रोड्रीगेस : मॉरिशसच्या आधिपत्याखालील पश्चिम हिंदी महासागरातील बेट. हे मॉरिशसच्या पूर्व ईशान्येस सु. ५६० किमी. अंतरावर प्रवाळरांगांनी वेढलेले ज्वालामुखीय बेट आहे. १९४०’ द. आणि ६३२५’ पू. यांवर विस्तारलेल्या या बेटाची कमाल रुंदी ६ किमी. व लांबी १६ किमी. असून क्षेत्रफळ सु. १०४ चौ. किमी. आहे.लोकसंख्या ३३,०८२ (१९८३). पोर्ट मॅथुरिन (१८,३३५) हे बेटावरील प्रशासनाचे ठिकाण व प्रमुख बंदर तसेच व्यापारकेंद्र आहे.

भूरचनेच्या दृष्टीने सामान्यपणे बेटाचा मध्यभाग उंच डोंगराळ असून मौंट लिमॉन (३९६ मी.) हे सर्वांत उंच शिखर आहे. यांशिवाय ग्रँड मौंटन (३४७ मी.), मौंट पपाई (२८३ मी.) ही अन्य शिखरे आहेत. बेटावर लहानलहान प्रवाह आढळतात. येथील हवामान उष्ण व आर्द्र असून अधूनमधून चक्री वादळे होतात. या बेटावरील प्राणिजीवन वैशिष्ट्यपूर्ण असून विशेषतः मोठी फलभक्षी वटवाघळेमहाकाय भूकासवे प्रसिद्ध आहेत. आज कासवे नामशेष होत चालली आहेत. मानवी वस्तीनंतर येथे इतर ठिकाणांहून आणलेली हरणे, शेळ्या, गुरे, ससे, गिनी फाउल, डुकरे इ. प्राणी दिसतात तसेच सु. १३ जातींचे पक्षीही आढळतात. शेती व मासेमारी हे येथील प्रमुख व्यवसाय असून खारवलेले मासे मॉरिशसला निर्यात केले जातात. अन्नधान्ये, रताळी, रताळी, मॅनिऑक, तंबाखू, फळे ही येथील प्रमुख शेतीउत्पादने आहेत. बेटावर पक्के रस्ते नाहीत पाऊलवाटा व कच्चे मार्ग असून मुख्य वाहतूक होड्यांच्या साहाय्याने किनाऱ्याने होते. हे बेट द. आफ्रिका व ऑस्ट्रेलिया यांदरम्यानच्या केबल मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण आहे. येथील कारभार मॉरिशस सरकारने नेमलेल्या न्यायदंडाधिकाऱ्यामार्फत चालतो. एक नागरी आयुक्त व त्याला मदत करणारे स्थानिक १७ जणांचे सल्लागार मंडळ कारभार पहाते. पोर्ट मॅथुरिन ह्या बंदरातून जहाजाने मॉरिशसशी नियमित वाहतूक चालते. त्याशिवाय बेटावर ला फेर्‌मे, पोर्ट साउथ ईस्ट इ. गावे आहेत. बेटावर टपाल व तारसेवा उपलब्ध आहे. फ्रेचांनी ऊसशेतीसाठी गुलामांना येथे आणले व आज त्यांचे तसेच चिनी- भारतीय-मॉरिशिअन यांचे वंशज या बेटावर रहातात. बेटावर प्राथमिक व माध्यमिक शाळा तसेच तीन छोटी रुग्णालये आहेत. विशेष म्हणजे मॉरिशसमध्ये असणारे अनेक स्थानिक आजार आणि मलेरिया या बेटावर नाही.

हे निर्मनुष्य बेट १५०७ मध्ये पोर्तुगीजांना दिसले परंतु येथे वसाहत करण्याचा प्रयत्‍न मात्र डच व फ्रेंच लोकांनी केला. मॉरिशसमधील फ्रेंचांनी येथे अठराव्या शतकात प्रथम यशस्वी वसाहत करून बाहेरून आणलेल्या गुलाम मजुरांच्या साहाय्याने ऊसमळे लावण्याचा  प्रयत्‍न केला परंतु जमिनीची धूप मोठ्या प्रमाणात झाल्याने ती नापीक बनली व ऊसशेती बंद पडली. नेपोलियनचा पराभव झाल्यानंतर ब्रिटिशांनी हे बेट १८१० मध्ये ताब्यात घेतले. याचे जुने नाव ‘द्येगो रूयीस आयलंड’ असे होते. १९६८ नंतर हे मॉरिशसच्याच ताब्यात राहिले.

डिसूझा, आ. रे. चौंडे, मा. ल.