ओरेयाना, फ्रांथीस्को दे : (१५००?—१५४६?). अमेझॉन नदीचा समन्वेषक. स्पेनच्या एस्टिमादुरा भागातील कासेरेस या गावी याचा जन्म झाला असावा. पेरू जिंकणाऱ्या पिझारोचा हा प्रमुख साथीदार होता. या आधीच्या त्याच्या आयुष्याबद्दल माहिती मिळत नाही. पिझारोने १५३८ मध्ये दक्षिण अमेरिकेचा आणखी प्रदेश घेण्याची मोहीम काढली, तेव्हा तो त्याच्याबरोबर होता अमेझॉनची उपनदी नापो हिच्या प्रवाहामधून ओरेयाना काही साथीदारांसह, पिझारोपासून फुटून निघाला व ऑगस्ट १५४१ मध्ये अमेझॉनच्या मुखाशी आला. असंभाव्य वाटणाऱ्या परंतु सफल झालेल्या त्याच्या या अद्‍भुत प्रवासामुळे काहींनी त्या नदीला त्याचे नाव दिले परंतु ओरेयानाने या नदीकाठी तीरकमठे घेऊन लढणाऱ्या स्त्रिया (लांब केस ठेवलेल्या पुरूषांची शक्यता ) पाहून त्याने या नदीला अमेझॉन (लढाऊ स्त्री) असे नाव दिले. १५४४ मध्ये अमेझॉनच्या मुखातून शिरून पुन्हा तो प्रवासास निघाला. या प्रवासात दोन वर्षांनी त्याचा मृत्यू झाला.          

                               

 शाह, र. रू.