कांपाला: युगांडाची राजधानी व प्रमुख व्यापारी शहर. लोकसंख्या उपनगरांसह ३,३१,९०० (१९७०). व्हिक्टोरिया सरोवरावरील एंटेबेपासून ईशान्येला ३० किमी., समुद्रसपाटीपासून १,१६२ मी उंचीवर, टेकड्यांमध्ये वसलेले हे शहर आहे. कांपाला हे खुष्की व जलवाहतुकीचे एक मोठे केंद्र आहे. व्हिक्टोरिया सरोवरावरील जलवाहतूक विशेष महत्त्वाची आहे. कांपालापासून पूर्वेकडे मोंबासा बंदरापर्यंत आणि पश्चिमेकडे कासेसे ह्या खाणींच्या केंद्रापर्यंत लोहमार्ग आहे. शेतमाल व गुरे यांची ही बाजारपेठ असून कापूस, कॉफी, ऊस यांची येथून निर्यात होते. तंबाखू, कातडी यांपासून पदार्थ तयार होतात. शासकीय कचेऱ्या, महाविद्यालय, तांत्रिक व इतर शाळा सरकारी रुग्णालय व वैद्यकीय शाळा इ. नवीन भागात आहेत. जुन्या शहरात जुन्या किल्ल्यात पूर्वी शसकीय कार्यालये होती.

लिमये दि. ह.