बेर्खहाउस, हाइन्रिख : (३ मे १७९७ – १७ फेब्रुवारी १८८४).जर्मन भुगोल तज्ञ व जगप्रसिद्ध प्राकृतिक नकाशासंग्रहाचा निर्माता. जन्म क्लीव्ह्झ येथे १८१६ मध्ये प्रशियन युद्धमंडळाच्या त्रिकोणमितीय भूमापन प्रकल्पात त्याची नेमणूक झाली. बर्लिन येथील वाउअकादमीत उपयोजित भुमिती, नकाशा आरेखन व यंत्रनिर्मिती या विषयांच्या अध्यापनाचे काम केले (१८२१ – ५५). १८३६ मध्ये पॉट्सडॅमला जाऊन तेथे १८३९ मध्ये त्याने भूगोल व नकाशाशास्त्र विद्यालय सुरू केले. ते १८४८ पर्यंत चालले. आपला पुतण्या हेरमान (१८२८-९०) व मुलाप्रमाणे सांभाळलेले ऑगस्ट पेटरमान व हेन्री लांगे हे त्याचे प्रमुख विद्यार्थी होत.

अलेक्झांडर व्हॉन हंबोल्टच्या प्रेरणेने तयार केलेला फिझिकालिशर ॲटलास (प्राकृतिक नकाशा संग्रह) हे त्याचे नकाशाविषयक सर्वात महत्त्वाचे कार्य होय. त्याची इंग्रजी आवृत्ती हेन्री लांगेच्या सहकार्याने ॲलेक्स कीथ जॉन्स्टन याने काढली (१८४८). सहा खंडातील Allgemeine Lander and Volkerkunde (१८३७-४४) पाच भागातील Grundriss der Geographie (१८४०-४३) Die Volker des Erdballs… (१८४७) Briefwechsel mit Alexander von Humboldt, १८२५-५८ (१८६३) हे त्याचे प्रमुख लेखनकार्य आहे. त्याने हिंदुस्तानातील शाळांसाठी भूगोलाचे क्रमिक पुस्तक लिहिले. तथापि या पुस्कताच्या प्रकाशनाविषयी निश्चित माहिती नाही. श्टेटीन येथे त्याचे निधन झाले.

चौधरी, वसंत