चंडीगढ : पंजाब आणि हरयाणा या राज्यांची राजधानी व केंद्रशासित प्रदेश. लोकसंख्या २,५७,२५१ (१९७१). १९४७ च्या भारताच्या फाळणीने पंजाबची लाहोर ही राजधानी पाकिस्तानात गेल्यामुळे नव्या राजधानीसाठी निसर्गरम्य आणि मध्यवर्ती अशा चंडीगढची निवड करण्यात आली. हे शिवालिक टेकड्यांच्या पायथ्याशी, अंबाल्याच्या उत्तरेस ४८ किमी. व सिमल्याच्या उत्तरेस ११३ किमी. असून पर्यटनकेंद्रही आहे. हे

विधानसभा इमारत, चंडीगढ.लोहमार्ग, रस्ते आणि विमानमार्ग यांनी राज्यातील अन्य मोठ्या शहरांना व दिल्लीला जोडलेले आहे.

पंडित नेहरूंच्या आदेशानुसार ⇨ ल कॉर्ब्यूझ्ये (१८८७–१९६५) या फ्रेंच वास्तुशिल्पज्ञाने चंडीगढची नगररचना केली. आधुनिक काळातील नगररचनेचे भारतातील हे एक उत्कृष्ट उदाहरण होय. नगररचनेमध्ये आकाश, अवकाश, जमीन, वृक्ष या निसर्गसाधनांबरोबरच लोखंड, सिमेंट ह्यांसारखी माध्यमे यांचा औचित्यपूर्ण मिलाफ व विरोधाभास ह्यांचे दर्शन पडते. ह्या नगररचनेत क्रूसासारखे अक्षीय राजरस्ते, प्रत्येक भागाचा स्पष्ट उपयोग दृग्गोचर करणारे नागरी विभाग व वाहनांसाठी व पादचाऱ्यांसाठी खास विभिन्न मार्ग ही वैशिष्ट्ये आढळतात. हमरस्त्यांच्या एका बाजूला शासकीय व दुसऱ्या बाजूला सार्वजनिक वास्तू आहेत. दुतर्फा झाडे लावलेल्या अक्षीय राजरस्त्याच्या एका टोकास उघडी मैदाने, क्रीडांगणे आणि बगीचे असून दुसऱ्या टोकाला बँका, सचिवालये व सरकारी कार्यालये, मोठी अतिथिगृहे इ. वास्तू आहेत. दुसरा अक्षीय राजरस्ता रेल्वे स्थानकापासून निघून पूर्वेकडे दुतर्फा पतपेढ्या, मोठ्या घाऊक बाजारपेठा, गुदामे, कारखाने यांवरून त्याचप्रमाणे पश्चिमेकडे दुतर्फा उच्च शिक्षणसंस्था, करमणुकीच्या वास्तू, मोठ्या मैदानातील रंगमंदिर, नागरी वस्तुसंग्रहालय, क्रीडागृहे यांवरून निघून चंडीगढ विश्वविद्यालयाशी पोहोचतो. दोन्ही हमरस्त्यांच्या मध्यभागी मोठ्या प्रशस्त चौकात मोठी दुकाने, कचेऱ्या, कार्यालये ह्यांचा वास्तुसमुच्चय आहे. पादचाऱ्यांच्या सोईकरिता व्हेनिस शहरातील कालव्याप्रमाणे येथे निरनिराळ्या वसाहतींतून हिरवळीचे पट्टे काढलेले असून ते सर्व भागांत जाळ्यांप्रमाणे पसरले आहेत. चौकोनी पटाप्रमाणे दिसणाऱ्या रस्त्यांना व वसाहतींना निरनिराळी नावे असून विविध झाडांचा खुणेसाठी सांकेतिक वापर केला आहे.

नगररचनेप्रमाणेच चंडीगढमधील शासकीय, न्यायालयीन व इतर वास्तूही प्रभावी व वैशिष्ट्यपूर्ण आहेत. या वास्तुशिल्पांच्या कामावर प्रभावळकर, चौधरी, माथूर, पिलू मोदी, शर्मा, लंबा वगैरे भारतीय व प्येअर झान्रे, जेन ड्रू, मॅक्सवेल फ्राय ह्या पाश्चात्त्य वास्तुशिल्पज्ञांनी साहाय्य केले.

येथे पंजाब विद्यापीठाची स्थापना केलेली असून अनेक महाविद्यालये, तंत्रशाळा, अभियांत्रिकी महाविद्यालय, सूतकताई प्रशिक्षण महाविद्यालय इ. आहेत. तसेच सिमेंट, कृत्रिम रेशीम, सुती कापड, टंकयंत्रे, तेल, आटा इत्यादींचे कारखाने व गिरण्या आहेत. चंडीगढजवळच चंडीदेवीचे प्राचीन मंदिर असल्यामुळे बहुधा यास हे नाव पडले असावे.

संदर्भ : Evenson, Norma, Chandigarh, California, 1966.

कान्हेरे, गो. कृ. कापडी, सुलभा