ल्यूब्ल्याना : (जर्मन लाय्बाख इटालियन लुबियाना). यूगोस्लाव्हियाच्या वायव्य भागातील एक निसर्गरम्य पर्यटनस्थळ व स्लोव्हीनिया प्रांताच्या राजधानीचे शहर. लोकसंख्या १,९७,९६२ (१९८१). प्राचीन रोमन इतिहासात त्याचा ‘इमोन’ असा उल्लेख आढळतो. ते साव्हा नदीच्या ल्यूब्ल्यानित्सा उपनदीकाठी टर्बॉव्हल्येच्या पश्चिमेस ४१ किमी. व झाग्रेवच्या वायव्येस सु. ११२ किमी. वर वसले आहे. त्याच्या सभोवती दिनारिक आल्प्स पर्वतरांगा आहेत. लोहमार्ग, रस्ते व विमानमार्ग यांनी ते अन्य शहरांशी जोडले आहे.

ल्यूब्ल्यानाला प्राचीन ऐतिहासिक परंपरा असून या प्रदेशात इ. स. पू. दुसऱ्या सहस्रकात इलिरियन लोक रहात असल्याचे लेखी उल्लेख मिळतात. इलिरियनांनी स्थापन केलेल्या इमोन या नगराला रोमन सम्राट ऑगस्टस (कार. इ. स. पू. २७-इ. स. १४) याने तटबंदी केली. रोमन साम्राज्याच्या अस्तानंतर इ. स. पाचव्या शतकात रानटी हूण लोकांनी त्यावर आक्रमणे केली (इ. स. ४००-४५१). त्यानंतर स्लाव्ह राजांनी त्याची पुनर्वाघणी केली व त्यास ‘ल्यूव्हिगना’ हे नाव दिले. पुढे इ. स. दहाव्या शतकात ते रानटी मग्यारांनी उद्ध्वस्त केले. बाराव्या शतकात कॉर्निओलच्या सरदारांचा अंमल त्यावर काही वर्षे होता. पुढे बोहीमियाचा दुसरा ऑटकार याने ते जिंकून घेतले (१२७०) आणि नंतर ऑस्ट्रियाच्या हॅप्सबर्ग वंशाच्या आधिपत्याखाली गेले (१२७७). त्यांच्या काळात त्यास काही नागरी हक्क प्राप्त झाले (१३१०). १४६१ मध्ये तेथे रोमन कॅथलिक धर्मगुरूंचे पीठ स्थापन करण्यात आले. फ्रेंच क्रांतिकाळातील  अल्पकाळ (१७९४-१८२५) वगळता  १९१८ पर्यंत ते ऑस्ट्रियाच्या  अंमलाखाली होते. १८२१ मध्ये ऑस्ट्रियाच्या नेतृत्वाखालील लायबाख काँग्रेस येथेच भरली. एकोणिसाव्या शतकात स्लोव्हीनियन राष्ट्रवादाचा प्रसार झाला आणि ऑस्ट्रियन सत्ताधाऱ्यांना अंतर्गत विरोध सहन करावा लागला. पहिल्या महायुद्धानंतर (१९१८) ऑस्ट्रियाची सत्ता संपुष्टात येऊन ल्यूब्ल्याना यूगोस्लाव्हियात समाविष्ट करण्यात आले. पुढे १९४६ मध्ये त्यास स्लोव्हीनियाच्या राजधानीचा दर्जा मिळाला.

येथे ऑस्ट्रियन बरोक शैलीतील मध्ययुगीन किल्ला, प्रासाद चर्चे यांचे वास्तु-अवशेष, असून किल्ला आणि नदी यांदरम्यान प्राचीन नगर वसले आहे. १८९५ च्या भूकंपात येथील अनेक मध्ययुगीन वास्तूंची पडझड झाली. आधुनिक शहरात तिव्हली पार्क, चर्चे, कार्यालयीन इमारती, वस्तुसंग्रहालये, कलावीथी, संगीतिकागृह, ल्यूब्ल्याना विद्यापीठ (स्था. १५९५), राष्ट्रीय नाट्यगृह, शास्त्र, कला, संगीत,  नाट्य, साहित्य वगैरेंच्या स्वतंत्र अकादमी यांच्या आधुनिक इमारती असून स्लोव्हीनियन संस्कृतीचे ते माहेरघर मानण्यात येते. शहरात वस्त्रोद्योग, विद्युत्जनित्रे, पादत्राणे, फर्निचर, आसवन्या, ऊर्ध्वपातन भट्टी, वीटभट्ट्या, रसायन, काच साबण, कागद इ. बनविण्याचे कारखाने असून यंत्रसामग्री निर्मितीचा मोठा उद्योग चालतो. शहराजवळच वैशिष्ट्यपूर्ण खडकरचनेमुळे जगप्रसिद्ध असलेली पोस्टॉइन गुहा हे पर्यटकांचे आकर्षण आहे.

देशपांडे, सु. र.