गोंडा : उत्तर प्रदेश राज्याच्या याच नावाच्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे प्रमुख ठिकाण. लोकसंख्या ५२,६६२ (१९७१). हे लखनौच्या ईशान्येस १२० किमी. अंतरावर असून नेपाळ सरहद्द व लखनौ यांमधील ईशान्य मीटरमापी लोहमार्गावरील प्रस्थानक आहे. येथून फैझाबाद व बलरामपूर येथे रस्ते जातात. तराईमधील हा गाव मका व ऊस पिकविणाऱ्या विभागात असून येथे शेतमालाची बरीच उलाढाल होते. येथील नगरपालिका १८६९ मध्ये स्थापन झालेली आहे. येथे शाळा, रुग्णालये, ग्रंथालये इ. सोयी असून दोन प्रशस्त सरोवरे गावाची शोभा वाढवितात. गावाचे नाव ‘गाईंचा गोठा’ या अर्थाच्या शब्दावरून पडले आहे. येथील शेवटच्या राजाने १८५७ च्या उठावात भाग घेतल्यामुळे त्याची सर्व मालमत्ता जप्त झाली. 

कुमठेकर, ज. ब.