ओबरआमरगौ : पश्चिम जर्मनी राज्याच्या बव्हेरियन आल्प्सच्या कुशीतले गाव. लोकसंख्या ४,६४१ (१९६७). हे म्यूनिकच्या नैर्ऋत्येस ६७ किमी. असून तेथे दर दहा वर्षांनी होणाऱ्या ख्रिस्त चरित्राच्या ‘पॅशन प्ले ’ नाट्यप्रयोगामुळे ते जगप्रसिद्ध आहे. या प्रयोगात गावातील जवळजवळ सर्वजण भाग घेतात. १६३३च्या भयंकर प्लेग आपत्तीत केलेल्या नवसफेडीकरता हा प्रयोग होतो, अशी आख्यायिका आहे. गावात सुबक लाकडी  कोरीव काम होते, पण मुख्य उत्पन्न या दशवार्षिक नाट्यास होणाऱ्या पर्यटकांच्या  गर्दीचेच आहे.

शहाणे, मो. ज्ञा.