सरगोधा : पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एक औदयोगिक शहर. ते लाहोरच्या वायव्येस सु. १६५ किमी. वर झेलम नदीकाठी वसले आहे. जिल्ह्याचे व सरगोधा विभागाचे मुख्यालय येथे आहे. लोकसंख्या २,९४,००० (१९८१) होती. ते लाहोर व मिआनवाली शहरांशी सडक व रेल्वे मार्गांनी जोडलेले आहे. फैसलाबाद (पूर्वीचे ल्यालपूर) याच्याशीही ते रेल्वेने जोडलेले आहे. इंगजी अंमलात लोअर झेलम कॅनल कॉलनीचे मुख्यालय म्हणून इ. स. १९०३ मध्ये सरगोधाची स्थापना झाली. नंतर शाहपूर जिल्ह्यातील बहुतेक सर्व शासकीय कार्यालये येथे हलविण्यात आली. १९६० पर्यंत जिल्ह्याचे नाव शाहपूर होते पण सरगोधा असे नामांतर करण्यात आले. १९१४ मध्ये येथे नगरपालिकेची स्थापना झाली. शहरात गंथालय, रूग्णालये, क्रिडांगण, अनेक प्राथमिक-माध्यमिक विदयालये व दोन महाविदयालये असून ती पंजाब विदयापीठास संलग्न आहेत. शहरात वस्त्रोदयोगाच्या गिरण्या, तेलाच्या गिरण्या, साबण व रसायने यांचे कारखाने असून धान्याची ही मोठी बाजारपेठ आहे. जिल्ह्याच्या परिसरात गहू, कापूस, बार्ली, मिलेट ही प्रमुख पिके येतात. तसेच मेंढय व गुरांची पैदास होते. त्यामुळे दूध व मांस यांचा व्यापार चालतो. जिप्सम, सैंधव, अभक आणि काच वाळूचे साठे ही खनिजे विपुल प्रमाणात सापडतात. शेत-मालाची बाजारपेठ व कृषिउदयोग यांमुळे हे शहर झपाटयाने वाढत आहे.

देशपांडे, सु. र.