सप्तसिंधु : उत्तर हिंदुस्थानातील सात नदयांच्या खोऱ्यांचा प्रदेश. हिंदुस्थान हा वैदिक आर्यांचा देश होय, असे अनेक आधुनिक भारतीय विद्वान मानतात. त्यांच्या मते ऋग्वेद हे सर्वांत प्राचीन इंडो-यूरोपियन साहित्य असून त्यातील प्रादेशिक निर्देशांत भूप्रदेशांनाच लागू पडतील अशी वर्णने आढळतात. ऋग्वेदा च्या पहिल्या आणि आठव्या मंडलात अनुक्रमे सात नदया व सात नदयांचा प्रदेश या अर्थाने सप्तसिंधू हा शब्द आला आहे (ऋग्वेद १·३२·१२ व १·३५·८). या सातही नदया समुद्राला मिळणाऱ्या आहेत. बहुतेक विद्वानांच्या मते सप्तसिंधू प्रदेश म्हणजे पंजाब व त्याच्या आसपासचा प्रदेश असून वितस्ता (झेलम ), असिक्नी ( चिनाब ), परूष्णी ( रावी ), विपाशा ( बिआस ), शुतुद्री ( सतलज ), सिंधू व सरस्वती या त्या सात नदया होत. या प्रमुख नदयांच्या प्रवाहामुळे त्या प्रदेशाला सप्तसिंधू हे नाव पडले तथापि या प्रमुख नदयांव्यतिरिक्त या प्रदेशातून दृशद्वती, तृष्टामा, रसा, श्वेती, कुभा, गोमती, कुमू , मेहत्नू आदी छोटया नदया वाहतात व त्या वरील सात मोठया नदयांना मिळतात. प्रत्यक्ष समुद्राला त्यांपैकी एकही नदी मिळत नाही. या प्रदेशाच्या पश्चिमेला खैबर घाट, पूर्वेला यमुना, उत्तरेला हिमाचल प्रदेश व दक्षिणेला राजस्थानचे वाळवंट अशा प्रादेशिक सीमा होत्या. या सीमित प्रदेशात आर्यांनी वसती केली. त्या सुमारास ऋग्वेदां तर्गत उल्लेखानुसार बिआस व रावी या दोन नदयांमधील डोंगराळ मुलुखात किरातांचे राज्य होते आणि मैदानी प्रदेशात आर्य दिवोदासाचे राज्य होते.

सप्तसिंधू प्रदेशाच्या व्याप्तीविषयी विद्वानांत मतैक्य नाही. भूगोलज्ञ आणि भूवैज्ञानिक यांच्या मते प्रागैतिहासिक काळात हिंदुस्थानच्या भौगोलिक रचनेत आमूलाग्र बदल झाले. सप्तसिंधू प्रदेश पूर्वी दक्षिणेस समुद्राने वेढलेला होता. तेव्हा तेथील हवामान समशीतोष्ण होते, परंतु नंतर ते तसे राहिले नाही. सप्तसिंधू प्रदेशाच्या उत्तरेला हिमालय होता. प्रदेशाच्या दक्षिणेकडील समुद्र कालांतराने कोरडा पडून तेथे राजस्थानचे वाळवंट झाले असावे.

देशपांडे, सु. र.