व्हीला : पोर्ट व्हीला. नैर्ऋत्य पॅसिफिक महासागरातील व्हानूआटू प्रजासत्ताकाची राजधानी व देशातील सर्वांत मोठे शहर. लोकसंख्या २६,००० (१९९९). एफाटी बेटाच्या नैर्ऋत्य भागात मेले उपसागराच्या किनाऱ्यावर व्हीला वसले आहे. व्हानूआटू द्वीपसमूहातील व्हीला हे एक प्रमुख सागरी बंदर आणि व्यापारी केंद्र आहे. नगराचे बाह्य रूप जरी फ्रेंच असले, तरी येथील लोकसंख्येत ब्रिटिश, फ्रेंच, व्हिएटनामी व स्थानिक व्हानूआटूअन अशा बहुराष्ट्रीय लोकांचे मिश्रण आढळते. नगरात रुग्णालये, सांस्कृतिके केंद्रे, प्राथमिक शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय आहेत. येथे मांस डबाबंदीकरणाचे एक उद्योगकेंद्र आहे.

बाउअरफील्ड हा व्हानूआटू प्रजासत्ताकातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळ व्हीला नगराला लागूनच आहे. दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन लष्करी तळ येथे होता.

चौधरी, वसंत

Close Menu
Skip to content