लूसाका : झँबिया देशाची राजधानी तसेच लोकसंख्या व आर्थिक दृष्ट्या देशातील प्रथम क्रमांकाचे शहर. लोकसंख्या ८,१८,९९४ (१९८७). करिबा जलाशयाच्या उत्तरेला चुनखडकाच्या पठारावर सस.पासून सु. १,२८० मी. उंचीवर वसलेले हे शहर भौगोलिक दृष्ट्या देशाच्या मध्यभागी मोक्याच्या जागी आहे. हे इतर शहरांना व ताम्रखनिजपट्ट्याला मध्यवर्ती असून रस्ते आणि लोहमार्गांचे केंद्र आहे. येथील हवामान काहीसे थंड आहे.

लूसाका हे टांझानिया, केन्या, यांसारख्या उत्तरेकडील देशांना जोडणारा उत्तर महामार्ग व मालावी, मोझँबीक यांसारख्या पूर्वेकडील देशांकडे जाणारा पूर्व महामार्ग यांवरील प्रस्थानक असून ते झिंबाब्वेमधील बूलावायोपासून निघून उत्तरेला झाईरेकडे जाणाऱ्या मुख्य लोहमार्गावरील स्थानक आहे. येथे १९६७ पासून आंतरराष्ट्रीय विमानतळही कार्यान्वित झाला आहे.

उत्तरेकडील ब्रोकन हिल व कटांगा यांकडे जाणाऱ्या एकेरी लोहमार्गावरील गाडी बाजूला काढून ठेवण्याचे ठिकाण म्हणून या शहराचा उदय झाला व जवळच्या ग्रामप्रमुखाच्या नावावरून त्याला लूसाका हे नाव देण्यात आले. सुरुवातीला त्याची वाढ अर्थातच कृषिबाजार केंद्र म्हणून झाली, ती संथ गतीने. येथील थंड हवामान, मध्यवर्ती स्थान यांमुळे १९३५ मध्ये उ. ऱ्होडेशियाची राजधानी लिव्हिंग्स्टनहून येथे हलविण्यात आली. १९६४ मध्ये झँबिया स्वतंत्र झाल्यानंतर मात्र शहराच्या गजबजाटात लक्षणीय वाढ झाली. आज ते प्रामुख्याने शासकीय केंद्र म्हणून ओळखण्यात येत असले, तरी ते आर्थिक, शैक्षणिक, व्यापारी व वाहतूक केंद्रही आहे.

लूसाकाच्या आजूबाजूचा प्रदेश कृषिसंपन्न असल्यामुळे ते या भागातील कृषिबाजारकेंद्र असून तेथे तंबाखू, कापूस इत्यादींचा मोठा व्यापार चालतो. त्याबरोबरच ते झपाट्याने वाढणाऱ्या शेती-उपयोगी उद्योगांचे केंद्रही बनले आहे. तंबाखू उत्पादने व प्रक्रिया करणे तसेच कापड व कपडे, सिमेंट, फर्निचर, बूट, मोटार बांधणी इत्यादींचे निर्मिती उद्योग शहरात मोठ्या प्रमाणावर आहेत.

लूसाका हे शैक्षणिक व सांस्कृतिक दृष्ट्याही महत्त्वाचे केंद्र आहे. झँबियन विद्यापीठ (स्था. १९६६) याच शहरात असून त्याशिवाय अनेक तांत्रिक, कृषि व शिक्षणविषयक महाविद्यालये शहरात आहेत. राष्ट्रीय वैज्ञानिक संशोधन परिषद, वन्यजीव रक्षण संस्था, शहर वाचनालय इ. अनेक संस्था तसेच मुंडा बांगा वनस्पती उद्यान, मोठी चित्रपटगृहे, हौशी कलावंतांना उत्तेजन देण्यासाठी लहान नाट्यगृहे शहरात आहेत. व्यापारी सेवा मात्र त्यामानाने मर्यादित आहेत. त्यांमध्ये मुख्य रस्त्याला लागून असलेली विभागीय वस्तुभांडारे, हॉटेले, उपहारगृहे इत्यादींचा समावेश होतो.

शहराच्या भूदृश्यांवर वसाहतकाळाचा पगडा आढळतो मात्र नगररचनेत खास आकर्षक असे काहीच नाही. शहराची वाढ होत असूनही बहुतेक इमारती एकमजली आहेत. सरकारी कार्यालये व सध्याची वस्ती यांच्या पश्र्चिमेला जुन्या गावात व्यापारी पेठ असून तिचे स्थान एका बाजूला असल्यामुळे काहीसे गैरसोयीचे आहे. सध्या शहराची वाढ पूर्व दिशेला पूर्व महामार्गाच्या कडेला होत आहे. यूरोपीयांनी वसाहत केलेल्या भागात घरे सुटी असून सभोवताली बागा आढळतात. त्यामुळेच हा भाग आकर्षक आहे. मात्र अल्प उत्पन्न गटासाठी घरांची टंचाई आहे. आफ्रिकी लोकांच्या वस्तीत घरे साधी दिसतात. नवीन वस्ती रेल्वे स्थानकापासून सु. ३ किमी.वर एका टेकाडावर असून हा भाग किंग जॉर्जेस ॲव्हेन्यू या रस्त्याने रेल्वे स्थानकाला जोडला आहे. सरकारी कचेऱ्या, क्रीडांगणे यांची आखणी जॉर्जियन आणि पूर्वीच्या इंग्रजी पद्धतीने करण्यात आलेली दिसून येते. 

फडके, वि. शं.