समारा : मध्य इराकमधील एक इतिहासप्रसिद्ध नगर. ते बगदादच्या किंचित वायव्येस सु. ९७ किमी. वर टायग्रिस नदीकाठी वसले आहे. त्याची लोकसंख्या २०,००२ (१९८५) होती. प्रागैतिहासिक काळात येथे मानवी वस्ती असल्याचे दाखले मिळतात. अब्बासी खलीफ अल् मुतासिम (कार. ८३३–८४२) याचा तुर्की सेनापती अशनास याने ८३६ मध्ये ते वसविले तथापि त्याचे नाव मुस्लिमपूर्व असून अब्बासींच्या नाण्यांवर सूर्र मनरा असा त्याचा उल्लेख आढळतो. समारा ही अब्बासी खिलाफतीची राजधानी होती (८३६-८९२). पुढे अल् मुतादिद या खलीफाने पुन्हा बगदादला राजधानी नेली (८९२). त्यानंतर हळूहळू या नगराचे वैभव संपुष्टात येऊन तेराव्या शतकात ते जवळजवळ उजाड झाले. अब्बासी खिलाफतीच्या कालावधीत येथे भव्य राजवाडे, मीनार, मशिदी, घरे, उदयाने, कारंजी, बाजारपेठ इ. रूपांनी वास्तुवैभव निर्माण झाले.

जर्मन पुरातत्त्वज्ञ फ्रिड्रिख सार आणि अर्न्स्ट हट्सफेल्ट यांनी समारा येथे विस्तृत उत्खनन केले (१९११–१३). त्यात त्यांना अनेक वास्तू, मीनार व मृत्पात्रे इत्यादींचे अवशेष आढळले. त्यांपैकी टायग्रिस नदीकाठचे जाऊ साक अल्-खाकनी व बलकुवरा हे राजवाडे आणि अबू दुलफची मशीद या काही भव्य व कलात्मक वास्तू आहेत. त्यांतील भित्तिचित्रांतून अर्धनग्न स्त्रिया, क्रिस्ती पाद्री, नृत्यांगना, प्राण्यांबरोबरची सैनिकांची झुंज, खलीफांच्या मेजवान्यांची दृश्ये इ. विषय चित्रित केलेले आहेत. इस्लामपूर्व काळात येथे मानवाकृतींचे चित्रण-शिल्पन होत असल्याचे स्पष्ट होते. अन्य सजावटीत द्राक्षे, द्राक्षवेल, फुले, पाने, भौमितिक रचनाबंध तसेच शिंपले, रंगीत काचतुकडयंची कुट्टिमचित्रे इ. प्रकार आढळतात. मनुष्या-कृतींनी सजविलेली पक्वमृदापात्रे त्यांवरील चकाकी, रंग आणि सुलेखनाचे नमुने यांमुळे वेधक दिसतात. त्यांवरील कलात्मक काष्ठतक्षण इस्लामी कलेचा नमुना होय. मध्ययुगीन इस्लामी वास्तुशैली आणि चित्रशैली,तसेच इस्लामपूर्व व इस्लामकालीन कलाशैलींचा मिलाफ येथे पहावयास मिळतो. शिया मुसलमानांचे हे यात्रास्थळ असून येथील अल्-मल्-विया-नामक मीनारही उल्लेखनीय आहे.

देशपांडे, सु. र.