मेन : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील न्यू इंग्लंड या ईशान्येकडील विभागीय प्रदेशातील सहा राज्यांपैकी आकाराने सर्वांत मोठे राज्य. क्षेत्रफळ ८६,०२६ चौ. किमी. पैकी जलाशयांखालील क्षेत्र ५,९४४ चौ. किमी. आहे. लोकसंख्या ११,५६,००० (१९८४ अंदाज). मेन राज्याच्या पश्चिमेस, उत्तरेस आणि पूर्वेस कॅनडा देश, आग्नेयीस अटलांटिक महासागर आणि दक्षिणेस व नैर्ऋत्येस अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील हँपशर राज्य आहे. ऑगस्टा (लोकसंख्या २१,८१९–१९८०) ही राज्याची राजधानी आहे.

भूवर्णन : मेन राज्याचे आग्नेयीकडून वायव्येकडे पुढीलप्रमाणे तीन प्राकृतिक विभाग पडतात : (१) किनाऱ्यावरील सखल प्रदेश, (२) न्यू इंग्लंड उच्चभूमी व (३) व्हाइट मौंटन विभाग. यांपैकी सखल किनारी प्रदेश राज्याच्या आग्नेय भागात असून न्यू इंग्लंडच्या इतर किनारी प्रदेशासारखाच येथील किनारी प्रदेश आहे. अटलांटिक महासागर किनाऱ्यापासून अंतर्गत भागात १६ ते ६४ किमी. पर्यंत ह्या प्रदेशाचा विस्तार आहे. दक्षिणेकडील किनारी भागात सुंदर पुळणी आहेत. १८ किमी. रुंदीची ‘ओल्ड ऑर्चर्ड बीच’ ही अटलांटिक किनाऱ्यावरील लांब सुंदर व प्रसिद्ध पुळण येथे आहे. तसेच येथे खाड्या व दलदलीचे भागही बरेच आढळतात. पोर्ट एलिझाबेथ भूशिराच्या उत्तरेकडील व पूर्वेकडील किनाऱ्यावर उंचउंच कडे, लहान-लहान उपसागर, अनेक द्वीपकल्पीय भाग, अरुंद नदीमुख खाड्या, फ्योर्ड, कंकणाकार आखाते व वाळूचे पट्टे निर्माण झालेले दिसतात. हा सखल किनारी प्रदेश सस. पासून फारसा उंच नाही. पूर्वी ह्या किनारी प्रदेशाची उंची बरीच होती. तथापि हिमयुगात हिम व बर्फ यांच्या भारामुळे तो खचला गेला व केवळ टेकड्यांचे माथे बेटांच्या स्वरूपात राहिले. अशा प्रकारे निर्माण झालेली सु. १,२०० बेटे येथे आढळतात. यांपैकी सु. ४०० बेटे ५ ते ६५ चौ. किमी. क्षेत्रफळाची आहेत. मौंट डेझर्ट हे येथील सर्वांत मोठे (क्षेत्रफळ २६० चौ. किमी.) बेट आहे. भरती–ओहोटीची येथील तीव्रता जगात सर्वाधिक समजली जाते. या सखल किनारी प्रदेशाच्या वायव्येस न्यू इंग्लंड उच्चभूमी हा दुसरा प्राकृतिक विभाग आहे. उत्तरेस कॅनडापासून दक्षिणेस कनेक्टिकट राज्यापर्यंत पसरलेल्या उच्चभूमीचाच हा भाग आहे. मेनमधील या प्रदेशाची रुंदी ३२ ते ८० किमी. आहे. पूर्वेकडे जवळजवळ समुद्रसपाटीला असलेल्या या प्रदेशाची उंची पश्चिमेकडे ६१० मी. पर्यंत वाढलेली आढळते. या प्रदेशाच्या अगदी ईशान्य भागात सुपीक जमिनीचे व शेतीच्या दृष्टीने विशेष महत्त्व असलेले अरूस्टुक पठार आहे. देशातील सर्वाधिक बटाट्याचे उत्पादन या पठारी प्रदेशातून घेतले जाते. अरूस्टुक पठाराच्या दक्षिणेकडील या प्रदेशात अनेक सरोवरे निर्माण झालेली आढळतात. तसेच या प्रदेशातून अनेक शीघ्रगती नद्या असून त्यांतील बहुतेकींना झऱ्यांपासून व बर्फ वितळल्याने पाणीपुरवठा होतो. राज्याचा वायव्य भाग व्हाइट मौंटन प्रदेशाने व्यापला असून, या प्रदेशाची रुंदी उत्तर भागात सु. ८ किमी., तर दक्षिण भागात ४८ किमी. आहे. न्यू हँपशर राज्यातील व्हाइट मौंटनचाच हा विस्तारित भाग आहे. या भागातच राज्यातील उंच-उंच पर्वतप्रदेश आढळतात. या पर्वतप्रदेशांत हिमयुगकाळात निर्माण झालेल्या एस्करच्या अनेक श्रेण्या आढळतात. हे एस्कर ‘केम’, ‘हॉर्सबॅक’ किंवा ‘हॉगबॅक’ (वराहपृष्ठ) या नावानेही ओळखले जातात. या कमी उंचीच्या रेतीयुक्त कटकांची लांबी १·६ किमी. पासून २४१ किमी. पर्यंत आढळते. कटाडिन हे राज्यातील सर्वोच्च शिखर (१,६०६ मी.) राज्याच्या मध्य भागात आहे. राज्यात १,२०० मी. पेक्षा अधिक उंचीचे नऊ, तर ९१० मी. पेक्षा अधिक उंचीचे ९७ पर्वत प्रदेश आहेत. बहुतेक प्रदेश सदारहित अरण्यांनी व्यापलेले आहेत. मौंट डेझर्ट बेटावर कॅडिलॅक मौंटन हे ४६६ मी. उंचीचे शिखर असून अटलांटिक किनाऱ्यावरील ते सर्वाधिक उंचीचे शिखर आहे.

राज्याच्या नैर्ऋत्य भागात ग्रॅनाइटी जमीन आढळते, तर मध्यवर्ती किनारी व पूर्व भागांत शेल, चुनखडी व रेतीमिश्रित मृदा आढळतात. ईशान्य भागातील अरूस्टुक परगण्यात आढळणारी कॅरिबू लोम प्रकारची मृदा विशेष सुपीक आहे. सखल प्रदेशात चिकणमाती, तर जास्त उंचीच्या प्रदेशात कंकर-मृदा आढळते.

राज्याच्या मध्य भागात ग्रॅनाइट व चुनखडक, अरूस्टुक परागण्यात मँगॅनीज व लोहखनिज, नैर्ऋत्य भागात तोरमल्ली व ब्राउनव्हिल आणि मनसनजवळ स्लेटचे साठे आहेत. यांशिवाय तांबे, चांदी, फेल्स्पार, गार्नेट, शिसे, पीट, वाळू, रेत, दगड, जस्त ही खनिजे राज्यात मिळतात.

मेनमध्ये सुमारे पाच हजारांवर नद्या आहेत. अँड्रस्कॉगिन, सॉको, केनेबेक, पनॉब्स्कॉ, सेंट क्रोई, सेंट जॉन, पिस्कॅटक्का ह्या राज्यातील मुख्य नद्या आहेत. बऱ्याचशा नद्या दक्षिणवाहिनी असून अटलांटिक महासागराला मिळणाऱ्या आहेत. सेंट जॉन नदी मात्र प्रथम उत्तरेस आणि नंतर राज्याच्या उत्तर सरहद्दीवरून पूर्वेस वाहत जाते. हीच राज्यातील सर्वांत लांब नदी आहे. दक्षिणेस मेन–न्यू हँपशर सरहद्दीवरून पिस्कॅटक्का नदी वाहते. ही नदी लहान असली, तरी व्यापारदृष्ट्या ती महत्त्वाची आहे. पूर्वेकडे मेन-न्यू ब्रन्सविकदरम्यानची काही सरहद्द सेंट क्रोई नदीने निर्माण केली आहे. जलवाहतूक व जलविद्युत्‌निर्मितीच्या दृष्टीने राज्यातील बऱ्याचशा नद्या उपयुक्त ठरतात.

राज्यात सु. २,५०० सरोवरे व तळी असून त्यांपैकी पश्चिम-मध्य भागातील मूसहेड हे राज्यातील सर्वांत मोठे (क्षेत्रफळ ३११ चौ. किमी.) सरोवर आहे. त्याखालोखाल बेलग्रेड, ग्रँड, रेंजली, सिबेगो ही महत्त्वाची व मोठी सरोवरे आहेत.

राज्याला ५,५९६ किमी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला असून किनाऱ्याच्या लांबीबाबत फ्लॉरिडा व अलास्का यांखालोखाल मेन राज्याचाच क्रमांक लागतो. नद्या व जंगले यांप्रमाणे समुद्रकिनारा हीसुद्धा मेनला लाभलेली अत्यंत महत्त्वाची नैसर्गिक देणगी आहे. किनारी प्रदेशात सु. १,२०० बेटे व अनेक बंदरे, उपसागर, उपखाड्या, कंकणाखाते आहेत. मासेमारी, जलवाहतूक, पयर्टन इ. दृष्टींनी या किनाऱ्याला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. पोर्टलंड व सीझपोर्ट ही तर वर्षभर वाहतुकीसाठी खुली असणारी बंदरे आहेत.


हवामान : हवामानानुसार राज्याचे किनारी प्रदेश, दक्षिणेकडील अंतर्गत प्रदेश व उत्तरेकडील प्रदेश असे तीन ठळक विभाग पाडता येतात. दक्षिणेकडून व पश्चिमेकडून येणाऱ्या वायुराशींचा, किनारी प्रदेशाच्या व दक्षिणेकडील अंतर्गत प्रदेशाच्या हवामानावर परिणाम होत असतो. या दोन्ही प्रदेशांतील वार्षिक सरासरी तपमान ६º ते ७º से. असते तर उत्तर भागात ते ३º ते ४º से. असते. राज्याचे उन्हाळ्यातील सरासरी तपमान १७º से. असते तर हिवाळ्यातील सरासरी तपमान −७º से. असते. वर्षातील ६० दिवस सूर्यप्रकाशाचे असतात.

उन्हाळ्यात येथे अनेकदा दाट धुके पसरलेले आढळते. वार्षिक सरासरी पर्जन्यमान १०६ ते ११६ सेंमी. व हिमवृष्टीचे प्रमाण १९८ सेंमी. असते. उत्तरेकडील भागात व जास्त उंचीच्या प्रदेशात सरासरी २५० सेंमी. इतकी हिमवृष्टी होते.

वनस्पती व प्राणी : राज्याचे सु. ८४% क्षेत्र वनव्याप्त असून त्यात मऊ लाकडाच्या वनस्पतींचे प्रमाण अधिक आहे. अरण्यांत स्प्रूस, फर, हेमलॉक, पाइन, बीच, बर्च, मेपल, पॉपलर, ओक, विलो, ॲश, अमेरिकन एल्म हे वनस्पति-प्रकार विपुल प्रमाणात आढळतात. आर्थिक दृष्ट्या येथील वनोत्पादनाला विशेष महत्त्वाचे स्थान आहे. गवताची कुरणे व दलदलीचे प्रदेशही खूप आहेत.

राज्यात हरिण, मूस, अस्वल, बॉबकॅट, लिंक्स, बीव्हर, चिचुंद्री, ऊद मांजर, मिंक, फिशर, मार्टेन, वीझल, रॅकून, स्कंक, कोल्हा, ससा, खार, चिपमंक, सायाळ, वुडचक इ. प्राणी तसेच गाणारे पक्षी, समुद्र पक्षी असे सु. ३२० प्रकारचे पक्षी आढळतात. हरणांची शिकार हे येथील प्रमुख आकर्षण आहे. समुद्रात सील, देवमासा, शिंशुक, शेवंडा, फ्लाउंडर, हेक, पोलॉक, ट्यूना, कोळंबी, क्लॅम, हॅडॉक, कॉड, तलवार मासा, सामन आणि सरोवरांमध्ये व नद्यांमध्ये बास, ट्राउट, पिकेरेल, पर्च, सामन इ. जलचर आढळतात. 

चौधरी, वसंत 

इतिहास: गोरे लोक येथे येण्यापूर्वी ॲल्‌गाँक्वियन इंडियनांपैकी अबनाकी आणि एछमिन टोळ्यांचे हजारो इंडियन अनुक्रमे पनाबस्कॉ नदीच्या पश्चिम व पूर्व तीरांवर रहात असत. इरक्वॉइस इंडियन हे त्यांचे शत्रू वारंवार त्यांच्या गावांवर हल्ले करीत असत. मेनमधील पहिले इंडियन हे गोऱ्या लोकांबरोबर सामंजस्याने व शांततेने रहात होते.

लीफ एरिकसन याने आपल्या व्हायकिंग लोकांचे नेतृत्व करून मेन प्रदेशात इ. स. १००० च्या सुमारास प्रवेश केला असावा. अनेक इतिहासकारांच्या मते, इंग्लंडच्या दरबारी असलेल्या जॉन कॅबट या इटालियन कप्तानाने मेन प्रदेशाला १४९८ मध्ये भेट दिली असावी. त्यानंतर फ्रान्सनेही अनेक समन्वेषक या प्रदेशाकडे पाठविले असावे. त्यात जोव्हान्नी दा व्हेरात्सानो (१४८५ ? –१५२८), प्येर दू गा (सु. १५६८–सु. १६३०), साम्युएल द शांप्लँ (१५६७–१६३५) इत्यादींचा समावेश होता. शाप्लँने समन्वेषण करून मेनच्या किनाऱ्यावरील एक सर्वांत मोठे बेट शोधून काढले व त्याला ‘मौंट डेझर्ट’ असे नाव दिले. १६०५ मध्ये सर फर्डिनांड गॉर्जेझ (१५६६–१६४७) व सर जॉन पॉपॅम (१५३१–१६०७) या दोन धनाढ्य इंग्रजांनी जॉर्ज वेमाउथ याला मेनच्या किनाऱ्याचे समन्वेषण करण्याकरिता पाठविले. त्याच्या अनुकूल अहवालांवरून मेन ही वसाहतयोग्य जागा असल्याचे गॉर्जेझ व पॉपॅम या दोघांचे मत बनले आणि त्यांनी १६०७ मध्ये एका समुदायाला वसाहत करावयास तिकडे पाठविले त्यांनी केनेबेक नदीच्या उगमाजवळ ‘पॉपॅम प्लँटेशन’ या नावाने वसाहत उभारली. पुढच्याच वर्षी हे लोक कडक थंडीला व इतर अडचणींना घाबरून इंग्लंडला परतले. या वसाहतकारांनी ‘व्हर्जिनिया’ नावाचे पहिले जहाज बांधले. १६२०–२५ यांदरम्यान इंग्रज वसाहतकारांनी मेनमध्ये अनेक कायम स्वरूपाच्या वसाहती उभारल्या. सॉको या गावाशेजारील १६२३ मधील पहिली स्थायी वसाहत असावी. १६२२ मध्ये ‘कौन्सिल फॉर न्यू इंग्लंड’ या संस्थेने गॉर्जेझ व जॉन मेसन या दोघांमध्ये सांप्रतच्या मेन व न्यू हँपशर या दोन राज्यांमधील एक मोठा भूखंड मालकी हक्काने दिला १६२९ मध्ये या भूखंडाचे समान वाटप करण्यात आले व गॉर्जेझला मेन प्रदेश मिळाला. १६३६ मध्ये गॉर्जेझने पहिले मेन शासन स्थापन केले १६४१ मध्ये याने ‘गॉर्जिआना’ या भागाचे (सांप्रतचे यॉर्क) शहरात रूपांतर केले. सनद मिळालेले हे पहिले इंग्लिश शहर होय. गॉर्जेझच्या मृत्यूनंतर किटरी, वेल्झ व यॉर्क या गावांतील लोकांनी संयुक्त शासन उभारले. १६५२–५८ यांदरम्यानच्या काळात, या शासनाने आणि सॉकोबे, केनबंक पोर्ट, सॉको व स्कारबरो या गावांच्या लोकांनी मेन हा प्रदेश मॅसॅचूसेट्स बे वसाहतीचा एक भाग समजण्यात यावा असे मान्य केले. १६६० मध्ये गॉजेझच्या वारसदारांनी मॅसॅचूसेट्सचा मेनवरील हक्क अमान्य करून तो आपल्या कुटुंबियांचा असल्याचा हक्क मांडला. १६६४ मध्ये इंग्लिश आयुक्तांच्या एका मंडळाने मेन प्रदेश गॉर्जेझ कुटुंबियांना परत करण्याचा आदेश दिला. तथापि १६७७ मध्ये मॅसॅचूसेट्सने गॉर्जेझ कुटुंबियांकडून सु. ६,००० डॉलरला मेन प्रदेश विकत घेतला व तो आपल्या राज्यात निःसंदिग्ध समाविष्ट केला.

मेन व न्यू इंग्लंडच्या प्रदेशांत १६८९ ते १७६३ यांदरम्यानच्या काळात अनेक फ्रेंच व इंडियन लढाया खेळल्या गेल्या. इंग्रज वसाहतकऱ्यांकडून मेन आणि अन्य न्यू इंग्लंडमधील प्रदेश यावर प्रभुत्व मिळविण्याकरिता फ्रेंच व त्यांचे इंडियन साथीदार यांचे अनेकवेळा या प्रदेशावर हल्ले व लढाया झाल्या. मेनचा विल्यम पेपरेल याने नोव्हास्कोशा या कॅनडाच्या प्रांतामधील लुइसबर्ग येथील फ्रेंच किल्ला सर केला. ही या लढायांतील एक ठळक घटना मानली जाते. हे युद्ध १७६३ मध्ये पॅरिसच्या तहान्वये समाप्त झाले. या तहानुसार मेन व उत्तर अमेरिकेतील बराचसा भाग यांवरील फ्रेंचांचे सर्व हक्क रद्दबातल ठरविण्यात आले. १७६० च्या पुढील काळात इंग्लंडने संमत केलेल्या अनेक कायद्यांमुळे मेनमध्ये व उर्वरित वसाहतींमध्ये असंतोष पसरला. या बहुतेक कायद्यांच्यायोगे करांचे वाढते दर, त्याचप्रमाणे वसाहती-व्यापारावर संकोच वा निर्बंध जारी झाले होते. १७७४ मध्ये काही मेनवासियांनी यॉर्क बंदरात साठविण्यात आलेली ब्रिटिश चहाची काही खोकी जाळून नष्ट केली. हा प्रसंग १७७३ मधील प्रसिद्ध ‘बॉस्टन टी पार्टी’ प्रमाणेच ‘यॉर्क टी पार्टी’ म्हणून ओळखला जातो. बॉस्टन टी पाटीप्रमाणेच मेनवासियांच्या या कृत्यामुळे इंग्रजांच्या करपद्धतीविषयी व व्यापारधोरणाविषयी वसाहतींच्या भावना किती तीव्र होत्या हे स्पष्ट झाले.


मॅसॅचूसेट्समधील लेक्झिंग्टन व काँकर्ड या दोन शहरांत क्रांतियुद्ध सुरू झाले (१७७५–८३). त्यामध्ये हजारो मेनवासियांनी उत्स्फूर्तपणे भाग घेतला. या युद्धामुळे मेनमधील अनेक शहरांना व गावांना हानी सोसावी लागली. इंग्रजांनी व्यापाराचा प्रतिबंध केल्याने, मेनमध्ये येणारा अन्नधान्याचा पुरवठा तुटपुंजा पडू लागला. १७७५ मध्ये इंग्रज फौजांनी राजाच्या धोरणांना विरोध केल्याबद्दल फालमथ (सांप्रतचे पोर्टलंड) गाव जाळले. जून १७७५ मध्ये मचायसजवळ पहिले नाविक युद्ध झाले. त्यात मेनच्या काही देशभक्तांनी ‘मार्गारेट’ हे इंग्लिश जहाज बळकावले. क्रांतियुद्धानंतर मेनची लोकसंख्या वाढू लागली. मॅसॅचूसेट्सने आपल्या सैनिकांना मेनमधील जमिनी बक्षीस म्हणून दिल्या. एकोणिसाव्या शतकाच्या पहिल्या अर्धकात, मेनची अर्थव्यवस्था पाइन वृक्षांच्या जंगलांवर निर्भर होती. त्यांपासून मिळणाऱ्या लाकडापासून जहाजांचे बांधकाम तसेच अन्य वस्तू बनविता येणे शक्य होत होते. परंतु अमेरिकेच्या अन्य देशांशी चालणाऱ्या व्यापारावर १८०७ च्या कायद्यामुळे बंदी घातल्याने मेनचा जहाज उद्योग अतिशय तोट्यात आला. परिणामी मेनला अन्य निर्मिति उद्योगांकडे वळणे भाग पडले. मॅसॅचूसेट्समधून मेन वेगळा करावे आणि मेन हे स्वतंत्र राज्य बनविण्यात येऊन, त्याला संघराज्यात एक राज्य म्हणून प्रवेश दिला जावा, यासाठी १७८५ मध्ये एक चळवळ कार्यान्वित झाली. असह्य कारभार, वाईट रस्ते, बॉस्टन या राजधानीचे लांब अंतर वगैरे गोष्टींबद्दल अनेक मेनवासियांनी तक्रारी केल्या होत्या. १८१२ च्या लढाईनंतर या चळवळीने प्रखर जोर धरला. १८१९ मध्ये झालेल्या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मेनवासियांनी मेन राज्यासाठी आग्रह धरुन मतदान केले. परिणामी १५ मार्च १८२० रोजी मेन हे तेविसावे राज्य म्हणून अमेरिकन संघराज्यात समाविष्ट करण्यात आले. विल्यम किंग हा राज्याचा पहिला गव्हर्नर झाला. व पोर्टलंड ही मेनची पहिली राजधानी घोषित करण्यात आली. मेनचा अमेरिकेच्या सांघराज्यातील प्रवेश हा ‘मिसूरी तडजोडी’ चाच एक भाग मानला जातो. या तडजोडीनुसार मेनने संघराज्यात ‘मुक्तराज्य’ (गुलामरहित राज्य), तर मिसूरीने ‘गुलामराज्य’ म्हणून प्रवेश केला. या व्यवस्थेनुसार संघराज्यांतील मुक्त व गुलाम राज्यांची संख्या समान राहिली.

मेन व कॅनडाचे न्यू ब्रन्सविक राज्य यांच्या सरहद्दीविषयी १७८३पासून वाद चालू होता. त्यावरूनच १८३९ चे ‘अरूस्टुक युद्ध’ उद्‌भवले. अमेरिकन शासनाने मेन राज्याकडे जनरल विनफील्ड स्कॉटला पाठविले, त्याने कॅनडियन अधिकाऱ्यांशी अस्थायी करार केला. त्यामुळे प्रत्यक्ष लढाई जुपली नाही. मेन व न्यू ब्रन्सविक या दोहोंमधील सरहद्द अखेरीस १८४२ च्या वेब्‌स्टर-ॲशबर्टन करारानुसार कायमची निश्चित करण्यात आली. १८५१ मध्ये अल्कोहॉलयुक्त पेयांचे उत्पादन व विक्री करण्यावर बंदी घालणारा कायदा संमत करणारे मेन हे देशातील पहिले राज्य ठरले. हा कायदा १९३४ पर्यंत जारी होता. १८३० पासून पुढील काळात मेनवासियांच्या गुलामीविरोधी भावना शिगेस पोहोचल्या होत्या. यादवी युद्धात (१८६१–६५) संघीय फौजांना सु. ७२,००० मेनवासियांनी साथ दिली. यादवी युद्धकाळात हॅनिबल हॅमलिन (१८०९–९१) हा अमेरिकेचा माजी सेनेटर व राज्याचा गव्हर्नर याने अध्यक्ष अब्राहम लिकंनबरोबर अमेरिकेचा उपाध्यक्ष म्हणून काम केले. 

यादवी युद्धानंतर मेन राज्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होत गेला विशेषतः कापड-वस्त्रे व कातडी यांचे उद्योग मोठ्या प्रमाणात विकसित झाले. परिणामी शेती उद्योग मंदावला आणि ग्रामी ण भागातील नद्यांचा जलविद्युत्‌निर्मितीसाठी उपयोग करून घेण्यात येऊ लागला. उद्योजकही राज्याकडे आकृष्ट होऊ लागले व राज्यशासनानेही आपले हितसंबंध राखण्यासाठी तद्‌विषयक कायदे केले. नवीन उद्योगधंद्यांना राज्यात आकृष्ट करण्याच्या हेतूने १९०९ मध्ये शासनाने राज्याबाहेर जलविद्युत् विक्रीला बंदी करणारे विधेयक संमत केले हा कायदा १९५५ पर्यंत जारी राहिला. राज्याने १९०७ मध्ये ‘जनमतपृच्छा व उपक्रमाधिकार कायदा’ संमत केला. १९११ मध्ये शासनाने प्रत्यक्ष प्राथमिक मतदान कायदा संमत केला यायोगे मेनवासियांना राज्य निवडणुकांत आपल्या इच्छेनुसार उमेदवारास निवडून देण्याची संधी प्राप्त झाली. 

राज्यांतील लहान आकाराच्या शेतांची संख्या १९२० पासून घटत गेल्याचे दिसून येते. अरूस्टुक परगण्यांमध्ये अनेक मोठी शेते असून त्यांमधून बटाट्यांचे पीक मोठ्या प्रमाणावर घेण्यात येऊ लागले, त्याचबरोबर दुग्धपदार्थ व कुक्कुटपालन या दोन उद्योगांचा मोठ्या प्रमाणावर विकास होत गेला. तथापि काही काळाने राज्यातील बऱ्याच कापडगिरण्यांनी दक्षिणेकडील राज्यात स्वस्त मजूरपुरवठ्यांमुळे स्थलांतर केले अर्थातच कागद व कागदलगदा उद्योगाचा विकास करुन राज्याने ही हानी भरून काढली. महामंदीचा फटका राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मोठ्या प्रमाणात बसून आर्थिक प्रगती मंदावली परंतु नंतरच्या काळात तिच्यात सुधारणा झाली. 

मार्गारेट चेस स्मिथ या रिपब्लिकन पक्षाच्या महिलेने १९४० च्या पुढील काळात अमेरिकन काँग्रेसच्या दोन्ही गृहांवर निवडून येणारी पहिली महिला म्हणून ख्याती प्राप्त केली. प्रतिनिधीगृहात १९४० –४९ दरम्यान तिने काम केले तर १९४९–७२ दरम्यान ती सिनेटची सदस्या होती.


दुसऱ्या महायुद्धकाळात (१९३९–४५) राज्यातील गिरण्या व कारखाने यांनी लष्करातील पादत्राणे व गणवेष, तर गोद्यांनी मालवाहू जहाजे व युद्धनौका यांची निर्मिती करून केंद्रशासनाला साहाय्य केले. महायुद्धोत्तर काळात, राज्यशासनाने उद्योगांना आकृष्ट करण्यासाठी अनेक सवलती व सुविधा जाही र केल्या राज्यमार्गयंत्रणेत सुधारणा करुन तिचा विकास केला, तर उद्योजकांनी वाढत्या पर्यटनउद्योगासाठी अनेक हॉटेले व मोटेले बांधली. राज्यात १९५० च्या पुढील काळात केंद्र शासनाने वायुदलाचे अनेक तळ उभारले. राज्यातील कांही सर्वांत जुन्या कापडगिरण्या बंद पडल्या, तर लहान प्रमाणावरील शेती जवळजवळ नामशेषच झाली. मात्र राज्यात लहान आकाराच्या अनेक इलेक्ट्रॉनिकीय कंपन्या विकसित झाल्या. राज्याचे आर्थिक विकास खाते (स्था. १९५५) तसेच विविध समूह विकास गट यांनी विविध उद्योगांना राज्यामध्ये उद्योगधंदे उभारावयास विविध आर्थिक प्रोत्साहने दिली. परिणामी कागद व लगदा, अन्नप्र क्रिया यांसारखे उद्योग भरभराटले. विविध क्री डा-सुविधांच्या उपलब्धतेमुळे हजारो हिवाळी पर्यटक राज्याकडे आकृष्ट झाले. 

राजकीय दृष्ट्या, बहुतेक मेनवासियांचा ओढा रिपब्लिकन पक्षाकडे असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. १८५० पूर्वी मेन नागरिकांचा डेमॉक्रॅटिक पक्षाकडे कल होता. तथापि यादवी युद्धापूर्वी मेनवासियांनी रिपब्लिकनांना आपली अनुकुलता दर्शविली कारण रिपब्लिकनांचे गुलामविरोधी धोरण व उत्तरेकडील राज्यांच्या धोरणांना पाठींबा त्यांना आकृष्ट करून गेला १९४० पर्यंत (जवळजवळ १०० वर्षांपर्यंत) मेन मतदारांनी राज्यात, काँग्रेसमध्ये व अध्यक्षीय निवडणुकीत बव्हंशी रिपब्लिकन उमेदवारांना निवडून दिले. फक्त व्हर्‌माँट हे एकच राज्य वगळता मेनने सर्वाधिक रिपब्लिकन अक्ष्यक्षीय उमेदवारांना आपली मते दिली. १८५६ पासून फक्त तीन डेमॉक्रॅटिक उमेदवारांनी –वुड्रो विल्सन (१९१२), लिंडेन बेंझ जॉन्सन (१९६४) व ह्यूबर्ट होरेशो हंफ्री (१९६८) – मेनची निर्वाचक मते संपादिली होती. कित्येक वर्षे मेन राज्यात काँग्रेस व गव्हर्नर यांच्या निवडणुका सप्टेबर मध्ये घेण्यात येत. मेनचे मतदार अशा पक्षातील उमेदवारांना मते देत असत की, जो पक्ष इतर राज्यातील नोहेंबर मधील निवडणूकांत यशस्वी होत असे. यावरूनच ‘मेन नागरिक उमेदवारांना मते देईल, त्याचाच पक्ष सबंध देशात विजयी होईल’ (ॲज मेन गोज, सो गोज द नेशन) अशी अन्वर्थक घोषणा रूढ झाली. तथापि १९५० व १९६० या दोन दशकांत डेमॉक्रॅटिक पक्षाने आपले बळ या राज्यात वाढविले. १९५५ मध्ये एडमंड मस्की हा मेनचा १९३७ नंतर पहिला डेमॉक्रॅटिक गव्हर्नर झाला. १९५८ मध्ये अमेरिकन सेनेटवर मेन राज्यातून निवडून गेलेला तो पहिला डेमॉक्रॅटिक पक्षाचा सेनेटर ठरला. १९६४ मध्ये राज्याच्या विधानमंडळावर डेमॉक्रॅटिक पक्षाचे नियंत्रण सिद्ध झाले. १९६४ मध्ये लंडन बेंझ जॉन्सनने अध्यक्षीय निवडणुकीत मेनची निर्वाचक मते मिळवून गेल्या १५० वर्षाच्या कालखंडातीलएखाद्या राज्याने डेमॉक्रॅटिक पक्षाच्या अध्यक्षीय उमेदवाराला मते देण्याचा इतिहासच निर्माण केला. १९६६ मध्ये रिपब्लिकन पक्षा ने राज्याचे विधानमंडळ आपल्या नियंत्रणाखाली आणले. 

मेन राज्याचे प्रशासन त्याच्या मूळ संविधानानुसारच चालते. राज्य म्हणून घोषित होण्यापूर्वी केवळ तीन महिन्यांच्या अवधीत १८१९ मध्ये राज्याचे संविधान संमत करण्यात आले. १८२० पासून चालू असलेले संविधान१४३ वेळा दुरुस्त करण्यात आले. १९५१, १९६५ व १९७३ मध्ये प्रमुख न्यायाधीशाच्या सूचनांनुसार राज्यसंविधानाच्या पुनःसंहितीकरणास विधानमंडळाने अनुमती दिली. १८ वर्षांवरील सर्व व्यक्तींना मतदानाचा हक्क आहे. राज्याच्या विधानमंडळाच्या दोन्ही सदनांच्या दोन-तृतीयांश सदस्यांच्या अनुमतीने राज्याच्या संविधानात दुरुस्ती करता येते. सांवैधानिक अधिवे शन भरवूनही संविधान दुरुस्ती शक्य असते आणि असे अधिवेशन दोन्ही सदनांतील एकूण सदस्यसंख्येच्या दोन-तृतीयांश सदस्यांच्या अनुमतीने भरविले जाते. मेन राज्याने आतापर्यंत अशा प्रकारचे एकही अधिवेशन भरविलेले नाही. 

दोन वर्षांसाठी निवडलेल्या ३३ सदस्यांचे सीनेट व १५१ सदस्यांचे प्रतिनिधिगृह असे राज्याचे द्विसदनी विधानमंडळ असते. गव्हर्नरची चार वर्षांकरिता लोकमताने निवड होत असून याला लागोपाठ फक्त दोन वेळा गव्हर्नरपदी राहता येते. सांप्रतचा गव्हर्नर डेमॉक्रॅटिक पक्षा चा आहे (१९८३–८६). राज्याला लेफ्टनंट गव्हर्नरचे पद नाही पंरतु सात सदस्यांच्या कार्यकारी परिषदेतर्फे प्रशासन केले जाते. अधिवेशने ऑगस्टा येथे विषमांकी वर्षाच्या जानेवारीच्या पहिल्या बुधवारपासून अनिश्चित काळ भरतात. राज्यकारभारासाठी राज्याचे १६ परगणे करण्यात आले आहेत. राष्ट्रसंसदेवर राज्यातर्फे प्रत्येकी दोन सिनेटर प्रतिनिधी पाठविले जातात. १९८४ च्या अध्यक्षीय निवडणुकीत, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार रोनाल्ड रेगन यांना राज्यामधून ३,३६,५००, तर डेमॉक्रॅटिक पक्षाच्या वॉल्टर माँडेलना २,१४,५१५ मते मिळाली. 

गव्हर्नर कार्यकारी परिषदेच्या संमतीने राज्य सर्वोच न्यायालयासाठी एक मुख्य व पाच सहयोगी न्यायाधीश सात वर्षाकरिता नियुक्ती करतो. १४ वरिष्ठ न्यायाधीशांची सात वर्षांच्या काळासाठी नियुक्ती गव्हर्नरकडूनच करण्यात येते. राज्याच्या १६ परगण्यांकरिता १६ परिवीक्षा (प्रोबेट) न्यायाधीश चार वर्षांसाठी लोकांकडून निवडून दिले जातात. 

आर्थिक स्थिती : राज्यातील एकूण उत्पादनमुल्यामध्ये कृषिउत्पादनाचा सु. १६% हिस्सा असून १९८३ मध्ये ८,१०० शेतांचे मिळून ६३,१३,१०० हे. क्षे त्र होते एका शेताचा सरासरी आकार ७८ ·१० हे. होता. बटाटे हे राज्याचे प्रमुख पीक असून (प्रतिवर्षी सु. १४० कोटी किग्रॅ.) आयडाहो व वॉशिंग्टन या राज्यांपाठोपाठ मेनचा क्रम लागतो. इतर महत्त्वाच्या शेतीउत्पादनांमध्ये ओट, गवत, मका, वाटाणे, घेवडे, साखरबीट, इत्यादींचा, तर फळामध्ये सफरचंद, ब्लूबेरी, रास्पबेरी, स्ट्रॉ बेरी इत्यादींचा अंतर्भाव होतो. 

पशुपालन व पशुजन्य पदाथनिर्मिती हे राज्यातील अतिशय महत्त्वाचे व्यवसाय होत. मेन शेतकरी हे प्रतिवर्षी सु. ७३० लक्ष ब्रॉइलर कोंबड्या (सु. ५०० लक्ष डॉलर मुल्य) वाढवितात. यांशिवाय अंडी दूध उत्पादन हेही अन्य महत्त्वाचे व्यवसाय केले जातात. १९८३ मध्ये राज्यात १,४६,००० गुरे५७,००० गाई व १४,००० मेंढ्या होत्या.  

मेनमध्ये वर्षाकाठी सु. ३०० लक्ष डॉ. किंमतीचे मासे पकडले जातात. मासेमारीच्या दृष्टीने राज्याचा देशात बराच वरचा क्रम लागतो. खेकडे पकडणारे (प्रतिवर्षी सु.९० लक्ष किग्रॅ.) मेन हे देशातील सर्वांत मोठे राज्य समजले जाते. यांशिवाय गांडूळ, क्लॅम,सागरी पर्च, हेरिंग, कोळंबी इ. प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणात पकडण्यात येतात. पोर्टलंड व रॉकलंड ही राज्यातील सर्वांत महत्त्वाची मच्छीमार बंदरे होत. 


राज्यातील एकुण उत्पादनमूल्यापैकी सु. ८०% हिस्सा निर्मिती व प्रक्रिया उद्योगांचा आहे. कागद व लगदा उद्योग हे राज्यातील सर्वांत महत्त्वाचे उद्योग (प्रतिवर्षी सु. ३,२५० लक्ष डॉलर मूल्य व एकूण निर्मितिउद्योगांत ३४% वाटा) गणले जातात. राज्यांतील मोठ्या शहरांत कागद गिरण्या असून (सु. ४७ व १७,९५७ कामगार) ‘द ग्रेट नॉदर्न पेपर कंपनी’ चा देशातील सर्वांत मोठा कागद गिरण्यांमध्ये समावेश होतो. चामडी व तज्जन्य वस्तुनिर्मिती हा दुसऱ्या क्रमांकाचा उद्योग असून त्यापासून सु. १,८०० लक्ष डॉ. मूल्याच्या वस्तूंचे उत्पादन होते. पादत्राणांच्या निर्मिती उद्योगात सर्वाधिक श्रमबळ गुंतलेले आहे. अन्न व खाद्यपदार्थ यांचे डबाबंदीकरण तसेच प्रशीतन यांबाबत राज्याचा वरचा क्रम लागतो. ब्लूबेरी, कोंबड्या व तळलेले बटाटे हे प्रमुख प्रक्रियित व प्रशीतित पदार्थ होत. यांशिवाय सार्डीन, खेकडे, झिंगे, इ. वर प्रक्रिया करणाऱ्या कारखान्यांच्या बाबतीत हे राज्य आघाडीवर आहे. सफरचंदांचा रस, वाटाणे, काकड्या, लोणची, भोपळे, इ. वर प्रक्रिया करून अनेक पदार्थ बनविले जातात. लाकडी, ओंडके व कापीव लगद्याचे लाकूड यांचे उत्पादन राज्यात प्रतिवर्षी सु. ८,०२,००० घ. मी. व १८ लक्ष में. टन होते. स्प्रू स, फर, व्हाइट, पाइन, हेमलॉक, व्हाइट व यलो बर्च, शुगर मेपल, व्हाइट, सीडार, बीच, ओक या प्रमुख वृक्षप्रकारांपासून लाकूडउत्पादन केले जाते. राज्यातील प्रतिदिनी होणारे १० कोटी दातकोरण्यांचे उत्पादन हे देशात सर्वाधिक गणले जाते. लाकडापासून बनविण्यात येणाऱ्या इतर वस्तू म्हणजे पेट्या, होड्या, कुंपणे, खेळणी, लाकडी तक्तपोशा, खेकडे पकडण्याचे सापळे, आगकाड्या, स्की या होत. कापडउद्योग तुलनेने बराच मंदावला आहे. याशिवाय मासेमारी होड्या व शिडाची जहाजे बनविण्याच्या गोद्या राज्यात मोठ्या प्रमाणात असून ‘बाथ आयर्न वर्क्स’ हा बाथ गावातील जहाजे बांधण्याचा कारखाना देशातील सर्वांत मोठ्या जहाजकारखान्यांपैकी एक समजला जातो. याशिवाय स्वयंचलित वाहनांचे सुटे भाग, धातुपदार्थ, बर्फ-खडकफोडी यंत्रे इत्यादींचे उत्पादनही राज्यात होते. 

खाणकामापासून राज्याला प्रतिवर्षी सु. २०० लक्ष डॉ. मूल्याचे उत्पादन मिळते. वाळू व रेवा ही राज्यातील प्रमुख खनिजे. काही ग्रॅनाइटच्या खाणी आहेत. यांशिवाय चुनखडी, माती, तांबे, पीट, चांदी व जस्त या खनिजांचेही उत्पादन होते. वैदूर्य , तोरमल्ली, इतर रत्नप्रकार यांचेही उत्पादन करण्यात येते.

राज्यातील सु. ६६% वीज औष्णिक केंद्रापासून, तर उर्वरित वीज जलविद्युत्, डिझेल व वायु-टरबाइन केंद्रांपासून उत्पादित केली जाते. राज्यातील अँड्रस्कॉगिन, केनेबेक, पनॉबस्कॉ व सॉको या नद्यांवर मुख्यत्वे जलविद्युत्‌निर्मितीकेंद्रे उभारण्यात आली आहेत. 

राज्यात १९८३ मध्ये सु. ३५,५६६ किमी. रस्ते होते त्यांपैकी ६,१५८ किमी. राज्य महामार्ग ६,३९७ किमी. राज्य-साहाय्यित मार्ग आणि उर्वरित २०,६८१ किमी. ग्राममार्ग होते. १९८४ मध्ये राज्यात ६,६९,२४० प्रवासी गाड्या, ८७,२६७ व्यापारी वाहने व ४०,३६१ मोटारसायकली होते. सु. ३,९७८ किमी. लांबीचे लोहमार्ग असून त्यांवरून बव्हंशी मालवाहतूक केली जाते. कॅनडियन पॅसिफिक रेलरोड हा लोहमार्ग राज्यातील पाच शहरे कॅनडातील शहरांना जोडतो व प्रवासी वाहतूकसेवा उपलब्ध करतो. १९८४ मध्ये राज्यात परवाना असलेले असे ७६ विमानतळ होते त्यांपैकी ३४ व्यापारी सार्वजनिक वाहतुकीचे, १२ बिगर व्यापारी व ४ प्रवासी वाहतुकीचे होते. ‘डेल्टा एअरलाइन्स’ ही एकमेव विमान कंपनी देशातील इतर भागांशी प्रवासी आणि मालवाहतूक करते. बँगॉर येथे आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे. 

सबंध उत्तर अमेरिकेमध्ये उन्हाळी क्रीडाकेंद्र म्हणून मेन राज्य प्रसिद्ध आहे. १९८३ मध्ये सु. ४० लक्ष पर्यटकांनी राज्याला भेट दिली, त्यामुळे ६,५५५ लक्ष डॉ. चे उत्पन्न मिळाले. 

राज्यात १० दैनिके व सु. ३५ साप्ताहिके प्रसिद्ध होतात. बँगॉ र येथे १९२४ पासून पहिले नभोवाणीकेंद्र, तर १९५३ मध्ये पहिले दूरचित्रवाणीकेंद्र कार्यान्वित झाले. सांप्रत राज्यात सु. ८५ नभोवाणीकेंद्रे व सु. १२ दूरचित्रवाणीकेंद्रे आहेत. 

राज्यातील १९८० मधील ११,२५,०२७लोकसंख्येपैकी ४८·५% पुरुष,५१ ·५% स्त्रिया ४०· ७% नागरी व ५९·३% ग्रामीण लोकसंख्या असून ६० ·५% लोकसंख्या २१ वर्षे व त्यांवरील वयाची होती. १९८१ मध्ये जन्म १६,६९५ मृत्यू १०,४५१, बालमृत्यू १४६, विवाह १२,३८८ व घटस्फोट ५,८०४ झाले. राज्यातील दर १०० मनुष्यांपैकी ९६ अमेरिकेत जन्मलेले आहेत. रोमन कॅथलिक (२,७०,२८३) हा सर्वांत मोठा धार्मिक समूह असून त्याखालोखाल बॅप्टिस्ट (३६,८०८) काँग्रिगेशनॅलिस्ट (४०,७५०), इतर ख्रिस्ती चर्चचे लोक (३४,०६६) हे येतात. ५ ते २१ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना मोफत, तर ७ ते १७ वर्षे वयाच्या विद्यार्थ्यांना सक्तीचे शिक्षण आहे. १९८३–८४ मध्ये ६१० प्राथमिक, १०५ माध्यमिक व ४१ संयुक्त शाळांमध्ये (एकूण ७५६ शाळा) २,०९,७५३ विद्यार्थी व १२,२८३ व १,०३५ शिक्षक होते. राज्यात १९ महाविद्यालये असून त्यांपैकी बोदन (ब्रन्सविक), बेट्‌ स (ल्यूइस्टन) व कोल्बी (वॉटरव्हिल) ह्या महाविद्यालयां ची देशातील सर्वांत नामांकित महाविद्यालयांमध्ये गणना होते. मेन विद्यापीठात (स्था. १८६२) १९८३ –८४ मध्ये २८,५९१ विद्यार्थी व १,००३ अध्यापक होते. या विद्यापीठाची राज्यात सात ठिकाणी केंद्रे आहेत. राज्यात १९८४ मध्ये ४२ सर्वसाधारण रुग्णालये (४,५७१ खाटा), ३ मनोरुग्णालये (५४१ खाटा) व १४४ शुश्रूषालये (१०,२२० खाटा) होती. सामाजिक सुरक्षा प्रशासनातर्फे वृद्ध, अंध व अपंग व्यक्तींना प्रतिमास ३२४ डॉ. पूरक सुरक्षा उत्पन्न दिले जाते. ही योजना १९७४ पासून कार्यान्वित झाली.


राज्यातील संग्रहालयांमध्ये स्थानिक व राज्याचा इतिहास, कला, नाविक इतिहास इत्यादींविषयीचे संग्रह आढळतात. ऑगस्टामधील मेन राज्य संग्रहालयात इतिहास, निसर्गेतिहास, मानवशास्त्र, सागरी जीवशास्त्र, खनिजविज्ञान, विज्ञान व तंत्रविषयक बहुमोल संग्रह आहेत. हे संग्रहालय विविध शैक्षणिक कार्यक्रम राबविते तसेच एक संशोधन ग्रंथालयही चालविते. पोर्टर्लंडमधील मेन ऐतिहासिक संस्थेचे एक मोठे संशोधन ग्रंथालय असून ‘वॉड्‌झवर्थ लाँगफेलो निवासा’ चे संस्थेकडून जतन केले जाते. बाथ येथील ‘बाथ सागरी संग्रहालय’ हे सर्वांत मोठे असून तेथे प्रतिवर्षी सागरी इतिहासावर परि संवाद भरविण्यात येतो. रॉकफर्ड येथील ‘विल्यम ए. फार्न्‌झवर्थ ग्रंथालय व कला संग्रहालय’, सीर्झपोर्ट येथील ‘पनॉबस्कॉ सागरी संग्रहालय’, ‘पोर्टर्लंड कला संग्रहालय’, मेन विद्यापीठातील मानवशास्त्र संग्रहालय व कलावीथी ही अन्य लक्षणीय संग्रहालये होत. राज्यात अनेक उन्हाळी रंगमंदिरे असून ओगनक्विट येथील रंगमंदिर सर्वांत जुने व प्रसिद्ध आहे. पोर्टलंड येथे एक महत्त्वाचा वाद्यवृंद आहे.

विन्स्लो होमर (१८३६ –१९९०)–  हा सागरी विषयांवरील चित्रांकरिता ख्याती लाभलेला चित्रकार, विल्यम किंग (१७६८ –१८५२)– मेन राज्य चळवळीचा खंदा पुरस्कर्ता व राज्याचा पहिला गव्हर्नर, हेन्री नॉक्स (१७५०–१८०६)– अमेरिकेच्या स्वातंत्र्ययुद्धातील तोफखान्याचा सेनापती व अमेरिकेचा पहिला युद्धमंत्री हेन्री वॉड्झवर्थ लाँगफेलो (१८०७–८२)– हा प्रसिद्ध कवी, जॉन मारन (१८७२–१९५३)– हा प्रसिद्ध जलरंगचित्रकार, एड्ना मिले (१८९२–१९५०)– ही प्रसिद्ध कवीयित्री व पुलिट्झर पारितोषकाची मानकरी, एडमंड मस्की (१९१४– )– डेमॉक्रॅटिक गव्हर्नर, अमेरिकन सेनेटर, उपराष्ट्राध्यक्षपदाचा उमेदवार व अमेरिकेचा परराष्ट्रमंत्री एड्‌विन आर्लिग्टन रॉबिन्सन (१८६९–१९३५)– कवी व तीन पुलिट्झर पारितोषकांचा मानकरी, हॅरिएट बीचर स्टो (१८११–९६)– ही दास्यमोचन चळवळीची पुरस्कर्ती व मानवतावादी तसेच अंकल टॉम्‌स केबिन या प्रसिद्ध ग्रंथाची लेखिका इत्यादी मेन राज्यातील प्रसिद्ध व्यक्ती होत.

मेन राज्यातील सुंदर व रमणीय किनारी प्रदेश हजारो पर्यटकांना प्रतिवर्षी आकर्षित करतात. अनेक पुळण्यांमुळे पर्यटकांना पोहणे, मासेमारी व नौकाविहार यांचा मुनमुराद आनंद अनुभवता येतो. जंगलमय प्रदेशाच्या उपलब्धतेमुळे मृगयेचा छंदही कित्येकांना भागवता येतो. राज्यातील सु. २,५०० सरोवरे आणि ५,००० नद्या व निर्झर यांमधून पर्यटकांना मासेमारीचा आनंद मिळतो. स्की क्रीडामोसम मध्य-डिसेंबर ते मध्य-एप्रिलपर्यत असतो. जॉर्ज वॉशिंग्टनच्या व्हर्जिनियामधील ‘मौंट व्हर्नॉन’ या निवासगृहाची हुबेहूब प्रतिकृती असलेली व १८२० मध्ये बांधलेली एल्सवर्थ येथील ‘ब्लॅक-मॅन्शन’ही वास्तू ‘मेनचे मौंट व्हर्नॉन’ म्हणून ओळखली जाते. मचायस येथील ‘बर्नम’ टॅव्हर्न ही पांथशाळा १७७५ मधील अमेरिकन स्वातंत्र्यसैनिकांची स्मृती आजही उजळविते. पोर्टलंड येथील १७९१ मधील ३१ मी. उचींचे ‘पोर्टलंड हेड लाइट’ हे दीपगृह देशातील सर्वांत जुन्यांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. केनेबंक पोर्टजवळील ‘सी शोअर ट्रॉली म्यूझीयम’ हे अमेरिकेतील सर्वांत मोठे संग्रहालय असून तेथे केवळ विद्युत्‌चलित लोहमार्ग व तद्‌विषयक साधने यांचा संग्रह आहे. पोर्टलंड येथील तिमजली ‘वॉड्झवर्थ लाँगफेलो हाउस’ हे हेन्री वॉड्झवर्थ लाँगफेलो या प्रसिद्ध कवीचे निवासगृह म्हणून राज्यातील सर्वांत आकर्षक स्थान आहे. एका खलाशाने आपल्या पत्नीसाठी बांधलेली अत्याकर्षक ‘वेडिंग केक हाउस’ ही दुमजली वास्तू पर्यटकांना आकृष्ट करते. १५० चौ. किमी. क्षेत्राचे ‘अकेडिया राष्ट्रीय उद्यान’ (स्था. १९१९) हे राज्यातील एकमेव राष्ट्रीय उद्यान असून ते रम्य किनारा, पर्वतांतून फेरफटका, पादपथ इ. मुळे पर्यटकांना मोठ्या प्रमाणात आकृष्ट करते. यांशिवाय २९ राज्यउद्याने आहेत. राज्यात अनेक वार्षिकोत्सव (मेन सीफूड्स फेस्टिव्हल, ब्रॉ इलर फेस्टिव्हल, पोटॅटो ब्लॉसम फेस्टिव्हल)भरविण्यात येतात. 

गद्रे, वि. रा.