पोर्ट एलिझाबेथचे विहंगम दृश्य

पोर्ट एलिझाबेथ : दक्षिण आफ्रिका प्रजासत्ताकाच्या केप प्रांतातील प्रमुख औद्योगिक शहर व बंदर. लोकसंख्या ३,८६,५७७ महानगरीय ४,६८,५७७ (१९७०). हे हिंदी महासागराच्या ॲल्गोआ उपसागर किनाऱ्यावर वसले असून, पार्श्वभागी ६०–९० मी. उंचीचा पठारी भाग आहे. सर रुफेन डाँकिन या ब्रिटिशाने १८२० मध्ये या शहराची रचना करून आपले पत्नी लेडी एलिझाबेथ हिचे नाव या शहराला दिले. १८७३ मध्ये किंबर्ली लोहमार्गबांधणी पूर्ण झाल्यापासूनच याचा जास्तीत जास्त विकास झाला. वाहतूक आणि दळणवळणाच्या उत्तम सोयी, स्वस्त, विद्युत्‌शक्ती व भरपूर पाणीपुरवठा इत्यादींच्या उपलब्धतेमुळे देशांतील निर्मितीउद्योगांचे हे प्रमुख केंद्र बनले आहे. स्वयंचलित यंत्रे, कातडी वस्तू, टायर, केबली, विजेऱ्या, कापड, लाकडी सामान, रसायने, काच, साबण, फळे डबाबंदीकरण, खाद्यपदार्थ निर्मिती इ. उद्योगधंदे येथे चालतात. ‘फोर्ड व ‘जनरल मोटर्स’ या परदेशी मोटार कंपन्यांचे कारखाने याच्या परिसरात आहेत. हे देशांतील तिसऱ्या क्रमांकाचे कृत्रिम सागरी बंदर असून मँगॅनीज, लोहखनिज, कोळसा, कातडी, लोकर, लिंबू जातीची फळे, शहामृगांची पिसे यांची निर्यात आणि स्वयंचलित यंत्राचे सुटे भाग, रबर इत्यादींची आयात या बंदरातून होते. येथेच पोर्ट एलिझाबेथ विद्यापीठ (१९६४) आहे. न्यू ब्राइटन, ह्यूमवुड, वॉलमेर, स्व्हार्टकॉप्स व कॉर्स्टेन ही याची उपनगरे होत. येथील फ्रेडरिक किल्ला ही दक्षिण आफ्रिकेतील सर्वांत जुनी वास्तू (‌१७९९), वस्तुसंग्रहालय, कलावीथी, सुंदर पुळणी, जलजीवालय, सेंट जॉर्ज पार्क, सेट्लर्स पार्क, सर्प उद्यान व उत्तरेस काही अंतरावरील ॲडॉ एलिफंट नॅशनल पार्क इ. प्रेक्षणीय ठिकाणांमुळे एक पर्यटन केंद्र म्हणूनही यास महत्त्व आले आहे.

चौधरी, वसंत