मातँझास : क्यूबाचे कॅरिबियन समुद्रावरील एक महत्त्वाचे सुरक्षित बंदर व मातँझास प्रांताच्या राजधानीचे ठिकाण. लोकसंख्या १,०१,०७८ (१९८२ अंदाज). हे क्यूबाच्या उत्तर किनाऱ्यावर, हाव्हॅना शहराच्या पूर्वेस सु. ८० किमी. अंतरावर वसले आहे. १६९३ मध्ये त्याची स्थापना झाली. स्पॅनिश-अमेरिकन युद्धकाळात (१८९८) अमेरिकेने शहरावर तोफांचा भडिमार केला होता. साखर, खते, कापड, कृत्रिम रेशीम, दोर, आगकाड्या, मद्ये इ. तयार करणे तसेच तेलशुद्धीकरण व कातडी कमावणे इ. उद्योग शहरात चालतात. साखर-निर्यातीसाठी हे बंदर प्रसिद्ध असून कॉफी, फळे, काकवी, रम यांचीही येथून निर्यात होते. जवळच्या यूमूरी खोऱ्यातील कृषिउत्पादनाच्या बाजारपेठेचे हे मुख्य केंद्र आहे. शहरात लांब व रुंद तसेच फरसबंदी रस्ते, मोठेमोठे चौक, भव्य इमारती, ऐतिहासिक वास्तू व स्मारके असून शहराची रचना योजनाबद्ध केलेली आढळते. सान सेव्हेरीनॉ किल्ला (सतरावे शतक), सान कार्लोस कॅथीड्रल (१७३०) या येथील प्रमुख  ऐतिहासिक वास्तू होत. हाव्हॅनाशी हे मध्यवर्ती महामार्गाने व दोन लोहमार्गांनी जोडलेले आहे. शहराजवळील प्रसिद्ध बेलामार गुहा व निसर्गसुंदर यूमूरी खोरे, ही पर्यटकांची प्रमुख आकर्षणे आहेत. येथील विविध सांस्कृतिक संस्था, सार्वजनिक ग्रंथालय, ‘अनेक विद्वानांचे व कलाकारांचे कार्य इत्यादींमुळे मातँझासला ‘क्यूबाचे अथेन्स’ म्हणून संबोधले जाते.

चौधरी, वसंत