जेफर्सन सिटी : अमेरिकेच्या मिसूरी राज्याची राजधानी. लोकसंख्या ३२,४०७ (१९७०). अमेरिकेचा तिसरा अध्यक्ष जेफर्सन याच्या नावावरून राज्याच्या अगदी मध्यभागी, मिसूरी नदीच्या काठी ओसेज नदीच्या मुखापासून ६४ किमी.च्या आत असावे या अटीवर शासनाने देणगी दिलेल्या जागेवर हे १८२१ मध्ये वसविले गेले. सभोवतीच्या प्रदेशातील शेतमालाची बाजारपेठ आणि छपाई, विद्युत् उपकरणे, पुस्तक बांधणी, प्रसाधने, पादत्राणे इ. व्यवसाय असलेल्या या शहरी राज्याचे कारागृह असल्यामुळे तेथे शासकीय विद्यापीठ होऊ शकले नाही तथापि निग्रो फेडरल आर्मीच्या जवानांनी स्थापिलेले लिंकन विद्यापीठ तेथे असून त्यात वर्णभेद नाही. येथे इतरही शैक्षणिक संस्था आहेत.                             

लिमये, दि. ह.