मालव: (१) मध्यभारताच्या पश्चिम भागातील एक प्राचीन देश. विद्यमान माळवा प्रदेशाचे प्राचीन नाव. अनेक प्राचीन ग्रंथांतून व पौराणिक कथांतून या देशाविषयीचे उल्लेख आढळतात. इ. स. सातव्या किंवा आठव्या शतकापूर्वी हा प्रदेश ⇨ अवंती या नावाने ओळखले जात होता व त्याची राजधानी अवंती (उज्जैन) होती, असे बौद्ध वाङ्‌मयावरून दिसून येते. भोजराजाच्या काळात (कार. १०००–१०५५) याची राजधानी ‘धारानगरी ’ होती. जुनागढ येथील रूद्रदामनच्या शिलालेखावरून व गौतमीपुत्र सातकर्णीच्या नासिक येथील प्रशस्तीवरून या प्रदेशाला ‘आकरावंती’ असेही नाव असल्याचे दिसून येते. इतर काही संदर्भात गोदावरी नदीच्या उत्तरेस पसरलेल्या या प्रदेशाचे दोन भाग असल्याचे उल्लेख आढळतात. त्यांतील पूर्व मालव हा प्रदेश ‘आकरा’ किंवा ‘दशार्ण’ या नावाने ओळखला जात होता व त्याची राजधानी विदिशा होती. कामसूत्रांतील उल्लेखावरून अवंती व मालव हे दोन्ही प्रदेश वेगवेगळे असून या प्रदेशाचा पूर्वेकडील भाग म्हणजे मालव व पश्चिमेकडील भाग म्हणजे अवंती म्हणजेच उज्जैनचा प्रदेश होय. बाणाच्या कादंबरीमध्येही यास दुजोरा मिळतो [→ माळवा].

(२) ग्रीक इतिहासकारांच्या आणि भारतीय पुराणवस्तूसंशोधन खात्याचा संचालक व पुरातत्त्वज्ञ कनिंगहॅम याच्या मतांनुसार सध्याचा मुलतानचा (पाकिस्तान) प्रदेश म्हणजेच मालव अथवा ⇨ मल्ल देश होय. या प्रदेशातील लोकांना मालव, अथवा मल्ल किंवा मल्ली नावे रूढ असून त्यांच्या नावावरूनच प्रदेशास हे नाव प्राप्त झाले असावे.

चौंडे, मा. ल.