सागरी परिसंस्था : (मरीन इकोसिस्टिम). जलपरिसंस्थेच्या विविध प्रकारांपैकी सर्वांत विशाल परिसंस्था. पृथ्वीच्या एकूण पृष्ठभागापैकी सु. ७१% भाग खाऱ्या पाण्याच्या प्रचंड जलाशयाने व्यापलेला असल्याने सागरी परिसंस्था ही सर्वांत विशाल परिसंस्था ठरली आहे. सजीव आणि पर्यावरणातील अन्य घटक यांच्यात एक अतूट नाते असते, अशा अतूट नात्यातून जैविक आणि पर्यावरणातील अजैविक घटकांमध्ये जी एक वैशिष्ट्यपूर्ण चक्राकार प्रणाली निर्माण होते, तिला ‘परिसंस्था’ असे म्हणतात. प्रत्येक परिसंस्थेचे वनस्पती व प्राणी यांसारखे जैविक घटक आणि हवा, पाणी, पोषक द्रव्ये व सौर ऊर्जा यांसारखे अजैविक घटक असे दोन मुख्य घटक असतात. जगातील परिसंस्थांचे भूप्रादेशिक परिसंस्था व जलपरिसंस्था असे प्रमुख दोन प्रकार आहेत. जलपरिसंस्थेत सागर, दलदली क्षेत्र, तलाव, नद्या व नदीच्या मुखाजवळील खाऱ्या पाण्याचा प्रदेश इ. परिसंस्थांचा समावेश होतो. या जलपरिसंस्थांपैकी सागरी परिसंस्था अतिशय विशाल आहे.

सागरतळाशी कमी तापमानामुळे पाणी थंड व जड असते, तर पृष्ठभागालगतचे पाणी उबदार असते. परिणामतः सागरात निर्माण होणाऱ्या अभिसरण प्रवाहांमुळे सागरी जीवसृष्टीला उपयुक्त ठरणारे विविध वायू व खाद्यपदार्थांचा सागराच्या खोल भागापर्यंत पुरवठा होत राहतो. सागरी प्रवाहांमुळे प्राण्यांना व वनस्पतींना आवश्यक असणारे वायू व खाद्यपदार्थ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. वनस्पती व प्राणी यांना श्वसनासाठी आवश्यक असणारा ऑक्सिजन व वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारा कार्बन डाय-ऑक्साइड हे वायूदेखील सागराच्या पाण्यात विरघळलेले असतात. त्यामुळे सागराचे पाणी ही वनस्पती व प्राणी यांच्या दृष्टीने आदर्श जीवनाधार प्रणाली बनली आहे. त्यामुळे सागरी परिसंस्थेत महाकाय व्हेलमाशांपासून अतिसूक्ष्म सजीवांपर्यंत असे असंख्य तऱ्हेचे जीव रहिवास करतात.

सागरी परिसंस्थेत सर्व पातळ्यांवर जीवसृष्टीचे अस्तित्व दिसून येते. सुमारे ११ किमी. खोलीच्या महासागरी खंदकांमध्येदेखील जीवसृष्टी आढळते. सागरी परिसंस्थेत तरंगणारे, प्रवाळ स्वरूपाचे, खडकाला चिकटून जगणारे, वाळू व चिखलाखालील तसेच अतिखोल सागरातील असे विविध प्रकारचे प्राणिजीवन आढळते. भिन्नभिन्न सागरी प्रदेशांतील जीवसृष्टीची वैशिष्ट्ये भिन्न स्वरूपाची असतात. पॅसिफिक महासागरातील परिसंस्था ही पृथ्वीवरील सर्वांत मोठी सागरी परिसंस्था असून त्याखालोखाल अटलांटिक, आर्क्टिक व हिंदी महासागरातील परिसंस्थांचा क्रमांक लागतो. मानवनिर्मित प्रदूषण, अणुचाचण्यांतील किरणोत्सर्ग इत्यादींमुळे सागरी परिसंस्थांना हानी पोहोचत आहे.

पहा : जीवविज्ञान, सागरी परिस्थितिविज्ञान महासागर व महासागरविज्ञान.

चौधरी, वसंत