हेकाटीस, मायलीटसचा : (इ. स. पू. सहावे शतक ते इ. स. पू. पाचवे शतक) . ग्रीक इतिहासकार, भूगोलज्ञ, जगाच्या नकाशाचा संकल्पचित्रकार, प्रवासी व कालगणनेवरील पुस्तकाचा लेखक. याचा जन्म आशिया मायनरमधील (सध्याचे तुर्कस्तान) प्रसिद्ध ग्रीक संस्कृतीच्या आयोनीय प्रदेशातील बारा आयोनीय शहरांपैकी मायलीटस या प्रसिद्ध समृद्ध शहरी (स्वतंत्र नगरराज्यात) झाला असे मानतात. याने आयोनीयामधील मायलीटस नगरराज्याच्या प्रमुखास पर्शियन (इराणच्या) सम्राटाविरुद्ध बंड करण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला होता; तथापि यामध्ये हेकाटीसला यश आले नव्हते. मायलीटस इ. स. पू. ४९४ मध्ये उद्ध्वस्त केले गेले; तथापि तद्नंतर इराणचा सेनापती आर्टफर्निझ व आयोनिया यांमध्ये शांतता करार करण्यासाठी राजदूत म्हणून त्याची निवड केली.

हेकाटीसने ग्रीक परंपरा, ग्रीक पुराणांच्या माहिती यांबाबत जेनीॲलॉजिआ किंवा हिस्टोरिऑई याचे व गेस पेरिओडॉस (टूर राउंड द वर्ल्ड) चे लेखन केले आहे. गेस पेरिऑडॉसचे दोन भाग असून एकाभागात यूरोप व दुसऱ्या भागात आशिया (ईजिप्त व उत्तर आफ्रिकेसह) या प्रदेशांची माहिती आहे. तसेच यासोबत जगाचा नकाशा असून सदर नकाशा तत्कालीन नकाशांत अधिक तपशीलवार आहे, असे समजतात. त्याने ईजिप्तसारख्या देशाचा प्रवास केला होता. त्यास स्पेन व उत्तर आफ्रिकेविषयी माहिती होती. तसेच हा पर्शियन सम्राटाचे राज्यसामर्थ्य व राज्य विस्ताराबाबत अवगत होता, असे दिसून येते. हिरॉडोटसनेही त्याच्या कार्याबद्दल उल्लेख केलेला आहे. ग्रीक इतिहासकार हेकाटीसला भौगोलिक व मानववंशशास्त्रीय अभ्यासक्षेत्रातील आद्य प्रवर्तक मानतात. 

ठाकूरदेसाई, सुरेंद्र