कॅनझस : अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांपैकी पश्चिम-उत्तर-मध्य विभागाच्या व देशाच्या  महाद्वीपीय भूमीवरील मध्यावरचे राज्य. ३७ उ. ते ४० उ. आणि ९४ ३८’ प. ते १०२ १’ प. क्षेत्रफळ २,१३,८८६ चौ. किमी. लोकसंख्या २२,४९,०७१ (१९७०). याच्या दक्षिणेस ओक्लाहोमा, पश्चिमेस कोलोरॅडो, उत्तरेस नेब्रॅस्का आणि ईशान्येस व पूर्वेस मिसूरी ही राज्ये आहेत. टोपीका ही  राज्याची राजधानी आहे.

भूवर्णन : वायव्येस समुद्रसपाटीपासून १,२४० मी. उंचीकडून आग्‍नेयीस २१७ मी. उंची पर्यंत उतरत आलेल्या या राज्यप्रदेशाचे पूर्व, मध्य व पश्चिम असे तीन विभाग पडतात. पूर्व भागातील भूमी ऊर्मिल, सुपीक, चराईला व विविध पिकांना उपयोगी असून, तिच्यामधून डोकावणाऱ्या चुनखडीच्या टेकड्यांतून ‘ब्‍लू स्टेम’  गवत उगवते. मध्य भागात ‘ग्रेटबेंड प्रेअरी’ हे गवताळ मैदान व त्याच्या दक्षिणेस ‘सिमॅरॉन ब्रेक्स’ ही लाल खडकांची त्रुटित रांग आहे. पश्चिमेकडच्या तृतीयांश विभागावर ‘हाय प्लेन्स’ हे उंच, सपाट, वृक्षहीन मैदान पश्चिमेकडे उंचावत गेलेले आहे. येथील मृदांमध्ये पूर्वेस कुजलेल्या तृणांनी मिश्रित स्थानिक खडकांची माती, मध्य भागात रेती खडकांची व थरांच्या खडकांची माती व पश्चिम भागात मोठ्या मैदानाची पिंगट रेती खडक माती आढळते. मैदानांच्या  बऱ्याच भागावर वाऱ्याने वाहून आणलेल्या मातीचे थर असून मध्य व पश्चिम विभागातील जमीन  गव्हाच्या पिकाला योग्य आहे. पेट्रोलियम, नैसर्गिक ज्वलनवायू, कोळशाचे मोठे साठे, भूमिगत  मिठाचा जगातील एक मोठा संचय, जिप्सम, चुनखडीचा व खडीचा दगड, हिलियम वायू, अल्प   प्रमाणात शिसे व जस्त ही येथील खनिजसंपत्ती होय. उत्तरेकडील कॅनझस नदी अनेक उपनद्यांसह   ईशान्य सीमेवरच्या मिसूरीला मिळते. आर्‌कॅन्सॉ नदी पूर्वेकडील राज्यातून येऊन मध्य भागा मधून  दक्षिणेकडे सीमापार होते. राज्यात नैसर्गिक सरोवरे नाहीत, पण शेतीच्या पाटांसाठी व  पूरनियंत्रणासाठी बांधलेले कित्येक जलाशय विहारासाठीही उपयुक्त ठरतात. राज्याच्या दक्षिण  भागात खळग्यातून साचणाऱ्या पाण्याची कित्येक खोल कुंडे आढळतात. येथील हवामान महाद्वीपीय  असून उन्हाळा कडक व हिवाळा सुसह्य असतो. पश्चिमेत पाऊस कमी पडतो. जोराचे वारे व धुळीची वादळे त्याचप्रमाणे वारंवार होणाऱ्या चक्री तुफानांमुळे (टॉर्नेडो) कॅनझस ‘तुफान क्षेत्र’ म्हणून प्रसिद्ध असून राज्यात पूर आणि दुष्काळाचे तडाखेही वारंवार बसतात. तपमान किमान ० से., कमाल २७ से. व सरासरी १४ से. असून वार्षिक सरासरी पर्जन्य ७७ सेंमी. पडतो. राज्यातील वनाच्छादित भूमी फक्त २⋅३% असून येथील वृक्षजाती ओक, हिकरी, एल्म, ॲश इ. आहेत. ब्‍लूस्टेम, ग्रामास, बफालो इ. प्रकारचे गवताळ प्रदेश राज्यात आहेत. राज्य उत्तरेच्या, व दक्षिणेच्या वनस्पतीचा संक्रमण प्रदेश असल्याने दोन्ही दिशांची झाडेझुडपे येथे आढळतात. मोठ्या प्राण्यांपैकी ‘बायसन’ अथवा गवा तेवढा थोड्या संरक्षित प्रदेशात शिल्लक असून बाकी समशीतोष्ण कटिबंधातील लहान पशू, पक्षी, मासे इ. येथे आढळतात.

इतिहासवराज्यव्यवस्था : राज्यातल्या सालाइना गावाजवळ उकरलेल्या खड्ड्यातील एका  इतिहासपूर्वकालीन सामूहिक समाधीत सु. २ मी. उंचीच्या पुरुषांचे १४० हून जास्त सांगाडे सापडले, त्यावरून गोऱ्यांच्या आगमनापूर्वी शेकडो वर्षे येथे आदिवासी नांदत होते, असा पुरावा मिळतो. गव्यांची शिकार करणारे व आपापसांत लढणारे त्यांचेच वंशज १५४१ साली कोरोनादोच्या नेतृत्वाखाली सोन्याच्या शोधार्थ प्रथम इकडे आलेल्या स्पॅनिश लोकांना आढळले. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात केसाळ चामड्यांसाठी फ्रेंच व्यापाऱ्यांनी या भागाची बरीच पाहणी केली. १६८२मध्ये फ्रान्सने या मुलखावर हक्क सांगितला. १७२२ साली फ्रेंचांनी बांधलेला किल्ला फोर्ट ऑर्लिआन्सतीनच वर्षांनी कॅनझस जमातीच्या इंडियनांनी जाळून टाकला. १७६२ मध्ये मिसिसिपीच्या पश्चिमेचा सर्व प्रदेश स्पेनकडे गेला, पण १८०१ साली फ्रेंचांनी तो परत मिळवला. १८०३ मध्ये ‘लुइझिॲना खरेदी’नंतर याची मालकी अमेरिकेकडे आली. प्रदेशाची जास्त पाहणी ल्यूइज व क्लार्क यांनी १८०४ मध्ये व पाइक याने १८०७ साली केली. त्यानंतर केसाळ चामड्यांचे व्यापारी, ख्रिस्ती धर्मप्रसारक व  शास्त्रीय संशोधनाच्या सफरीवर बरेच लोक इकडे आले होते. इंडियनांशी तह करून काही जमिनी घेण्यात आल्या व केंद्र शासनाने पश्चिमेकडे जाणारे मार्ग आखण्यास तज्ञ पाठवले. १८३० नंतर पूर्व कॅनझस मधल्या इंडियनांना राखीव प्रदेशात वसवण्यात आले व आणखी धर्मप्रसारकेंद्रे स्थापन झाली. इलिनॉय व मिसूरी राज्यांतून मॉर्मन लोक मोठ्या संख्येने पश्चिमेकडे जाऊ लागले. त्याबरोबरच सोन्यासाठी कॅलिफोर्नियाकडे हजारो खाणकरी, वसाहतकार व व्यापारी लोटले. ते सर्व कँनझसच्या भूमीवरून पार झाले. तथापि १८५४ च्या अगोदर या प्रदेशात वसणारे थोडेच होते. त्यावर्षी ‘मिसूरी-तडजोड’ रद्द होऊन कॅनझस-नेब्रॅस्का कायद्याने कॅनझस वेगळा प्रदेश झाला आणि गुलामगिरी चालू ठेवावी की नाही हे नागरिकांच्या सार्वमतावर सोपवण्यात आले. त्यावेळी पूर्वेकडचा आणखी मुलूख इंडियनांकडून नव्या तहाने मिळवण्यात आला. तेव्हा मिसूरीतील गुलामगिरीला अनुकूल असे ‘जमीन-बळकाव्ये’ कॅनझसमध्ये घुसले आणि त्याबरोबरच गुलामी विरोधी वसाहतकार उत्तरेकडून व पूर्वेकडून आले. त्या दोन विरोधी पक्षांत १८५० ते १८६० पर्यंत खूप हिंसक झगडे झाले. त्यामुळे या प्रदेशाचा उल्लेख ‘रक्तबंबाळ कॅनझस’ असा होऊ लागला. अखेर गुलामी विरोधी पक्ष विजयी झाला आणि १८६१ मध्ये कॅनझसला राज्य म्हणून संघराष्ट्रात प्रवेश मिळाला. यादवी युद्धात उत्तरेच्या  सरकारपक्षाला राज्याने मदत केली. त्या युद्धानंतर गुर चराईची नवी गावे वसली, लोहमार्ग आले पण  पाण्याच्या अभावामुळे व थंडीमुळे शेतीपिके बुडणारसे दिसू लागले. तेवढ्यात स्थलांतरित मेनॉनाइट  रशियनांना ‘लालटर्की’ जातीच्या गव्हाला राज्याची जमीन योग्य असल्याचे दिसले शिवाय मका, बीट अशी पिके व गुरांची जोपासनाही फायदेशीर होऊ लागली. हक्क संरक्षणार्थ शेतकऱ्यांनी संस्था स्थापल्या. पहिल्या महायुद्धा आधीच या राज्यात स्त्रियांना मताधिकार मिळाला होता. या युद्धात कॅनझसने ८१,६५० लोक पुरवले. दुसऱ्या महायुद्धात २,०८,७७१ लोक पाठवून शिवाय धान्य व मांसपदार्थांचाही भरपूर पुरवठा केला. युद्धोत्तर काळात परंपरेने कृषिप्रधान राज्य असून हीकॅनझस मध्ये कारखानदारीची विशेषतः विचिटॉ भोवती विमाने बनवण्याच्या उद्योगाची विशेष वाढ झाली.

आर्थिक व सामाजिक जीवन : कृषी व्यवसायांत १३% लोक असून गहू उत्पादन देशात पहिल्या  क्रमांकाचे आहे. शिवाय ज्वारी, मका, सोयाबीन, बार्ली, घासचारा ही महत्त्वाची पिके येथे होतात. मांसासाठी पोसलेली गुरे, डुकरे, दूधदुभते व अंडी मिळून शेतीइतकेच उत्पन्न राज्यात निघते. कारखानदारीत १७% लोक असून विमाने, धान्य व मांस डबाबंद करणे, रसायने, पेट्रोलियम व कोळशापासून होणारे पदार्थ, दगड, शाडू व काचसामान या मालाचे कारखाने राज्यात आहेत. बांधकामात सहा टक्के लोक व तेल, वाळू, सिमेंट व दगड यांच्या खाणकामात दोन टक्के लोक आहेत. राज्याच्या दक्षिण भागात १८९४ पासून खनिज तेल व वायू मिळाला असून डेक्स्टर येथे १९०३ मध्ये देशातील पहिला हेलियम वायूचा साठी मिळाला. १९७१ मध्ये राज्यात लोहमार्ग १२,४४६ किमी. व रस्ते २,१४,६९१ किमी. (पैकी ६१% पक्के) होते. मिसूरी नदीवर जलवाहतूक चालते. ८३ नभोवाणी व १४ दूरचित्रवाणी केंद्रे असून सु. १३⋅४७ लाख दूरध्वनियंत्रे, ५० दैनिके व २६१ इतर  नियतकालिके आहेत. लोकवस्ती ६६⋅१ टक्के शहरी असून गौरेतर सु. ५⋅५ टक्के आहेत. विचिटॉ हे सर्वांत मोठे शहर असून तेथे तेलशुद्धी, मांस डबाबंद करण्याचे कारखाने व पीठ चक्क्या आहेत. याशिवाय हे खाजगी विमानांचे जगातील सर्वांत मोठे निर्मितीकेंद्र समजले जाते. कॅनझसला सिटीमध्ये मांस डबाबंद करण्याचे कारखाने आणि धान्यकोठारे आहेत. टोपीका ही राजधानी असून जगप्रसिद्ध ‘मेनिंजर मानसोपचार’ विज्ञान केंद्रासाठी प्रसिद्ध आहे. राज्यात सात विद्यापीठे व ४८महाविद्यालये आहेत. धर्म, पंथ, रूढी, समाजजीवन, भाषा, कला व क्रीडा या बाबतींत कॅनझसचे अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांतील इतर राज्यांशी बव्हंशी साधर्म्य आहे. राज्यात भूवैज्ञानिकसृष्टिचमत्कारांची कित्येक दृश्ये असल्याने बरेच प्रवासी या राज्यात येतात. कॅसल रॉक, मॉन्युमेंटरॉक असे विविध रंगांचे खडक राज्यात असून रॉक सिटी येथे दोनशेच्या वर विचित्र आकारांच्या  खडकांचा समूह, अतिप्राचीन जीवाश्म, चुनखडीच्या डोंगरांतून अनेक विविध आकार व विवरे आहेत.

ओक, शा. नि.