प्रवरा : महाराष्ट्र राज्याच्या अहमदनगर जिल्ह्यातून सामान्यतः पश्चिम-पूर्व दिशेने वाहणारी गोदावरीची उपनदी. लांबी २०० किमी. ही अहमदनगर जिल्ह्याच्या अकोला तालुक्यात, सह्याद्रीच्या पूर्व उतारावर कुलांग व रतनगड या शिखरांदरम्यान उगम पावते. उगमापाशी अमृतेश्वराचे हेमाडपंती मंदिर आहे. उगमानंतर ती पूर्वेकडे अकोला, संगमनेर या तालुक्यांतून जाऊन पुढे श्रीरामपूर व राहुरी या तालुक्यांच्या सरहद्दीवरून वाहते व नेवासे तालुक्यात प्रवेश करते. या तालुक्यात पिचडगावाजवळ प्रवरेस मुळा ही तिची महत्त्वाची उपनदी मिळाल्यानंतर ती ईशान्यवाहिनी बनते आणि प्रवरासंगम येथे गोदावरीस मिळते. या नदीस डावीकडून आढळा (अदुला), महाळुंगी व उजवीकडून मारसिंग व गोरा यांचा संयुक्त प्रवाह तसेच मुळा या महत्त्वाच्या उपनद्या मिळतात. प्रवरा नदीवर अकोला तालुक्यात भंडारदरा येथे १९२६ मध्ये विल्सन धरण (भंडारदरा) बांधण्यात आले. त्यातील पाणी नदीच्या पात्रात सोडून ओझर येथील बंधाऱ्‍याने अडवून तेथून दोन कालव्यांद्वारा संगमनेर, राहुरी, श्रीरामपूर, नेवासे या तालुक्यांतील २३,७५० हे. शेतीस पुरविले जाते. ऊर्ध्व प्रवरा प्रकल्पानुसार या नदीवर अकोला, संगमनेर, राहुरी, कोपरगाव, श्रीरामपूर व नासिक जिल्ह्यातील सिन्नर इ. तालुक्यांतील ६५,५९० हे. जमिनीस पाणीपुरवठा केला जाईल. याशिवाय प्रवरा खोऱ्‍यात तिच्या मुळा व आढळा या नद्यांवरही अनुक्रमे बारागाव नांदूर आणि देवठाण येथे धरणे बांधून शेतीस पाणीपुरवठा करण्यात आला आहे. प्रवरा नदीकाठची जमीन काळी, कसदार, व सुपीक आहे. भंडारदरा धरणाचा निसर्गसुंदर परिसर व धरणाच्या पूर्वेस ९ किमी. वर असलेला रंधा धबधबा तसेच ज्ञनेश्वरांनी जेथे ज्ञानेश्वरी लिहिली, असे परंपरेने सांगितले जाते ते या नदीकाठावरील इतिहासप्रसिद्ध नेवासे शहर इ. ठिकाणे पर्यटकांना आकर्षून घेतात.

गाडे, ना. स. कमलापूर, पां. म.