हेलेना : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांमधील माँटॅना राज्याची राजधानी व ल्यूइस अँड क्लार्क कौंटीचे मुख्यालय. लोकसंख्या २९,५९६(२०१३ अंदाज) . हे माँटॅना राज्यामधील ग्रेट फॉल्स शहराच्या नैर्ऋत्येस सु. १५३ किमी.वर, रॉकी पर्वताच्या काँटिनेंटल डिव्हाइड पर्वतरांगेच्या पूर्व पायथ्याशी, प्रीकली पिअर खोऱ्यात, सस.पासून सु. १२०५ मी. उंचीवर, मिसूरी नदीनजीक वसलेले आहे. आसमंतातील खाण व कृषी उद्योगाचे पुरवठा केंद्र म्हणून हे प्रसिद्ध आहे. येथे विमानतळ आहे. 

 

मेरिवेदर ल्यूइस व विल्यम क्लार्क हे समन्वेषक १८०५ मध्ये येथे आले होते. सोन्याच्या शोधार्थ आलेले लोक येथील भागास लास्ट चान्स गल्च असे म्हणत. या भागातच जुलै १८६४ मध्ये सोने सापडले व याच ठिकाणी ३० ऑक्टोबर १८६४ मध्ये हेलेना शहर वसवण्यात आले. मिनेसोटा राज्यातील हेलेना शहराच्या नावावरून याचे हेलेना असे नामकरण केले असे म्हणतात. आता या शहरात लास्ट चान्स गल्च नावाचा प्रमुख रस्ता आहे. सोने-चांदी खाण उद्योगामुळे या शहराची भरभराट झाली. १८८१ मध्ये यास शहराचा दर्जा मिळाला. माँटॅना टेरिटरीची १८७५ मध्ये व माँटॅना राज्याची १८८९ मध्ये येथे राजधानी करण्यात आली. १९३५, १९३६ व १९३७ मध्ये झालेल्या भूकंपांमुळे शहराची हानी झाली होती. 

 

खाण उद्योग हा येथील अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक आहे. सध्या प्रशासकीय केंद्र म्हणून यास महत्त्व असून येथे सिमेंट, रंग, रसायने, मांस डबाबंद करणे, पोलादी वस्तू इ. निर्मितिउद्योग चालतात. हेलेना ही आसमंतातील शेतमालाची व पशूंची भव्य बाजारपेठ आहे. 

 

येथील रोमन कॅथलिक कॅरोल महाविद्यालय (१९०९) व माँटॅना विद्यापीठाचे हेलेना महाविद्यालय ही उच्च शिक्षणाची महत्त्वाची केंद्रे आहेत. येथील माँटॅना राज्य ग्रंथालय, हेलेना सार्वजनिक ग्रंथालय, माँटॅना स्टेट हिस्टॉरिकल सोसायटी व तिचे संग्रहालय, ग्रंथालय, कलावीथी राज्य विधानमंडळवास्तू (स्टेट कॅपिटॉल), अल्जेरिया मंदिर, सेंट हेलेना कॅथीड्रल, सेंट जेम्स कॅथीड्रल, हॅरिसन किल्ला तसेच नजीकची हेलेना, सूआल, हाउजर ही सरोवरे मौंट हेलेना व मौंट असेन्शनचे निसर्गसौंदर्य, हेलेना नॅशनल फॉरेस्ट इत्यादींमुळे अनेक पर्यटक हेलेनास भेट देतात. यामुळे अर्थव्यवस्थेचा एक प्रमुख स्रोत म्हणून पर्यटनास येथे महत्त्व प्राप्तहोत आहे. 

आवटी, अनिता जयपाल