मद्रदेश : उत्तर भारतातील रावी (प्राचीन परूष्णी) व चिनाब (असिक्नी) या नद्यांदरम्यानचा पंजाबातील प्राचीन देश. याच्या विस्ताराविषयी अनेक मते आहेत. काही तज्ञांच्या मते हा झेलम नदीपर्यंत विस्तारला होता. नीलमतपुराणात शतद्रु (सतलज) व विपाशा (बिआस) या नद्यांच्या उत्तरेला ह्या देशाची सरहद्द लागते, असा उल्लेख आहे. काही ग्रंथांत देविका (सांप्रतची द्योका) ही नदी या प्रदेशातून वाहते, असा उल्लेख मिळतो. त्यावरून विद्यमान पाकिस्तानातील सियालकोटपासून दक्षिणेस लाहोर किंवा अमृतसर- पर्यंत मद्रदेश पसरला होता, असे दिसते. अमृतसरच्या परिसरात मद्र लोक राहत असल्याचे आजही दिसून येते. मद्रांनी समुद्रगुप्ताला खंडणी दिल्याचेही उल्लेख सापडले आहेत. काहींच्या मते बाल्हीक व मद्रदेश हे दोन्ही एकच परंतु कर्णपुराणात बाल्हीक व मद्रदेश हे दोन्ही वेगळे असावेत अथवा बाल्हीक हा मद्रदेशाचा एक भाग असावा असे म्हटले आहे. हेमचंद्राच्या अमिधानचिंतामणी- मध्ये मद्रदेशाचे दुसरे नाव टक्का-देश असल्याचा उल्लेख आढळतो [→बाल्हीक].

शिबी औशीनराचा पुत्र मद्रक याने हा देश वसविला, म्हणून त्याला मद्र किंवा मद्रक असे नाव मिळाले असावे. मत्स्यपुराणा- तील उल्लेखावरून अश्वपती (सत्यवानपत्नी सावित्रीचा पिता) हा या प्रदेशाच्या काही भागाचा अधिपती होता. प्रभुरामचंद्राचा पिता दशरथ राजाच्या काळात हा देश चारूदेष्ण राजाच्या ताब्यात होता. महाभारतातील उल्लेखावरून पांडवांच्या काळात हा देश शल्य राजाच्या ताब्यात होता. याच ग्रंथातील कर्णपर्वात, मद्रदेशातील पुरूष नीच व दुराचारी असून स्त्रिया मद्यपी व व्यभिचारी असतात, असे वर्णन करून कर्णाने शल्यास खिजविल्याचा उल्लेख आहे. पांडव-पिता पंडू याची दुसरी भार्या माद्री व सहदेवाची (पांडवांपैकी एक) भार्या विजया, या दोघी मद्रकन्याच होत्या. ⇨ शाकल (सांप्रतचे -सियालकोट किंवा सांगलवाल-टिबा असावे) ही मद्रदेशाची राज- धानी व मोठी बाजारपेठ होती. पाणिनीच्या काळी देविका नदी- काठचा तांदूळ फार प्रसिद्ध होता. त्या काळी मद्रदेशाचे पूर्व मद्र व अपर मद्र असे दोन भाग होते.

चौडे, मा. ल

.