ब्रूसेल्स : बेल्जियम देशाची तसेच ब्राबांट प्रांताची राजधानी. लोकसंख्या १०,०८,७१५ (१९८० अंदाज). बेल्जियमच्या आधुनिकतेचे व संपन्नतेचे दर्शन घडविणारे हे शहर अँटवर्पच्या दक्षिणेस ४२ किमी. सेने नदीकाठी वसलेले आहे. हे देशातील एक प्रमुख प्रशासकीय, व्यापारी, औद्योगिक व सांस्कृतिक केंद्र असून येथे इइसी (यूरोपियन इकॉनॉमिक कम्यूनिटी), नाटो (नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन) इ. आंतरराष्ट्रीय संघटनांची कार्यालये आहेत. जुन्यानव्या सुंदर वास्तू व दुतर्फा वृक्षराजींनी नटलेले ऐसपैस रस्ते येथे आढळतात. रस्ते, लोहमार्ग यांचे हे केंद्र असून येथे आंतरराष्ट्रीय विमानतळही आहे. शार्लर्बा कालव्याद्वारे कोळशाने समृद्ध असलेल्या अशा दक्षिण भागाशी, तर व्हिलब्रुक कालव्याद्वारे  स्केल्ट नदीशी व पर्यायाने उत्तर समुद्राशी ब्रूसेल्स जोडले गेल्याने यास जलवाहतुकीच्या दृष्टीनेही महत्त्व प्राप्त झालेले आहे. छोटे ‘पॅरिस’ म्हणून ते ओळखले जाते.

इतिहासप्रसिद्ध ‘न्यू रॉयल कॅसल’, ब्रूसेल्स.

येथे प्रारंभी रोमन व पुढे इ. स. सातव्या शतकात फ्रँक लोकांचे वास्तव्य होते. इ. स. ६०० च्या सुमारास कँब्रेच्या बिशपने सेने नदीतील बेटावर एक छोटे चर्च उभारले. दहाव्या शतकापासूनच स्थानिक सरदारांच्या प्रोत्साहनाने कोलोन-गेंट-ब्रूझ यांना जोडणाऱ्या यूरोपमधील प्रमुख व्यापारमार्गावरील स्थानामुळे याचा उद्योग आणि व्यापारक्षेत्रात झपाट्याने विकास झाला. तेराव्या शतकात ब्रूसेल्स लोकर उद्योगाचे केंद्रस्थान बनले. शहराभोवती ११३४, १३५६ व १३८३ मध्ये तटबंदी पूर्ण करण्यात आली. ड्यूक ऑफ ब्राबांटने आपली राजधानी येथेच केली (१३८३). त्यामुळे राजवाडे, चर्च इ. वास्तू शहरात उभारण्यात येऊ लागल्या. कलाक्षेत्रातही हे शहर अग्रगण्य ठरले. १५६१ मध्ये व्हिलब्रुक कालव्यामुळे यूरोपमधील एक व्यापारी शहर म्हणून यास महत्व प्राप्त झाले.

बर्गंडीच्या सरदारांचे हे मुख्य ठाणे होते. या घराण्यातील मेरीने पहिल्या मॅक्सिमिल्यन याच्याशी विवाह केल्याने ब्रूसेल्स हॅप्सबर्ग घराण्याच्या अखत्यारीत आले. या घराण्याच्या अंमलात स्पॅनिश नेदर्लंड्सची राजधानी येथेच होती. मात्र नंतरच्या काळात डच व फ्लेमिश लोकांत स्पेनविरुद्ध प्रतिकाराची भावना निर्माण झाली. स्पॅनिश युद्धात (१६९५) या शहराची मोठ्या प्रमाणात हानी झाली. पुढे १७१४-च्या उत्रेक्तच्या तहान्वये हे ऑस्ट्रियाच्या अंमलाखाली आले. १७९४ ते १८१४ पर्यंत हे फ्रेंचाच्या ताब्यात होते. फ्रेंच यादवी युद्धकाळात यावर अनेकदा हल्ले झाले. तसेच वॉटर्लूची प्रसिद्ध लढाई शहराच्या जवळच १९ किमी. वर झाली. तदनंतर १८१५ च्या व्हिएन्ना परिषदेतील तरतुदींनुसार ‘युनायटेड नेदर्लंड्स’ची निर्मिती होऊन हे शहर त्याची राजधानी करण्यात आले. २५ ऑगस्ट १८३० रोजी नेदर्लंड्सविरुद्ध बंड उसळले व बेल्जियम स्वतंत्र होऊन, त्याची राजधानी ब्रूसेल्सला करण्यात आली. स्वातंत्र्योत्तर काळात शहराच्या विकासाच्या दृष्टीने योजनाबद्ध प्रयत्न करण्यात आले. दुसऱ्या लीओपोल्डच्या कारकीर्दीत (१८६५ -१९०९) याची अधिकच प्रगती झाली. पहिल्या व दुसऱ्या महायुद्धकाळांत हे जर्मनीच्या ताब्यात होते.

शहराचे अपर व लोअर असे दोन भाग असून, अपर भागात राजवाडा, संसदभवन व इतर शासकीय कार्यालये आहेत. लोअर भागात जुन्या वास्तू असून त्यात प्रसिद्ध ग्रँड प्लेस हा चौक, १५ व्या शतकातीर हॉटेल द व्हिल (नगरभवन), मीझाँ द् र्‌वॅ हा राजवाडा इ. प्रसिद्ध वास्तू आहेत. येथे प्रारंभी गालिच्यांचा व लेसचा व्यवसाय विकसित झाला. कापड, रसायने, विद्युत्‌साहित्य, साबण, औषधे, कातडी वस्तू इ. नवीन उद्योगही येथे प्रगत झालेले आहेत. देशातील प्रमुख उद्योगधंदे, व्यापार, विमाकंपन्या इत्यादींची प्रधान कार्यालये येथेच आहेत.

देशातील प्रमुख शैक्षणिक केंद्र म्हणून ब्रूसेल्स प्रसिद्ध आहे. ब्रूसेल्स मुक्त विद्यापीठ (१८३४), कला, विज्ञान, संगीत, वैद्यक यांच्या अकादमी येथे आहेत. शहरातील शाही ग्रंथालय, सेंट मायकेल चर्च, सेंट गुदूल चर्च, न्यायालयवास्तू, नोत्रदाम देस व्हीत्वारेस चर्च, संसदभवन, मॅनकिन हे प्रसिद्ध कारंजे, कला संग्रहालय, वनस्पतिउद्यान यांमुळे पर्यटकांचे हे आवडते स्थळ बनले आहे. १९५८ मध्ये येथे आंतरराष्ट्रीय औद्योगिक जत्रा भरली होती.

खांडवे, म. अ.