ट्रेंटन : अमेरिकेच्या न्यू जर्सी राज्याची राजधानी. लोकसंख्या १,०४,६३८ (१९७०) महानगरी २,७४,१४८. हे औद्योगिक महानगर कॅमडेनपासून ४८ किमी. डेलावेअर नदीच्या नोव्हनसीमेवरील चांगले बंदर आहे. कालवे व आगगाडी यांमुळे शहराची झपाट्याने वाढ झाली. पोलादी तारा, स्थापत्यविषयक वस्तू, रबरी सामान, विमानांचे व मोटारींचे भाग, विजेची उपकरणे, औषधे, वाफेची टर्बाईने, शिगार्स, कागद, कापड, लिनोलियम, प्लास्टिक, ॲस्बेस्टॉसचे कापड इ. उत्पादने आहेत. येथील चिनी मातीच्या वस्तू विख्यात आहेत. १८५५ मध्ये स्थापन झालेले ट्रेंटन स्टेट कॉलेज, शिक्षक प्रशिक्षण महाविद्यालय, रायडर महाविद्यालय, राज्य बंदीशाळा वगैरे कित्येक संस्था येथे आहेत. न्यू जर्सी राज्य सांस्कृतिक केंद्रात वस्तुसंग्रहालय, तारादर्शनालय, राज्यग्रंथालय, प्रेक्षागार इ. आहेत. सोनेरी घुमटाचे राज्यभवन प्रेक्षणीय आहे. १७७६ सालच्या स्वातंत्र्य संग्रामाची खूण म्हणून वॉशिंग्टनचा पुतळा असलेला ४७ मी. उंचीचा एक स्तंभ १८९३ मध्ये येथे उभारण्यात आला आहे. विल्यम ट्रेंट ह्याने १७१४ मध्ये येथे वसाहतीस सुरुवात केली त्याचे स्मरणार्थ ह्या शहराला ट्रेंटन हे नाव दिले गेले. त्याचे घर ही शहरातील सर्वांत जुनी वास्तू आहे. जोसेफ बोनापार्टची प्रेयसी अनेट सॉव्हिज हिचे ‘बोहिल’ हे घर येथे आहे.

लिमये, दि. ह.