाने माहीत असलेल्या या नदीस आपल्या जहाजाचेकोलंबिया हे नाव दिले. लेविस व क्लार्क यांनी १८७५ मध्ये जमिनीवरून नदी गाठली आणि १८०७ ते १८११ पर्यंत डेव्हिड टॉमसन याने उगमापासून मुखापर्यंत तिचे समन्वेषण केले.

कुमठेकर, ज. ब.