अरवली पर्वत: हा दिल्लीपासून गुजरातेपर्यंत ईशान्यनैर्ऋत्य दिशेने जाणाऱ्‍या रांगांचा बनलेला आहे. लांबी सु. ६०० किमी. सर्वांत उंच शिखर, गुरुशिखर, (उंची १,७२२ मी.) अबूच्या पहाडात आहे. हिमालय व निलगिरी यांच्या मधल्या प्रदेशातील ते सर्वांत उंच शिखर आहे. अरवलीची उंची सामान्यतः ७६० ते १,०६० मी. इतकी भरते पण जोधपूर व जयपूर यांच्यामधल्या रांगांची उंची ४५७ मी. पेक्षा कमी आहे. अरवलीचा अजमीरपासून अबूच्या पहाडापर्यंतचा भाग सर्वांत जाड व रुंद असून त्या भागातल्या रांगा ठळक व सलग आहेत. अरवलीच्या पश्चिमेस थरचे वाळवंट आहे व नैर्ऋत्य वाऱ्‍यांबरोबर जाणारी त्याची वाळू साचून अजमीरच्या ईशान्येस असलेल्या रांगांचा पुष्कळसा भाग झाकला गेला आहे. रांगांचे सखल भाग वाळूखाली पुरले गेले असून त्यांचे उंच भाग तेवढे उघडे राहिले आहेत. त्यांच्याही पलीकडे अधिक पुढे नैर्ऋत्येकडे गेलेल्या रांगा सिंधु-गंगा यांच्या जलोढ गाळांनी तशाच झाकल्या गेल्या आहेत. त्यामुळे या वाळवंटी वाळूने किंवा जलोढाने झाकल्या गेलेल्या भागात सलग रांगा न दिसता वाळूच्या बाहेर डोकावणाऱ्‍या तुटकतुटक रांगा किंवा त्यांची उंच शिखरे मात्र दिसतात. दिल्लीजवळ रिज नावाने प्रख्यात असलेल्या भागात क्वॉर्ट्‌झाइट खडकाचे जे लहान व तुटक वरंबे दिसतात ते अरवलीच्या ईशान्य टोकाचे आहेत. अबूच्या नैर्ऋत्येस असलेल्या भागांकडे जाऊ लागले म्हणजे तेथल्या रांगा अधिक लहान व विरळ होत गेलेल्या आढळतात. अखेरीस सिरोहीच्या नैर्ऋत्य भागात त्यांचा शेवट होतो. आजच्या अरवलीचे उत्तरेकडील टोक दिल्लीजवळ व दक्षिणेकडील टोक गुजरातेत आहे. पण पूर्वी तो ईशान्य व नै‍‌र्ऋ‍त्य अशा दोन्ही दिशांस, बराच दूरवर, उत्तर प्रदेशातल्या हिमालयातील गढवालापर्यंत पसरला असावा असे दिसते. अरवलीच्या रांगांचे, लहानसहान उंचवट्यांच्या स्वरुपात असणारे, काही अवशिष्ट भाग सौराष्ट्रात (काठेवाडात) व कच्छात आढळतात. त्यावरुन अरवलीच्या रांगा तेथपर्यंत गेल्या असल्याच पाहिजेत. एवढेच नव्हे तर त्याच्याही पुढे त्या गेल्या असाव्यात. या दक्षिणेकडील विस्ताराला फाटे फुटले असावेत व त्यांपैकी एक फाटा लक्षद्वीप बेटात व दुसरा पूर्वेस वळून कर्नाटकात व आंध्रात गेला असावा, असे अनुमान केले गेले आहे.

 

अरवली हा अतिप्राचीन, कँब्रियन-पूर्व कालात, निर्माण झालेला आहे. असे म्हणतात की, ज्यांचे प्राकृतिक स्वरूप आजही स्पष्ट दिसून येते अशा पृथ्वीवरील पर्वत-संहतींपैकी अरवलीची संहती सर्वांत जुनी आहे. प्रथम उत्थापन झाले तेव्हा, म्हणजे पुराजीव कल्पाचा प्रारंभ होण्याच्या सुमारास, अरवलीची उंची व राशी या हिमालयासारख्या असाव्यात. तेव्हापासून झीज होत राहिल्यामुळे मूळच्या प्रचंड राशीचे बुटके व लहानसे खुंट मात्र आजच्या अरवलीच्या रूपात शिल्लक राहिले आहेत.

 

अरवलीचे प्राकृतिक स्वरूप भारताच्या द्वीपकल्पातल्या इतर पर्वतांहून अगदी भिन्न आहे. आर्कीयन कालातील अरवली संघ व पुराणकल्पाच्या पूर्वार्धातील दिल्ली-संघ यांच्या थरांस घड्या पडून व ते थर विक्षोभित होऊन अरवलीच्या रांगा तयार झालेल्या आहेत [⟶ अरवली संघ]. अरवली हा सांरचनिक पर्वतांचे उत्कृष्ट उदाहरण आहे.

क्रिटेशस युगाच्या आधी केव्हातरी–हा काल निश्चित ठरविता आलेला नाही–अरवलीचे क्षरण होऊन जवळजवळ सपाट जमीन तयार झाली होती. नंतर ती जमीन कमानीप्रमाणे वाकविली जाऊन किंचित उंच केली गेली, नंतर तिचे क्षरण होऊन आजचा अरवली तयार झाला. द्वीपकल्पाच्या व एकूण भारताच्या भौगोलिक इतिहासात अरवलीचे स्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. अरवलीत उगम पावून द्वीपकल्पात दूरवर जाणाऱ्‍या हिमनद्या पुराजीवकल्पाच्या जवळजवळ अखेरच्या कालात होत्या. कित्येक मोठ्या नद्याही पूर्वीच्या कालात तेथे असल्या पाहिजेत. पूर्वीच्या युगात अरवली हा एक महत्त्वाच्या जलविभाजक असला पाहिजे व आजचा अरवली त्याचा केवळ अवशिष्ट भाग आहे. आता त्याच्यामुळे गंगा व सिंघू या नदीसंहतींच्या जलोत्सरणाचे विभाजन होऊन एकीचे पाणी बंगालच्या उपसागरास व दुसरीचे अरबी समुद्रास मिळत आहे.

 

खडक व खनिजे: अरवलीमध्ये क्वॉर्ट्‌झाइट, पाटीचे दगड, शिस्ट, नाइस, संगमरवर व काही ग्रॅनाइटी खडक सापडतात. त्यांपैकी काहींचा साध्या व कलाकुसरीच्या बांधकामाकरिता उपयोग होतो. काही रत्‍न (पाच, क्रिसोबेरील), अभ्रक, जस्ताचे व शिशाचे धातुपाषाण इ. उपयुक्त खनिजे अरवलीत सापडतात.

 

ठाकूर, अ. ना.

 

अरवली प्रदेशाचे हवामान रूक्ष, वाळवंटी आहे. पाऊस २५ ते ६५ सेंमी. पडतो. जमिनीखाली ७५ ते १५० मी. खोलीवर पाणी आढळते. लुनी, मही, साबरमती, बनास या नद्या येथे उगम पावतात. अकेशिया जातीची काटेरी झाडे व गवत या मुख्य वनस्पती आहेत. लोकवस्ती विरळ व लहानलहान खेड्यांतून विखुरलेली आहे. दऱ्‍याखोऱ्‍यांतून गहू, बाजरी, कडधान्ये यांची शेती होते. उदयपूरच्या दक्षिणेस नागर भागात भिल्ल लोक फिरती शेती करतात. गुरेढोरे व शेळ्यामेंढ्या पाळणे हा प्रमुख व्यवसाय आहे. अवर्षणकाळात भटक्या जमातीचे लोक कळप घेऊन काठेवाडपासून पंजाबपर्यंत चारापाण्याच्या शोधार्थ जातात. दक्षिण भागापेक्षा उत्तर भागात सर्व प्रकारची वाहतूक सुलभ आहे. पश्चिमेकडे उंट अधिक उपयोगी आहे. जयपूर-जोधपूरजवळच्या सखल भागात तळी आहेत. सांभर सरोवरापासून उत्तर भारताला मिठाचा महत्त्वाचा पुरवठा होतो. ते उन्हाळ्यात आटते व पुराच्या वेळी २३० चौ. किमी. विस्तारते.

 

मोगलांना टक्कर देताना राजपुतांना या डोंगराळ प्रदेशाचा चांगला आसरा मिळाला. राजपूत संस्कृतीची वैशिष्ट्ये तेथे आढळतात. राजांच्या आश्रयाने कलाकुसरीचे व्यवसाय वाढले होते. जयपूर, जोधपूर, उदयपूर, अजमीर ही येथील प्रमुख शहरे होत.

 

कुमठेकर, ज. ब.