याऊंदे : आफ्रिकेतील कॅमेरून देशाची व त्यातील सेंटर-साउथ प्रांताची राजधानी आणि देशातील दूआलाखालोखाल दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर. लोकसंख्या ४,३५,८९२ (१९८१ अंदाज). हे देशाच्या सेंटर साउथ प्रांतातील वनाच्छादित डोंगराळ व पठारी प्रदेशात, अटलांटिक किनाऱ्यावरील दूआला बंदराच्या पूर्वेस २०९ किमी.वर वसले आहे. कॅमेरून हा जर्मनांचा संरक्षित प्रदेश असताना १८८८ मध्ये त्यांनी या शहराची स्थापना केली. १९१५ मध्ये बेल्जियन लष्कराने यावर ताबा मिळविला. राष्ट्रसंघांतर्गत महादेश म्हणून फ्रेंच कॅमेरूनची स्थापना झाली, तेव्हा याऊंदे हे राजधानीचे ठिकाण बनले (१९२२). तेव्हापासून दूआला हे राजधानीचे ठिकाण असण्याचा केवळ दुसऱ्या महायुद्धाचा काळ (१९४०–४६) वगळता, याऊंदे हेच फ्रेंच प्रशासनाच्या राजधानीचे तसेच १९६० पासून स्वतंत्र कॅमेरून देशाच्या राजधानीचे ठिकाण राहिले आहे. हे देशातील प्रशासकीय, व्यापारी, औद्योगिक, वाहतूक व शैक्षणिक दृष्ट्या महत्त्वाचे ठिकाण आहे. शहरात साबण, कौले, विटा, काचेच्या वस्तू, लोणी, चीज, छपाई, मद्य, सिगारेटी इत्यादींचे निर्मितीउद्योग आहेत. याऊंदेचा आसंमत समृद्ध कृषिक्षेत्र असून शेतमालाच्या व्यापाराचे हे मुख्य केंद्र आहे. कॉफी, ऊस, ताडतेल, खोबरे, रबर, इमारती लाकूड, मका, कंदमुळे ही आसमंतातील प्रमुख उत्पादने आहेत. येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ असून पहिल्या महायुद्धापूर्वी जर्मनांनी बांधलेल्या लोहमार्गाने याऊंदे दूआलाशी जोडले आहे. शहरात याऊंदे विद्यापीठ (स्था. १९६२), शिक्षणशास्त्र, कृषी, आरोग्य, अभियांत्रिकी, वृत्तपत्रव्यवसाय, आंतरराष्ट्रीय संबंध व प्रशासनविषयक शैक्षणिक संस्था, जीववैद्यकीय संशोधन संस्था, अणुवीजशास्त्र व कीटकशास्त्रविषयक प्रयोगशाळा, राष्ट्रीय ग्रंथालय व अभिलेखागार, हवामानशास्त्रविषयक केंद्र, रुग्णालये इ. सुविधा उपलब्ध आहेत.

चौधरी, वसंत.