डेव्हिस, जॉन : (सु. १५५०–२९ डिसेंबर ? १६०५). ब्रिटिश दर्यावर्दी व समन्वेषक. इंग्लंडमध्ये सँड्‌रीज येथे जन्म. कॅनडाच्या उत्तर ध्रुव प्रदेशातून पॅसिफिक महासागराकडे जाणाऱ्या वायव्य मार्गाचा शोध लावण्यासाठी १५८५ मध्ये तो पहिल्या मोहिमेवर निघाला. ग्रीनलंडच्या बर्फाळ पूर्व किनाऱ्यावर आल्यानंतर तो दक्षिणेस वळला व फेअरवेल भूशिराला वळसा घालून ग्रीनलंडच्या पश्चिम किनाऱ्याने उत्तरेस बॅफिन बेटाजवळील कंबर्लंड साऊंड आखातापर्यंत गेला पण तेथून अनपेक्षित प्रतिकूल हवामानामुळे त्याला परतावे लागले. १५८६–८७ मध्ये वायव्य मार्ग शोधण्याचा पुन्हा प्रयत्न केला. या सफरीत स्वतःचे नाव दिलेल्या डेव्हिस सामुद्रधुनीमार्गे जाऊन त्याने बॅफिन उपसागरात प्रवेश केला व ग्रीनलंडच्या पश्चिम किनाऱ्यामार्गे सु. ७३° उत्तरेस डिस्को बेटापर्यंत प्रवास केला.

स्पॅनिश आर्माडाबरोबर झालेल्या युद्धात ‘ब्लॅक डॉग’ या लढाऊ जहाजाचे नेतृत्व त्याने केले असावे असे म्हणतात. त्याने टॉमस कॅव्हेंडिशबरोबर मॅगेलन सामुद्रधुनीकडे केलेल्या सफरीत त्याला फॉकलंड बेटाचा शोध लागला (१५९२), तथापि हा मान काहीजण आमेरीगो व्हेसपूची या इटलीच्या समन्वेषकास देतात. डेव्हिसने स्पॅनिश आणि पोर्तुगीजांविरुद्ध झालेल्या अनेक चकमकींत भाग घेतला. तसेच १५९६–९७ मध्ये सर वॉल्टर रॅलीबरोबर कादिझ व अझोर्सपर्यंत सफरी केल्या. १५९८ व १६०१ मधील ईस्ट इंडीज मोहिमेतही पुढील दोन वर्षे तो ईस्ट इंडीया कंपनीच्या सेवेत सफरीवर होता. १६०४ मध्ये तो पुन्हा ईस्ट इंडीजच्या मोहिमेवर निघाला. या मोहिमेत सिंगापूरजवळ बिंटांग बेटाजवळ जपानी चाच्यांकडून तो मारला गेला.

अक्षांशदर्शक यंत्र (डेव्हिस क्वाड्रंट) डेव्हिसने शोधून काढले, या यंत्राचा वापर पुढे जवळजवळ शतकभर रूढ होता. द सीमेन्स सीक्रेट (१५९४) हा नौकानयनावरील प्रबंध व द वर्ल्ड्‌स हायड्रोग्राफिकल डिस्क्रिप्शन  (१५९५) हा वायव्य मार्गासंबंधीचा ग्रंथ हे त्याचे उल्लेखनीय लेखन होय.

संदर्भ : 1. Markham, A. Ed. The Voyages and Works of John Davis, 2 Vols., London, 1880.

    2. Markham, C. A Life of John Davis, London, 1889.

कांबळे, य. रा.