मेघना : गंगा व ब्रह्मपुत्रा नद्यांच्या त्रिभुज प्रदेशातून उत्तर-दक्षिण दिशेने वाहणारी बागंला देशातील एक प्रमुख नदी. लांबी २१० किमी २४º उ. व ९०º ५९ पू. यांदरम्यान भैरव बाझार येथे जुनी ब्रह्मपुत्रा व सुरमा या नद्या एकत्र येतात व तेथून पुढे त्यांचा संयुक्त प्रवाह मेघना या नावाने ओळखला जातो. काहींच्या मते याच्याही उत्तरेस मैमनसिंग जिल्ह्याच्या मध्यभागी सुरमा नदीच्या एका फाट्यापासून या नदीचा उगम झाला आहे.

मेघना नदीद्वारे गंगा व ब्रह्मपुत्रा नद्यांचे जास्तीतजास्त पाणी बंगालच्या उपसागराला मिळते. भैरब बाझारनंतर दक्षिणेस चांदपूरच्या वायव्येस या नदीला ब्रह्मपुत्रा (जमुना) व गंगा यांचा पद्मा हा संयुक्त प्रवाह मिळतो. त्यामुळे पुढे या नदीचे पात्र खूपच रुंद झाले आहे. मेघना नदी टेटुलिया, शाहबाझपूर, हटिया व सन्‌द्विप या चार मुखांनी बंगालच्या उपसागराला मिळते. उजवीकडून मिळणारी ढालेश्वरी तर डावीकडून मिळणाऱ्या गुमती, फेनी या तिच्या प्रमुख उपनद्या आहेत.

पावसाळ्यात नदीचे पात्र खूपच रुंदावते. गाळाच्या संचयनामुळे हिच्या मुखाकडील भागात वाळूचे दांडे निर्माण झाले आहेत. नदीपात्र खोल व रुंद असल्याने अंतर्गत जलवाहतुकीच्या दृष्टीने ही नदी देशात महत्त्वाची ठरते, परंतु अनेक ठिकाणी गाळाचे संचयन असल्याने वाहतूक धोक्याची आहे. नोव्हेंबर–फेब्रुवारी हा काळ वाहतुकीच्या दृष्टीने चांगला ठरतो. सागरभागात उद्‌भवणाऱ्या चक्री वादळांमुळे नदीच्या मुखाकडील प्रदेशाचे बरेच नुकसान होते व नदीपात्रातून वाहतूक करणेही अवघड जाते. मे १८६७ मध्ये उद्‌भवलेल्या चक्री वादळामुळे जवळजवळ संपूर्ण हटिया बेट पाण्याखाली गेले होते. उधानाच्या भरतीच्या वेळी येणाऱ्या प्रचंड लाटेमुळे मुखाकडील भागात नदीच्या पाण्याची पातळी सु. ६ मी. वाढते. नदीपात्रात व मुखाकडील भागात सन्‌द्वीप, इटिया यांसारखी अनेक लहानमोठी बेटे आहेत.

मेघना नदीखोऱ्यात प्रामुख्याने भात आणि तागाचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अशुगंज, कदाउदकंदी, चांदपूर, नोआरवाली इ. शहरे या नदीकाठी वसलेली आहेत.

चौंडे, मा. ल.